आत्मसन्मान असावा हे मला भावतं.

“जीवनाचा,निसर्गाचा आणि अन्य प्राणीमात्राचा सन्मान करून राहिल्यास जीवन जगण्यासारखं निश्चितच वाटेल.”…इति माझा पुतण्या.

त्याचं असं झालं,माझ्या एका जवळच्या मित्राच्या मुलाने आत्मसमर्पण केलं,जीव दिला.हे मला कळताच मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो.त्याच्या बरोबरोबर झालेल्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात आली की माझ्या पुतण्याची आणि त्या मुलाची मैत्री होती.त्या मुलाने असं का केलं ह्याचा उहापोह मी माझ्या मित्राकडे केला नाही.ते सर्व मला माझ्या पुतण्याकडून कळणं सोपं होतं.

माझ्या पुतण्याकडे मी विचारणा केली तेव्हा तो मला एव्हडंच म्हणाला की त्याने जीव दिला त्याला त्याची स्वतःची खासगी कारणं होती.आणि त्याची खासगी कारणं जरी माझ्या पुतण्याला माहित असली तरी त्याचा उहापोह दुसर्‍याकुणाकडे ही करणं प्रशस्त नव्हतं.असं माझ्या पुतण्याच्या बोलण्यावरून मला कळलं.

मी ही त्याच्याकडे जास्त ताणून धरलं नाही.पण नंतर जेव्हा माझ्या पुतण्याने मला जे सांगीतलं त्यावरून मी एक कयास काढला की,जीव देण्याची टोकाची भुमिका घेण्यापूर्वी त्याने माझ्या पुतण्याबरोबर बराच संवाद साधला होता.आणि माझ्या पुतण्याचा उपदेश त्याला तसं न करण्यापासून,त्याला परावृत्त करण्यापासून, यशस्वी झाला नाही.

ह्याची माझ्या पुतण्याला खूपच खंत वाटत होती.तरीपण मी नाराज न होण्यासाठी त्याने मला स्वतःचे विचार सांगीतले.
मला म्हणाला,
“अलीकडेच मी एक लेख वाचत होतो.त्यात म्हटलं होतं,
“जेव्हा काही लोक जीव देण्यासठी पुलावरून खाली नदीत उडी घेतात तेव्हा ज्यावेळी ते अर्ध्या मार्गावर असतात त्यावेळी त्यांच्या ध्यानात येतं की,आयुष्यातल्या अर्ध्या समस्यांचं निराकरण होऊं शकलं असतं.” असं ह्या विषयात अभ्यास करणारे त्यांनी जमवलेल्या आकड्यावरून दृष्टीपंथास आणतात.

कसंही असलं तरी मी ह्या टोकाला कधीच गेलो नसतो.परंतु,काही गोष्टी विषाद करण्यासारख्या निश्चीत असतात. परंतु,मी जर माझ्या जीवनात मागे जाऊ शकलो,तर माझ्या जीवनातली एकही गोष्ट बदलायला हवी असं मला मुळीच वाटणार नाही.मी जो काही आता दिसतो आहे,तो ज्या दिव्यातून मी गेलो आहे त्यामुळे आहे.

मला नेहमीच वाटतं की जीवनाचा नेहमीच सन्मान झाला पाहिजे.आणि जीवनाबरोबर निसर्ग आणि इतर प्राण्यांचासुद्धा सन्मान झाला पाहिजे.कारण आपल्याला कल्पना ही नसते की, त्यामुळे आपण किती प्रभावीत होत असतो.जीवनाला सन्मानीत करावं हे म्हणण्यासाठी मी एव्हड्यासाठीच प्रवृत्त होतो कारण,असं केल्याने जीवन सुखकर होतं.मुळातच मी माझे असलेले क्षण मला देतो.त्यामुळे ज्या गोष्टी बद्दल मी विचार करीत असतो ते करायला सोपं होतं आणि मी कोण आहे समजायला ज्या गोष्टी परिवर्तीत व्हायला हव्यात त्या व्हायला मला मदत होते.ह्याच कारणाने इतर गोष्टीपासून दूर राहून माझ्या मला संतुष्ट करून घ्यायला संधी मिळते.स्वतःला संतुष्ट करून घ्यायला कोणाला आवडणार नाही?तणावापासून दूर रहायला कुणाला आवडणार नाही.?असं राहिल्याने मला कशाबद्दलही विषाद रहात नाही.होय,मी चुका नक्कीच करतो आणि त्या करून त्यतून शिकतो त्यामुळेच मला मी घडवतो.

मला नेहमीच वाटतं की निसर्गाचा आदर केला जावा.कारण त्यामुळेच आपल्याला शांती,
प्रसन्नता मिळते आणि जीवन तणाव विरहीत रहातं.म्हणूनच अधुनमधून निसर्गाच्या सानिध्यात रहावं. कौटूंबीक कटकटी,कष्ट नातीगोती यांच्या समस्यापासून दूर रहायला मिळतं.फक्त आपल्या आपण.निसर्गाशी संवाद साधल्याने आराम मिळतो आणि तणाव निघून जातो.शिवाय निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छ हवा आणि सूर्याच्या उन्हात व्हिट्यामीन “डी” मिळते ते अलायदा.

मी कुठेतरी वाचलंय की,प्राण्यांना आणि वन्य-प्राण्यांना नाहक पीडा दिली जाते.दुर्दैवाने हे प्राणी मुके असतात. परंतु त्यांना नक्कीच भावना असतात शिवाय त्यांना वेदना पण होतात.जशा आपल्यालाही होतात.अशावेळी आपण त्यांना आपलंसं करून राहिलं पाहिजे.निसर्गानेच आपलं जीवन सुखकर व्हावं म्हणून त्यांना सहचर्य दिलंय.

शेवटी एव्हडं म्हणावंस वाटतं की,जीवनाचा,निसर्गाचा आणि अन्य प्राणीमात्राचा सन्मान करून राहिल्यास जीवन जगण्यासारखं निश्चितच वाटेल.”

माझा पुतण्या जे काही सांगत होता ते मला पटलं.शिवाय चर्चेच्या ओघात मला म्हणाला होता की,तो मुलगा एकलकोंडा सवभावाचा होता.त्याला जास्त मित्र नव्हते.त्याला वाटतं तेच बरोबर आहे असं त्याला वाटायचं. अशी जीवनशैली नसायला हवी होती वगैरे वगैरे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: