परखून पहायला काय जातंय?

संगीता आपल्या आजोळी वाढली.त्यामुळे तिच्या आजीचे तिच्यावर बरेच संस्कार झाले.त्यातली आवर्जून सांगण्यासारखी एक बाब म्हणजे आजीने शिजवलेल्या प्रत्येक पदार्थाची चव घेऊन आपलं मत देण्याचा आजीने तिच्यावर टाकलेली ही जबाबदारी.

संगीता मला आपला अनुभव सांगत होती.मला म्हणाली,

“मला अन्न -खाद्य लय आवडतं.अन्नाची चव,क्रियापद्धति,वास-गंध अगदी अन्नाबदद्धल सर्व काही मला मोहात पाडतं.खावं खावं जे वाटतं तेच हे अन्न-खाद्य.
खरं म्हणजे,अन्न पदार्थावर प्रेम करायचं हे मला माझ्या आजीच्या स्वयंपाकघरातून उदयास आलं. माझ्यासाठी माझी आजी एक स्टूल मला बसण्यासाठी किचनमधे ठेवायची.मी त्यावर बसून तिला मी बारीक बारीक गोष्टीसाठी मदत करायची.उदा.मासे नीट करून देणं,अंडी फोडून देणं,तव्यावरचा पोळा उलथून पालथून गरम करणं,पावाचे सॅन्डविच करायचे असतील तर त्यासाठी सामुग्री जवळ करणं,रात्रीच्या जेवणासाठी कडधान्य भिजवून ठेवणं वगैरे,वगैरे.

आणि हो! प्रत्येक पदार्थ शिजवून तयार झाला की त्याची मला चव पहायला सागणं.मला ती म्हणायची,
“तुला त्याची चव आवडलीच पाहिजे असं नाही.पण त्याची चव आजमावली पाहिजेस.”
खरं सांगायचं तर,माझ्या आजीच्या ह्या सवयीची मी घृणा करायची असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये.अर्ध-कच्च शिजलेल्या मटणाची चव,कारल्याची शिजलेली भाजी वाटीत घेऊन त्यात गुळ-चिंच योग्य घातली गेली आहे का त्याची चव,अशा अनेक पदार्थांची चव घेऊन झाल्यावर तो पदार्थ मला क्वचितच आवडायचा.असा एखादाच पदार्थ मात्र मला आवडायचा.पण म्हणून माझ्या चव घेण्याच्या रिवाजावर माझ्या आजीने कधीच खंड आणू दिला नाही.

माझ्या कधीच लक्षात आलं नाही की,तिचा हा माझ्याकडून प्रत्येक पदार्थाची चव घेण्याच्या ध्यास कसा निर्माण झाला.समजा एखादा पदार्थ मला आवडतच नाही हे माहित असताना त्याची चव घेण्याच्या प्रयत्नचा अट्टाहास कशासाठी.मला असं वाटतं जर का,एखादा पदार्थ दिसायला इतका घटिया दिसला,त्याचा वास इतका घटिया होता तर मग त्याची चव नक्कीच घटिया असणार.असो.

नंतर माझं लग्न झालं.मी माझ्या सासरी गेल्यानंतर म्हणजेच माझ्या आजीपासून दूर गेल्यानंतर,ही पदार्थाची चव घेण्याची सवय अर्थात निघून गेली आणि मला जो पदार्थ आवडायचा तो खाण्यात मी आनंद घ्यायची.ह्या दिवसात मी कधीच आजीचा विचार केला नाही की परत ती मला जबरदस्ती करून चव घ्यायला लावील.

जशी वर्षं निघून गेली तशी ह्या अन्न खाण्याच्या चाकोरीत मी रहात होते.मी मासे मटण खाणारी,आणि मला माहित असायचं मला काय चवीचा तो पदार्थ आवडायचा.त्या बाहेर जाऊन निराळी चव घेण्याची मला जरूरी भासली नाही.

माझं लग्न झाल्यावर ते सुरवातीचे दिवस होते.आता तो प्रसंग आठवत नाही पण काही कारणास्तव आम्ही घरची सर्व मंडळी जेवायला म्हणून एका होटेलात गेलो होतो.
प्रत्येकाने आपल्याला आवडतात ते पदार्थ ऑर्डर केले.माझ्या नवर्‍याने तिसर्‍याची (शिंपल्याची) करी ऑर्डर केली.त्याला ती करी आवडायची.घरची गोष्ट निराळी होती.घरी आपल्या हाताने मासे साफकरून त्याचे केलेले पदार्थ मला आवडतात.पण बाहेर होटेलमधे केलेले नाही.आणि विशेष करून तिसर्‍याची करी.परंतु माझ्या नवर्‍याला बरं वाटावं म्हणून मी ती करी घेण्याचं धारिष्ट केलं.

पण अहो आश्चर्य! नवीनच लग्न झालेल्या नवर्‍यावर छाप पाडावी म्हणून म्हणा किंवा आणखी काही म्हणा,मी मोठं धारिष्ट करून,ती करी चाखायला मला खूप आनंद होत आहे असा तोंडावर अविर्भाव आणून एक चमचाभर करी मी माझ्या जीभेवर सोडली.मी अगदी चकित झाले.करीचा चमचा तोंडाजवळ नेल्यावर मसालेदार वास माझ्या नाकात गेला,त्या करीचा रंग बघून नक्कीच ती आंबट-तिखट असणार हे माझ्या नजरेतून सुटलं नाही.हे सर्व एकत्रीत झाल्याने मी खरंच सुखानंद खात आहे असं मला वाटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.माझ्या आयुष्यातली ही पहिली वेळ की ज्यावेळी बाहेर तयार केलेला एक स्वादिष्ट पदार्थ मी खात होते.

माझ्या आजीचे उद्गार माझ्या कानात घुमत होते.बाहेरचे मटण-माश्याचे पदार्थ मला आवडणारच नाही अशी समजूत करून मी विसंबून राहिल्याने अश्या स्वादिष्ट पदार्थाना मी मुकले होते.माझ्याकडून एव्हडी चूक कधीच झाली नव्हती.

ह्या प्रसंगानंतर एक मी ठरवलं. नेहमी परखून पहावं.काहीतरी नवीन गोष्ट अनुभवण्यासाठी, आपल्याला दिलासा देणार्‍या क्षेत्रातून, नक्कीच बाहेर पडून पहावं आणि काहीतरी नवीन अनुभवावं.तुम्हाला त्या गोष्टी पासून आनंद झालाच पाहिजे असं नाही.पण परखून पाहिलं पाहिजे.एकदम अपूर्व अनुभव,उत्तम काळ आणि अगदी सर्वात निकृष्टतम म्हणजे,जीवनातलं सर्वात उत्तम अन्न-खाद्य अन्यथा घालवून बसाल.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: