हे आत्ता माझ्या लक्षात आलं.(आणि माझी आई)

“तिचा हात अंगावरून खाली पडला.मी दचकलो.वारा सुटला होता आणि झाडं आणि पानं सळसळत होती. आणि ह्या सर्व प्रसंगाच्या वेळी चंद्र साक्षीला होता.”

मुकुंदाला तो अगदी लहान असल्यापासून मी ओळखतो.त्याचे वडील तो अगदी लहान असताना गेले.त्याच्या आईचं सुद्धा त्यावेळी बरच लहान वय होतं.कुणाच्या आयुष्यात अशी शोकांतिका पाहिली की माझं मन खूपच विषण्ण होतं.दुःख आलेलं असतं हे पुढे सुखाचे दिवस येण्यासाठीच आणि त्यात विपरीतता ही होत असते.
मला खुप दुःख झालं ते मुकुंदाच्या आईचं.मुकुंदा मोठा होईतोपर्यंत बिचारीने कसे दिवस काढले असतील?आणि आपल्या परंपरेत अशा परिस्थितीत बिचार्‍या स्त्रीयांचा किती कोंडमारा होतो ह्याची कल्पना ही करणं सहन होत नाही,
ह्यावेळी मला सुरेश भटांच्या त्या कवितेतल्या पहिल्या दोन ओळी आठवतात.
ते म्हणतात,
“भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले!
एव्हडे मी भोगिले की मज हसावे लागले!”

अलीकडे, मुकुंदा मला ज्यावेळी खूप दिवसानी भेटला होता,त्यावेळी आणखी एक दुःखद बातमी त्याच्याकडून कळली की त्याची आईपण त्याला सोडून गेली होती.

मला मुकुंदा सांगत होता,

“मला नेहमीच असं वाटतं की,ज्याने त्याने त्यांच्याजवळ आत्ता जे आहे त्यावर खूष असावं.कारण भविष्यात काय लिहून ठेवलंय ते माहित नाही.क्षणभर थांबावं आणि आपल्या जीवनाकडे निक्षून पहावं.तुम्हाला जे थोर्‍यामोठ्यांचे आशिर्वाद मिळाले आहेत त्याची जाणिव करावी आणि आणखी उत्कर्षासाठी परिश्रम घ्यावेत. जीवनात नेहमीच चूरस ही असतेच.परंतु,हे नेहमीच लक्षात येतं की,आपल्याकडे जे काही आहे ते दुसर्‍यालाही हवं असतं.बहुदा हे आपल्याला जाणवत नसावं.आणखी आणखी हवं हे मनुष्याच्या पक्कं मनात असतं.पण असं मनात आणून त्यासाठी परिश्रम करीत असताना सध्या आपण कशावर उभे आहोत हे त्याच्या ध्यानातच येत नाही.

मी अगदी लहान असताना माझे बाबा गेले.एकटं मुल म्हणून माझ्या आईने मला वाढवलं.त्यावेळी आम्ही कोकणात रहात होतो.माझ्या आईने माझ्या बाबाचं नसणं मला कधीच जाणवू दिलं नाही.परंतु,मला आठवतं माझ्या बाबांच्या नुकत्याच जाण्याच्या काळात माझी आई मला जवळ घेऊन रात्रीची झोपताना मुसमुसून रडायची.मी जरी लहान असलो तरी तिचं असं रडणं मला बरंच काही सांगून जायचं.

एका नातेवाईकाच्या मदतीने आम्ही शहरात रहायला आलो.उदरनिर्वाहासाठी माझ्या आईला काही धडपड करणं क्रमप्राप्त होतं.सुरवातीला माझ्या बाबांच्या जाण्याने ती एकटी पडल्याने ह्याचीच खंत तिच्या मनात यायची असं आता मला वाटतं.
शहरात आम्ही रहायला आलो तेव्हा मी दहाएक वर्षाचा असेन.जरा दिवस बरे आले तरी माझी आई अजूनही डोळे पाणवायची हे माझ्या नजरेतून निसटलं नाही.

माझे बाबा असते तर तिला त्यांची सोबत मिळाली असती,सहवास मिळाला असता.असंच तिला वाट्त असावं असं मला तिच्या एकटेपणातल्या काळात डोळे पाणावताना पाहून आत्ता माझ्या लक्षात आलं पण त्यावेळच्या माझ्या वयात मी तिला माझ्या शाळेतल्या शिक्षक-आईवडील मेळाव्यात हटकून घेऊन जायचो.

हळू हळू मी ही मोठा होत गेलो आणि माही आई वयाने वाढत गेली.मी माझ्या ह्या नवीन जीवनक्रमाला जळवून पाहायला शिकलो.माझ्या जबाबदार्‍या काय आहेत तेही समजयला लागलो.

पाश्चिमात्य देशातलं वातावरण असतं तर आतापावेतो माझ्या आईने आपलं दुसरं लग्न करून आपल्या नव्या जीवनाची सुरवात करून मलाही नव्या वातावरणात जगायला शिकवलं असतं.आपल्या परंपरेत हे असं बसत नाही हे मला आता कळलं.
माझ्या आईने मला वाढवण्यात प्रचंड परिश्रम घेऊन स्वतःच्या आशा-आकंक्षांना तिलांजली दिली.माझ्या बाबांच्या अनुपस्थितीची वास्तविकता पाहून आणि त्याचा विचार करून अश्रू ढाळून ढाळून तिचे डोळे आता कोरडे पडले होते.तिला दु:ख व्हायचं पण ते सूकं दुःख असायचं.हे आता माझ्या लक्षात आलं.

माझ्या उर्जितावस्थेकडे,माझ्या उत्कर्षाकडे तिचे डोळे लागले होते.माझ्या कमाई करण्याच्या दिवसात अप्रत्यक्षपणे तिचे परिश्रम कमी व्हायला लागले.तिने न सांगताच मलाच माझ्या जबाबदारीची जाणिव व्हायला लागली.ती न बोलता तिचे डोळे आता माझ्याशी बोलायला लागले.स्वत:च्या जीवनावर प्रेम करण्याचं सोडून ती माझ्या जीवनात त्याग करायला सरसावून पुढे येऊ लागली होती.हे आता माझ्या लक्षात आलं.

माझं लग्न झाल्यावर माझ्या आईसकट माझं कुटूंब विस्तारत असताना मला प्रेम काय असतं हे कळायला लागलं.माझ्या कुटूंबाकडून मिळणार्‍या प्रेमाच्या आधारावर माझ्या जीवनात मला आधार मिळायला लागला. प्रेम आणि त्याग ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून कुटूंबाकडून मिळत गेलेल्या समजुतदारपणाच्या वागणूकीमुळे समजूतदारपणाची धातू असलेलं हे नाणं माझ्या जीवनात खणखण वाजत होतं हे आत्ता माझ्या लक्षात आलं.

माझ्या कामावर जाताना मी बसने प्रवास करतो.खिडकीतून आजुबाजूचं जीवन न्याहाळत असताना जे जसं आहे तसं आहे ह्याची जाणिव होते पण कसं असायला हवं ह्याचा माझ्या मनात विचारही येत नाही.मी आणखी श्रीमंत असतो,आणखी गरीब असतो,आणखी चलाख असतो अस विचार करून यादी वाढतच जाईल पण आत्ता तरी मी खुष आहे.
आणि हे ही आत्ता माझ्या लक्षात आलं.

एकंदर परिस्थिती पाहून माझी आई खुष होती असं मला वाटत होतं.माझ्या बाबांची ती आठवण काढीत नव्हती अशातला प्रकार नाही.त्यांची स्मृती तिच्यापरी कमी झाली होती अशातलाही प्रकार नाही.पण एकदा माझी आई एकटीच बसली होती.मला ती जरा काळजीत आहे असं वाटलं.मी तिला विचारलं की तिला खूप दिवसानी बांबांची आठवण येते का?
कधी तरी मी असं विचारणार असं काहिसं मनात येऊनच माझी आई माझ्याशी बोलली.मला म्हणाली,
“बाळ,तू अगदी लहान होतास आणि माझंही लग्न होऊन खूप कमी काळ गेला होता.तुझ्या बाबांच्या अचानक जाण्याने माझ्यावर आलेली आपत्ती कुणावरही येऊ नये.त्या काळात सकाळ,दुपार आणि संध्याकाळ मला तुझ्या बाबांची आठवण यायची.ते गाणं,

“दिस नकळत जाई,सांजा रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही”

त्या कवितेच्या पहिल्या दोन ओळी माझ्या मनात सतत घोळायच्या.त्या ओळीतूनच मी आपल्यात नसलेल्या, तुझ्या बाबांबरोबर संपर्क ठेवायची.”

असं मी, माझ्या आईशी अधुनमधून बोलून माझ्या बाबांच्या आठवणींचा विषय काढायचो.
एकदा माझी आई मला म्हणाली,
“थोडेदिवस कोकणात जाऊन रहावंसं मला वाटतं.”
मी लगेचच तयार होऊन तिला माझी संमती दिली.
कोकणात गेल्यावर सुरवातीला माझी आई त्या जुन्या घरात रहात असताना सुख-दुःखाच्या संमिश्र आठवणी काढून आपली मनोदशा संभाळायची.
एक दिवशी मला आठवतं तिला थोडं नरम गरम वाटत होतं.तिचं अंग जरा गरम वाटलं.
ते पावसाचे दिवस होते.पाऊस अधुनमधून पडायचा.कधी रिमझीम पडायचा.कधी एकदम उघाडी यायची. आईला मी तिच्या खोलीत झोपवली होती.मधुनच येणार्‍या पावसाची झड खिडकीतून तिच्या खाटीवर पडायची. खिडकीचं दार थोडसं लावून घेऊन मग तिच्या अंगावर मी पांघरूण घातलं.आई शांत झोपलेली होती.

पाऊस कमी होऊन आकाश अगदी निरभ्र झालं होतं.पाउस आला की कधी कधी वीज जाते हे लक्षात ठेवून माझ्या आईच्या खाटीजवळ मी एक कंदील पेटता ठेव्ला होता.
बहुतेक ती पौर्णिमेची रात्र असावी.कारण स्वच्छ चांदणं खिडकीच्या ओढून घेतलेल्या दारातूनही खोलीत पडलं होतं.कदाचित जोरदार आलेल्या वार्‍याच्या झोतीमुळे ते दार थोडं उघडं झालं असेल.माझी आई इतकी शांत झोपलेली होती की तिच्या अंगावर ते चांदणं पडल्याचा तिला भासही होत नव्हता.मी अलगद तिचा हात उचलण्याचा प्रयत्न केला.कारण तो हात घातलेल्या पांघरूणाच्या बाहेर होता.पण तिचा हात अंगावरून खाली पडला.मी दचकलो.वारा सुटला होता आणि झाडं आणि पानं सळसळत होती.आणि ह्या सर्व प्रसंगाच्या वेळी चंद्र साक्षीला होता.

ती माझी आई होती.म्हणून मी व्याकुळ होऊन रडायला लागलो. क्षणभर मनात आलं की माझं बालपण यापुढे संपलं.कारण मला “बाळ” म्हणून हाक द्यायला माझी आई नव्हती.एकटा कंदील मात्र जळत होता.

माझ्या बाबांच्या जाण्यानंतर माझ्या आईने खूप दुःख भोगलं. एव्हडं दुःख भोगलं की मला बरं वाटावं म्हणून ती कधी कधी हसायची.
आता कित्येक वर्षानंतर ह्या गत-दिवसांची आठवण आली की हे सर्व आत्ता माझ्या लक्षात येतं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

 

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: