हा ही क्षण निघून जाईल.

“हा ही क्षण निघून जाईल.हे वाक्य माझं ध्यान खेचतं.” रघूनाथ नव्हेतर अण्णामास्तर मला सांगत होते.

रघुनाथाला अण्णामास्तर म्हणतात हे मला ह्या पूर्वी माहित नव्हतं.
त्याचं असं झालं,ह्यावेळी मी कोकणात गेलो होतो तेव्हा ठरवलं होतं की,रघुनाथाला ह्यावेळी नक्कीच भेटून यायचं. मागच्या खेपेला मी कोकणात गेलो होतो आणि त्याला कुणीतरी मी आल्याचं सांगीतलं होतं.तो माझी वाट पहात होता.पण मला त्यावेळी वेळ मिळाला नाही.कारण पुढच्या खेपेस कोकणात आलास तर मला भेटून जा, तुला
भेटण्याची मला खूप इच्छा आहे असा त्याने मला निरोप पाठवला होता त्यावरून मी अंदाज केला.

मी एस.टी.तून उतरून आजुबाजूला पाहिलं,रघुनाथ ज्या गावात रहात होता त्या गावाचा अगदी कायापालट झालेला मला दिसला.मी ही तसा बरेच वर्षानी रघुनाथच्या गावाला आलो होतो.लहानपणी मी पाहिलेलं ह्या गावाचं सृष्टीसौन्दर्य आणि आताचा कायापालट, सहाजिकच बदलत्या जमान्याप्रमाणे होता.नंतर मी जेव्हा गाव फिरून आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की,मुळचे काही देखावे तशेच्यातशेच होते.ते पाहून बरं वाटलं.

एस.टी.तून उतरल्यानंतर मी जवळच्या एका पानपट्टीच्या दुकानात जाऊन रघुनाथाच्या पत्याबद्दल चौकशी केली. गावातले लोक इतके प्रेमळ की रघुनाथ म्हणताना त्याचा नामोच्चर होताच आणखी दोघे चौघे माझ्या जवळ आले आणि एकाने मला विचारलंही की,रघुनाथ म्हणजे तुम्ही अण्णामास्तरांबद्दल चौकशीत आहात का?
त्यांच्या एकंदर सांगण्यावरून मी रघुनाथ म्हणजे अण्णामास्तर हे जाणलं.मी हो म्हणताच एक बंदा माझ्याबरोबर मला घर दाखवायला आला.

रघुनाथाच्या घराच्या बाहेर एक पाटी होती त्यावर लिहलं होतं,
“हा ही क्षण निघून जाईल.”
ह्या वाक्याचा अर्थ आणि कोणत्या संदर्भाने ते वापरलं आहे हे विचारण्यापूर्वी मी रघुनाथाला विचारलं की तू अण्णामास्तर ह्या नावाने गावात ओळखला जातोस हे कसं?
रघुनाथ मला म्हणाला,
“मला पूर्वीपासून समाजकार्य करण्याची आवड होती ते तुम्हाला माहित आहेच.मी माझा हा गाव सोडला नाही आणि इथेच कार्य करण्याचा ठरवलं.शिक्षण क्षेत्रासंबधाने काहीतरी गावात करावं ह्या इर्षेने मी गावात शाळा बांधल्या.आणि काही वर्गात शिकवायला पण लागलो कदाचित त्यामुळेच मला इकडे अण्णामास्तर म्ह्णून लोक ओळखायला लागले असावेत.गावात शाळा बांधण्याचं वेड मुख्यत्वे माझ्या आजोबांकडून झालेल्या संस्कारातून जन्माला आलं.”

रघुनाथ सांगत होता आणि मी ऐकत होतो.इतकं समाज कार्य केलेला माणूस अनुभवसंपन्न नक्कीच असणार हे माझ्या मनाने पक्कं केलं.म्हणूनच मी निमूटपणे तो काय सांगत होता ते ऐकत होतो.

“हा ही क्षण निघून जाईल.हे वाक्य माझं ध्यान खेचतं.” रघूनाथ नव्हेतर अण्णामास्तर मला सांगत होते.
“जेव्हा,जेव्हा,मी आनंदाने भारावून गेलेला असतो किंवा मला वैष्यम्याने पक्कं गाठलेलं असतं तेंव्हा.एखाद्या क्षणाचं मला गोड कौतूक करायला आवडतं पण म्हणून तो क्षण माझ्या मनात घर करून ठेवणं मला भावत नाही.एखादी संवेदना उराशी बाळगावी असं वाटतं पण ती संवदेना माझा ताबा घेईल असं मी करूं देत नाही.

मनोभाव व्यक्त करणारे आणि निघून जाणारे, क्षण पाहून मला एक बाब उघड झाली आहे की जीवन इतकं अपूर्ण असतं की त्याचा क्षोभ करण्यात अर्थ नाही.वेळेची क्षणभूंगरता मी बरेच वेळा अनुभवण्यात साक्षी आहे. मुख्यत्वे,माझ्या आजोबांचं निधन मला ती क्षणभंगूरता स्विकारण्यास कारणीभूत झाली.माझे आजोबा गेल्यानंतर बरेच दिवस मी त्यांची आठवण आल्यावर मुसमुसून रडायचो.पण नंतर माझ्याच मनाला मी समजावलं की,मृत्यु हा जीवनाचं एक अंग आहे.

माझ्या आजोबांची वेळ आली आणि गेली. परंतु,त्यांचं बरचसं मोठं असलेलं अस्तित्व अजून बरंचसं फळत-फुलत आहे.माझ्या आजोबाबाबत मी जितका खोलात जात होतो तितकं मला ध्यानात येऊ लागलं होतं की माझे आजोबा आपल्या जीवनात ओतप्रोत क्षमतेने भारलेले होते.दुसर्‍यांबद्दल आदर ठेवण्यात त्यांना अतिशय आनंद व्हायचा.मी
त्यांच्या संगतीत असताना शिकण्याबद्दल प्रेम असावं हा संदेश माझ्या मनात त्यांनी कोरून ठेवला होता.काही कारणानें त्यांच्या बरोबरच्या क्षणांनी माझ्या अंतरात केव्हाच शिरकाव केला होता.

नंतर,माझ्या आजोबांना गमावण्याची माझ्या मनातली संकल्पना,माझ्या जीवनाची अंगभूत बाब व्हायला लागली तशी, “हा ही क्षण निघून जाईल” ही उक्ति मला माझ्या जीवनात जास्त मोलाची वाटायला लागली.जशी मित्रमंडळी,दोस्ती ह्वेत विरून जाऊ लागली,एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्याच्या प्रक्रियेत,भावनाप्रधान गोंधळ मनात येऊ लागला,आणि निरनीराळी नातीगोती उदयाला येऊ लागली तसं सर्व काही एकत्रीकृत व्हायला लागलं.आणि त्यातून मला एक तथ्य दिसून यायला लागलं की,माझ्या डोळ्यातले आनंदाश्रू वा दुःखाश्रू काळाच्या ओघात पारित होऊ शकले नाहीत.उलटपक्षी माझा इतरांबरोबरचा अनुभव त्यांच्यावर एक प्रकारची छाप टाकून जायचा.आणि ही
घटना कधी कधी मला बेचैनही करायची.

“हा ही क्षण निघून जाईल” ह्या उक्तिची माझ्या मनात पुनरावृत्ती होत राहिल्याने माझ्या मनोभावना निष्प्रभावित होऊ लागल्या.माझ्या त्या क्षणांवरचे जीवंत परिणाम उघड व्हायला लागले. जर का माझ्या मनावर वेदनांची कटकट व्हायला लागली की, मी भविष्याचा विचार करायचो आणि मनात म्हणायचो आनंदाचे दिवस नक्कीच येतील.
ह्या दृष्टीकोनामुळे मला मनोभावना नसल्याचं माझ्या मनात उल्लेखलं जात नव्हतं, तर मी समजून घ्यायचो की हे क्षण ऐहिक असण्याच्या पलीकडचे होते.

“हा ही क्षण निघून जाईल” ही उक्ति वेळो वेळी आठवणीत ठेवल्यामुळे,त्या क्षणाचा पुरेपूर ताबा घ्यायच्या प्रयत्नात मी असायचो.आत्म-स्तुतीचा त्यात लवलेश नसायचा.
इतरांच्या उन्नतिबद्दल उद्देश असायचा.फक्त एकच आशा करायचो की एकदा कधीतरी मला कुणीतरी समजून घेईल. माझ्या एक ध्यानात आलंय की,जीवनाचं सार हे वर्षानुवर्ष मजा करत करत जगण्यात नाही तर जीवनाच्या पश्चात, दुसर्‍यांसाठी विचार,कल्पना आणि कारुण्य किंवा कळवळा असण्यात जीवन खर्ची झालं,ह्याची आठवण,मागे राहिलेल्या लोकांत असण्यात आहे.
गम्मत म्हणजे,आत्ता मी तुम्हाला हे सर्व सांगत असताना हा ही क्षण निघून गेला आहे.”

रघुनाथाचं हे सर्व तत्वज्ञान ऐकून,
रघुनाथाला अण्णामास्तर असं का म्हणतात हे उलगडायला मला वेळ लागला नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: