म्हातारपण (एकाकीपणाचं स्वागत)

कवटाची (अंड्याची) करी केल्यानंतर, सोलकढी भात कालवून झाल्यावर तोंडाला कवटाची करी घेऊन केलेलं जेवण मायला समाधान द्यायचं.सुरवातीला करीभात जेवायाचा नंतर सोलकढी भात जेवायचा.बारा कवटं असलेल्या खोक्यातून एक कवट निवडून,ते सुद्धा पिंगट रंगाचं कवट असल्यास उत्तम समजून त्याची केलेली आमटी मायला खूपच आवडायची.त्या रात्रीचं तिचं ते एकटीचं जेवण असायचं.

मायने ह्यापूर्वी कवटाची आमटी कधी केलीच नाही अशातला भाग नाही.इतक्या वर्षात हजारो कवटं फोडून मायने कवटाचे निरनीराळे प्रकार केले आहेत.अतीशयोक्ती म्हणा किंवा म्हणू नका पण असं म्हणायला हरकत नाही की कवटं फोडून ती फेसाळून फेसाळून झाल्यावर पिवळट दिसणारा फेस गर्द सोन्यासारखा दिसू लागला असल्यास नवल
नाही.मग त्या कवटाच्या पिवळ्या बलकातून धिरडी केली असतील किंवा तो बलक पिठात घालून कुरकुरीत बिस्कीटं मायने बनवली असतील.

आज मात्र मी जेव्हा मायला भेटायला गेलो तेव्हा ती रुद्राक्षाच्या माळेसारखी माळ हातातघेऊन मणी मोजत होती. प्रत्येक मण्याबरोबर येशुच्या नावाचा एकटीच उदघोष करत होती असं म्हणायला हरकत नाही.पास्कलची मुलं तिला माय म्हणायची मी पण मायच म्हणायचो.

फार पूर्वी लिहिलेल्या माझ्या “आई तुझी आठवण येते” ह्या लेखात आईला किती नावानी संबोधता येतं हे लिहिलं आहे,
“आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं.
मॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली!
“आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)”
म्हणजेच,
“अगं मी येते!, अरे मी येते!
असं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती “आई”
तिच माऊली,
तिच मॉं,
तिच माय,
म्हणजेच “my”- माय- माझी,
MOM म्हणजेच My Own Mother, तिच शब्दशः आई.

नुसता “आई” हा शब्द्च पहाना,
पहिलं अक्षर, “आ” म्हणजे आकाशा एव्हडी प्रचंड मन असलेली.
दुसरं अक्षर “ई” म्हणजेच जी ईश्वरा एव्हडी देवतुल्य.
म्हणूनच ती “आई.”
असो.

दहा वर्षापूर्वी पास्कल तिला सोडून गेला.मायला दोन मुलं आहेत मुलगा एन्ड्रू आणि मुलगी ज्युईली.एन्ड्रू शिकयला म्ह्णून इंग्लंडला गेला आणि तिथेच स्थाईक झाला.मधून मधून आई-वडीलांना भेटायला यायचा.पास्कल गेल्यानंतर बरीच वर्ष तो तिला भेटायला आला नाही.ज्युईली लहानपणीच नन झाली आणि गोव्यातल्या एका चर्चमधे लोकांची सेवा करण्याचं व्रत तिने स्विकारलं.अधून मधून मायला ती भेटून जाते.

माझी वहिनी गोव्याची.माझ्या लहानपणी मी वहिनीबरोबर तिच्या माहेरी गोव्याला जायचो.पास्कल कुटूंब शेजारच्या भूखंडात रहायची.छोटसं घर आहे आणि पास्कलचा मासेमारीचा व्यवसाय होता.पास्कल मनाने उदार होता.टोपली टोपली मासे तो माझ्या वहिनीच्या घरी पाठवून द्यायचा.सर्वच दिवस सारखे नसतात.ऐन उमेदीत पास्कलला
असाध्य व्याधी झाला.त्याला कामाचा व्याप जमेना.त्याने आपल्या होड्या जाळी आणि इतर साहित्य आपल्या चुलत भावाला देऊन तो घरीच बसून राहिला मला हे सगळं मायकडून कळलं. असो.

मायने मला जेवायला रहायचा आग्रह केला.पण मी अलीकडे रात्री जेवत नाही असं सांगीतलं त्यामुळे तिचा हिरमोड झाला.तू जेऊन घे असं मी तिला सांगीतलं.मायने कवटाचं जेवण करण्याचा घाट घेतलेला दिसला.जो पदार्थ माय नेहमीच करीत आली आहे.

आजच्या रात्री मायच्या शेगडीवर पाणी उकळत होतं.त्या शांत वातावरणात उकळत्या पाण्याच्या बुडबूड्यांचा आवाज ऐकायला येत होता.एका कपाच्या कडेवर एक कवट दोनदा हळुवारपणे आपटलं गेलं.बाजूच्या शेगडीवर कवटाची करी कवटाशिवाय उकडत होती.मायने त्या कवटाचा बलक एक चमच्यावर घेऊन हळूच त्या करीत सोडला.गरम
वातावरणात चमच्यावरच्या कवटाचा पांढरा भाग जास्त घट्ट होऊन पिवळा बलक त्यात अडकला गेला.चमच्याच्या उलट भागाने मायने करी ढवळली.ते कवट जसंच्यातसं त्या उकळत्या करीत तरंगत होतं.

मायची ही स्पेशल डीश असायची.दुसर्‍या एका थाळीत पावाचे दोन स्लाईस आणि त्यावर लोणी लावून ठेवलेले दिसले.मायने दोन्ही थाळ्या दोन हातात घेऊन ती टेबला जवळ जायला निघाली. प्रत्येक पाऊल टाकताना त्या थाळ्या थरथरत होत्या.टेबलावर त्या थाळ्या ठेवून माय खूर्चीवर बसली.

आज मी माय समोर बसलो होतो एव्हडंच.नाहीपेक्षा रोज रत्री माय तशी एकटीच जेवत असते.मला ती एकटीच जेवत आहे असंच भासलं.

मायचा निरोप घेऊन घरी जात असताना मी माझ्या मनात म्हणालो,
“एकाकीपणा तूझं स्वागत”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: