सूर्यप्रकाश आणि निरूपद्रवी कोलाहल.

“कधीकधी दुपारच्यावेळी,मऊ उशांवर पाठ टेकून बसल्यावर,बाजूला गरम गरम चहाचा कप ठेवून,पाडगावकरांच्या कवितेचं पुस्तक मांडीवर ठेवून कविता वाचताना,मधूनच मनात विचार डोकावतात की हे जीवन किती चमत्कारांनी भरलेलं आहे.”……इति सुधाताई.

सुधा वानखेडे माझी लहानपणाची मैत्रीण.सुधाला शिक्षणाची खूप आवड होती.ती शिकत गेली,शिकत गेली आणि शेवटी मराठीत एम.ए. झाली आणि एका कॉलेजात लेक्चरर म्हणून शिकवायला लागली.चिकाटी,हुशारी आणि सच्चेपणा ह्या गुणावर तिची त्याच कॉलेजात चांगली प्रगती झाली.शेवटी प्रो.सुधा वानखेडे म्हणून तिची नियुक्ती होऊन चाळीस वर्षाच्या शिक्षकी पेशानंतर निवृत्त झाली.

सुधाताईला मी प्रथम जेव्हा भेटलो तोपर्यंत ती निवृत्त होऊन जवळ जवळ महिना उलटला होता.सुरवातीची औपचारक चर्चा झाल्यानंतर विषय घेऊन तिच्याशी बोलायचं झाल्यास कुठचाही विषय अपुरा नव्हता.निवृत्ती नंतर तुझा वेळ कसा घालवतेस ह्याच विषयावर चर्चा केली तर कसं? असा विचार येऊन तेच मी सुधाताईला विचारलं.

सुधाताई मला म्हणाली,
“ह्या निवृत्तीच्या काळात एखादा क्षण शांतपणे चिंतन करण्यास मिळण्याची शक्यता असावी असं मला नेहमी वाटतं. दिवस, बराचसा वर आल्यावर मी घरात एकटीच असताना निरूपद्रवी कोलाहल असूनही शांतता मिळण्याचा हा क्षण मला अपेक्षित असतो.आमच्या शेजारच्या बिल्डींगमधे विद्यार्थ्यांचे क्लासीस घेतले जातात.हे विद्यार्थी
क्लासमधे शिरताना मोठ्यांनी बोलत असल्याचा आवाज आणि रस्त्यावरून जाणार्‍या गाड्यांचा खडखडाट आणि कर्कश आवाज येत असताना त्याच बरोबर सूर्याच्या उन्हाचा सर्वांवर होणारा परिणाम, सर्व कोलाहल काही प्रमाणात मंद करण्यात होतो.

घरातले सर्व आपआपल्या कामावर गेले की, ही जागा म्हणजे माझा शांत आश्रमच आहे असं मला भासतं.आणि त्यात खिडकीवर पडणारा सूर्यप्रकाश पडद्यातून डोकावून बघत उबदार ऊन माझ्या खोलीत आणतो.खरंच,मला सूर्यप्रकाश आणि निरूपद्रवी कोलाहल भावतो.

मी शांत बसलेली असताना आणि खिडकीतून आजुबाजूला न्याहळत असताना माझ्या मनात सतत विचार येतो की मनुष्यजातिचा हा उत्तेजित गतिक्रम किती विस्मयकारक आहे.समृद्धि,उन्नति आणि जीवनात सतत होणारा बदल ह्यानी भरलेलं हे जीवन उद्देशपूर्वक असतं आणि त्यात जोश ही असतो.परंतु,काही माझ्यासारखी मंडळी,शांत आणि
साध्या आनंदाच्या क्षणापासून, तसंच चिंतन करण्यापासून दूरावले जातात.मात्र सध्याच्या माझ्या उल्हासित जीवनात,हे असले क्षण अतिरिक्त आणि उत्कृष्ट अशा पैलूंची भर घालतात.

कधीकधी दुपारच्यावेळी,मऊ उशांवर पाठ टेकून बसल्यावर,बाजूला गरम गरम चहाचा कप ठेवून,पाडगावकरांच्या कवितेचं पुस्तक मांडीवर ठेवून कविता वाचताना,मधूनच मनात विचार डोकावतात की हे जीवन किती चमत्कारांनी भरलेलं आहे.माझी नातीगोती आणि ह्या समाजातलं माझं अप्रत्यक्ष योगदान काय असावं याचं मी चिंतन करते.
माझे मलाच मी मोठे मोठे प्रश्न विचारते.आणि त्या प्रश्नांना पूरी किंवा समाधानकारक उत्तरं क्वचितच मिळत असताना,ह्या सुखद क्षणांबद्दल ज्यात निरंतर विचार उत्पन्न होतात,ते क्षण माझ्या जीवनात एक प्रकारची समझ आणतात आणि सुखाने कंठलेल्या जीवनाबद्दल माझं मन शांत करतात.

एक मात्र खरं की,जशी माझीच मी चिंतन करते आणि ते सुद्धा माझ्या पूरतं करते,तेव्हा त्याचं जे येईल ते उत्तर माझ्यासाठीच असतं.अशावेळी मला होणारी दगदग आणि मनात होणारा सावळा गोंधळ हा जणुकाही, एखादा कॅनव्हासवर चित्र रेखाटत असताना,खर्‍या चित्राला आकार यायला अजून वेळ असताना सुरवातीचा त्या कॅनव्हासवर
फासलेला रंग काहीसा थपथपलेला मोठा ठिपका दिसातो आणि खर्‍या आकृतीला अजून आकारच आलेला नसतो, तसंच काहीसं वाटतं.

निवृत्त होण्यापूर्वीच्या जीवनात जसा फापट-पसारा असायचा,तसं आता मुळीच काही नसतं,उलट माझं मन एव्हडं विस्फारलेलं असतं की,पूर्वी जसं गुंता आणि गाठीमुळे हात बांधलेले असायचे आणि त्याचा परिणाम माझ्या महत्वाकांक्षी ध्येयाना आवरलं जायचं,तसं न होता,मी मला हवं तसं मनात वर्गीकरण करायला मोकळी असते.
ह्या चिंतन करण्याच्या क्षणात मला कधीही विलक्षण साक्षात्कार झाला किंवा अभूतपूर्व देवदर्शन झालं अशातला भाग नाही.उलटपक्षी,कधी कधी माझ्या नवर्‍याबरोबर उत्पन्न होणा्रे तणावपूर्ण प्रसंग प्रेमाने सुलझावले जातात,फावल्या वेळात काही तरी विषय घेऊन लेख लिहायला हुरूप येतो.

मी काही जगातली अगदी हुषार अशी बाई नाही,किंवा कुणी संतीण नाही.परंतु,सूर्यप्रकाशामुळे आणि निरूपद्रवी कोलाहलामुळे मी स्वतःचाच शोध लावला आहे आणि माझं जीवन सौन्दर्यासाठी आणि हिेतासाठी समर्पित केल्याचा आनंद घेतला आहे.”

सुधाताईने जेव्हा चर्चा संपवली तेव्हा असं वाटलं की त्यांनी ही चर्चा अशीच पुढे करत रहावी.त्यांनी मला सांगायला सुरवात केली आणि मला वाटलं की ज्यात शांत,निर्विकार आणि तत्वज्ञानविषयक माहिती आहे ती सांगायचा त्यांचाच अधिकार आहे.इतकी वर्षं शिक्षीका म्हणून जीवन जगल्याने,असंच काहीसं तत्वज्ञान त्यांच्याकडून अपेक्षित होतं असं म्हटलं तर वावगं होणार नाही.

मी सुधाताईना म्हणालो,
“सुधाताई,तुझा स्वत:बद्दलचा तू लावलेला शोध समजायला मला वेळ लागला नाही.
सूर्यप्रकाश येण्यापूर्वी तुला घरातून कॉलेजला जायला पाय काढावा लागायचा आणि दिवसभर विद्यार्थ्यांचा निरूपद्रवी कोलाहल सहन करावा लागायचा.आणि हे कमी नाही, गेली चाळीस वर्ष असं चालंय.आता निवृत्त झाल्यावर सूर्यप्रकाश तुझ्या जास्त परिचयाचा झाला आहे आणि कोलाहलाशी तू अपरिचीत राहिली आहेस.म्हणूनच तुला
सूर्यप्रकाश आणि निरूपद्रवी कोलाहल भावतो. म्हणूनच तुझ्या निवृत्तीच्या चिंतन काळात तुला तुझं जीवन सौन्दर्यासाठी आणि हितासाठी समर्पित केल्याचा आनंद होत आहे.आणि ते स्वाभाविक आहे.बरोबर ना?”

सुधाताईचा खजिल झालेलेला चेहरा पाहून माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: