“त्रुटीशिवाय जीवन न लगे”

“माझ्या आईच्या जाण्याने माझी झालेली नुकसानी मला भेडसावत नव्हती तर तिच्याशी मी ज्या तर्‍हेने वागलो ते मला जास्त भेडसावत होतं.माझाच स्वार्थीपणा मला सहन
होत नव्हता.”….इती दामू

माझं मनगटाचं घड्याळ बंद पडलं होतं.घड्याळ खूप जूनं झालं होतं पण ते मला आवडायचं.रोज चावी देण्याचा त्यात व्याप असला तरी ते अचूक चालायचं.त्याचा सोनेरी रंग आणि त्याचा सोनेरी पट्टा मला आवडायचा. माझ्या एका मित्राने दामू देव्हारेचं नाव सांगीतलं.दामू एका नामांकीत घड्याळाच्या कंपनीत घड्याळं ॲसेंबल करायचं काम करायचा.घड्याळ्यातली आतली घडण किती खिचकट असते हे सर्वांनाच माहित असतं.परंतु खिचकट असताना त्याची घडण करायच्यावेळी एखाद्याला परिपूर्ण(perfect)असायला हवं.नाहीतर एव्हड्या लहान डबीत एव्हडी चाकं व्यवस्थित मांडून त्याची घडण करणं काही सोपं काम नक्कीच नसणार.असो.

दामूने माझं घड्याळ पूर्वव्रत करून दिलं.मला खूप आनंद झाला.ते घड्याळ दुरूस्त होईल ह्याची आशाच मी सोडून दिली होती.माझी आणि दामु देव्हार्‍याची दोस्ती जमली.
मी त्याला माझ्या घरी एकदा जेवायला बोलवलं होतं.बोलत असना मी त्याला एक प्रश्न केला हे एव्हडं खिचकट काम तू कसं करतोस?
मला दामू म्हणाला,
मी लहानपणापासूनच perfectionist आहे.पण ते वेड मला आयुष्यात भोवलं.आता मला पटलं की त्रुटीशिवाय जीवन नाही.नव्हेतर आयुष्यात त्रुटी येणं आवश्यक आहे.हा माझ्यात असा कसा बदल झाला असं तुम्हाला सहाजिकच वाटेल.

माणसात थोड्या त्रुटी असणं हे मला योग्य वाटतं.माझ्या उभ्या आयुष्यात मी पूर्तता मिळवण्यासाठी खूप प्रयास केले. आणि अंतिम निकाल खूपच निराळा लागायचा.त्यामुळे सरतेशेवटी जो येईल तो निर्णय स्विकारायचा मी ठरवायचो.यातुन मी एकच शिकलो की पुर्तता होणे कदापी शक्य नाही.

माझी जूनी आठवण आहे की मला माझं कुटूंब अगदी परिपूर्ण असावं असं वाटायचं.माझी आई माझे वडील माझी बहिण भाऊ आणि मी धरून सर्व सदासर्वकाळ उत्तम प्रकृतीने असावेत असं नेहमी वाटायचं.पण प्रत्यक्षात जे मला वाटायचं ते सोडून सर्व काही व्हायचं.त्यामुळे काय व्हायचं की मला हव्या असलेल्या गोष्टीपासून मी दूर दूर जायचो म्हणजेच माझं कुटूंब मी दुरावयाचो.

मला आठवते ते दिवाळीचे दिवस होते.मला माझी आई म्हणाली की तिला बरं वाटत नाही डॉक्टर तिला म्हणाले की तिने हॉस्पिटलात जावं.हे ऐकून मला खूप वाईट वाटलं मी एका कोपर्‍यात जाऊन मुसमुसून रडलो.मला जीवन नकोसं झालं होतं.ऐन दिवाळीच्या दिवसात माझी आई आमच्या बरोबर नसणार होती.मी दत्ताच्या देवळात जाऊन देवाला खूप साकडं घातलं.वय बालिश होतं.विचार ही बालिशच असणार.पण माझ्या आईबरोबरची ती माझी शेवटची दिवाळी होती.

त्या दिवशी मी हॉस्पिटलात गेलो.आणि माझ्या आईशी दहाएक मिनीटं बोलत होतो.त्यावेळी माझ्या मनात सतत येत होतं की आईने आजारी व्हायला नको होतं.खाऊन पिऊन सर्व काही ठीक असताना आजारी ते काय म्हणून माणूस पडतो.मी ज्यावेळी घरी पोहोचलो तेव्हा माझ्या मनात मुळीच आलं नाही की माझ्या आईबरोबरची ती शेवटची दिवाळी ठरणार होती.

दिवाळीच्या एक आठवड्यानंतर माझ्या आईची प्रकृती थोडी गंभीर झाली.ती अंथरूणावरून उठून चालू शकत नव्हती.तिला सतत कुणा ना कुणाची सोबत लागायची.मला आईचा राग यायचा.त्रुटी शिवाय रात्र जावी म्हणून मी दत्ताकडे प्रार्थना करायचो.सर्व परिपूर्णता असावी म्हणून मी दत्ताकडे मागणं करायचो.
माझी प्रार्थना सफल होत नाही आणि माझी आई काही बरी होत नाही हे माझ्या लक्षात आल्यावर मी देवाला म्हणालो मला परिपूर्णता नको पण माझी आई बरी कर.माझ्या आईला परिपूर्ण कर.पण ते मला मिळणार नव्हतं.माझी आई त्यानंतर एक महिना हॉस्पिटलात होती.मी तिला त्या एक महिन्यात नऊ वेळा पहायला गेलो.ती आजारी आहे हे मला सहनच होत नसायचं.मला न सहन होण्यासारखं अपंग,आजारी आणि आशा सोडण्याजोगी माझी आई.

माझी आई गेली आणि तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठ्या त्रुटीचा दिवस होता.माझ्या आईच्या जाण्याने माझी झालेली नुकसानी मला भेडसावत नव्हती तर तिच्याशी मी ज्या तर्‍हेने वागलो ते मला जास्त भेडसावत होतं.माझाच स्वार्थीपणा मला सहन होत नव्हता.मी अगदी हताश झालो होतो.इतके दिवस रोज मी आईकडे जाऊन तिचा सहवास मला मिळवला असता.त्याऐवजी मी परिपूर्णतेच्या मागे लागलो होतो.जी परिपूर्णता मला कधीच मिळवता आली नाही.

माझ्या अशा आयुष्याशी जुळतं घ्यायला मला काही काळ दवडावा लागला.अजूनही त्या काळातून मी परिपूर्ण सुटलेलो नाही.पण एक गोष्ट जाता जाता माझ्या लक्षात येऊ लागली होती की,जे जीवनात मिळतं ते आत्मसात करावं.जी परिपूर्णता मला वाटायची ती मिळवण्यासाठी माझ्या जीवनातला बराचसा काळ मी मोफत घालवला.खरंच जीवन इतकं कमी असतं की अशातर्‍हेने ते उधळून लावण्यात अर्थ नसतो.जसं आहे तसं अंगीकारावं.सर्व त्रुटीसह अंगीकारावं. आता मी त्रुटीवर जास्त विश्वास ठेवतो.”
मला हे सर्व दामूचं तत्वज्ञान ऐकून जरा अचंबा वाटला.मी त्याला म्हणालो,
“दामू,मला असं वाटतं,माणूस आणि यंत्र ह्यात हाच फरक आहे.तू तुझ्या लहानपणी अगदी पर्फेक्षनीस्ट होऊं पहात होतास आणि माझं जूनं घड्याळ दुरूस्त करून ते आता परफेक्ट चालेल असं केलंस.आणि ते नक्कीच चालेल.कारण त्या यंत्राला मन नाही,विचार नाही आणि भावना तर नाहिच नाही.जीवनातली घडी तशीच रहात नाही.हे तुला तुझ्या आईच्या उदाहरणावरून कळलं.ते कळलं ते बरंच झालं.नाहितर तुझ्या त्या विचाराने तू आयुष्यभर दु:खी झाला असतास.आणि हाच यंत्रातला आणि माणसातला फरक आहे. माझं घड्याळ मी तुझ्याकडे दुरूस्तीला टाकेपर्यंत पडून होतं.आणि ते तसंच राहिलं असतं.तू ते दुरूस्त करू शकलास कारण त्या घड्याळ्यातल्या त्रुटी तू समजू शकलास.म्हणून मी ही तुझ्याशी सहमत होऊन म्हणतो की,

“त्रुटीशिवाय जीवन न लगे”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॉलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: