आशावंत समिर.

“आजतागायत मी सर्व काही संपलं अशा परिस्थित असतो तेव्हा वर आकाशातले तारे पहात बसतो आणि पुन्हा आशावंत होतो.”

समिर मनाचा हळवा आहे.तो म्हणण्यासारखा मोठा होईतो त्याला स्वतःचा निर्णय घ्यायची कुवत नव्हती. जरासा जरी मनावर तणाव झाला की बिच्यार्‍याची पंचाईत व्हायची.
मला म्हणाला,
“माझा हा असला स्वभाव मला माहित होता.जीवनात मोठं मोठं होत असताना,येत असलेले अनुभव आणि त्यातून येणारी संकटं सोडवायला काही ठोस गोष्टी शिकल्या गेल्या आहेत त्याचा वापर करून संकट मुक्त,तणाव मुक्त होता येतं हे अलीकडेच मला जाणवलं.”

समिरची गोष्ट मला जरा रंजक वाटली.त्याला क्षणाचीही उसंत न देता मीच त्याला म्हणालो,
“बोल,बोल तुझ्याकडून मलाही काही शिकता येईल.”

मला हसत हसत समिर म्हणाला,
“तुम्हाला मी सांगणार आहे ते माझं म्हणणं थोडं हास्यासकारक वाटेल,पण मी मात्र त्यातून तणाव मुक्त होतो हे निश्चित.

अगदी बरेच वेळा,मी माझ्याबद्दल आकलन केलं आहे की,मी अनेकदा संकटात गुरफटून गेलो आहे.आणि बरेचवेळा त्याचं कारण असतं सहन न होण्यासारखा मनातला तणाव.मी जरूरी म्हणून शहरात जरी रहात असलो तरी माझ्या घरच्या मंडीळीकडून अर्थात कोकणातून एखादा फोन आला की मनात कचरतो.एखादी भयंकर बातमी कानावर येते की काय म्हणून भयभयीत असतो.कधी कधी रात्रीची झोप येत नाही. आणि त्याचं कारण दुष्ट विचार मनात येत रहातो “जर का?” सारखा.अशावेळी मी झोपेची वाट न पहाता गच्चीवर जातो आणि सरळ चांदण्याने भरलेल्या आकाशाकडे टक लावून एकाग्र होऊन पहात असतो.कारण मनात भीती असते की माझ्या डोळ्यातून येणार्‍या आसवांकडे कुणी पाहिलं तर?.

मी चांदण्याकडे बघून मनात समाधानी करीत असतो की जरी माझी आशा काळोखात गडप झाली आहे तरी सदैव ती चांदण्यासारखी चमकत राहिन. मला नेहमीच वाटत असतं की चांदण्यांचं लुकलुकणं समज देऊन जातं की जीवनात कुठेतरी आशेचा क्षीण प्रकाश असतोच जरी कितीही बिकट प्रसंग आला तरी.

मला माझी लहानपणची गोष्ट आठवते.असेन मी पंधराएक वर्षाचा.एकदा आमच्या पी.टी.टिचरनी आम्हाला असं सांगीतलं की,तुम्ही सर्व आजचा एक दिवस पूर्णपणे स्वतःला कमीतकमी आठ तास एकांतात ठेवून बघा तुम्हाला काय वाटतं ते.ही तुम्हाला मी एक नियुक्ति देत आहे असं समजा.

कोकणात अशा खूप टेकड्या आहेत आणि त्यावर फिरायला म्हणून बरेच लोक जात येत असतात.पण मी एक टेकडी अशी शोधून काढली की तिकडे विशेष कोण फिरकत नाहीत.कारण त्या टेकडीच्या माथ्यावर एक हिंदूंचं स्मशान आणि मुसलमानांचं कबर-स्थान होतं.मला वाटलं मला अशा ठिकाणी जाऊन बराच एकांत मिळेल.

संध्याकाळची ती वेळ होती.सूर्य अस्ताला जाण्याची मी वाट पहात त्या ठिकाणी बसलो होतो.अखेरीस तो सूर्य क्षीतीजा पलिकडे गेला हे पहात असताना सर्व आसमंत किती विशाल आहे हे माझ्या लक्षात आलं.पावसाळा संपून गेला होता तरीपण आकाशात ढग विखुरलेले दिसत होते.त्यामुळे पहिली चांदणी दिसायला थोडा काळ निघून गेला होता.एकदा सूर्य पूर्ण अस्ताला गेला आणि आकाश निरभ्र झालं तेव्हा इतके तारे आणि चांदण्या दिसायला लागल्या की मी चकित होऊन गेलो होतो.

माझ्या पी.टी. टिचरनी आम्हा सर्वाना हे कार्य का दिलं याचं विश्लेषण देण्यापूर्वी मी समजून गेलो होतो.कारण उघडच होतं की,अशी जागा शोधून काढायला हवी होती की,कोणत्याही एका किंवा अनेक रोजच्या आकर्षण करणार्‍या गोष्टी पासून दूर राहून पहावं म्हणून.निसर्गाचा आपल्या पाचही संवेदनावर कसा परिणाम होत असेल ते पहावं म्हणून.आपण आपलं आत्मनिरीक्षण कसं करून घेतो ते पहावं म्हणून.

बर्‍याच महिन्यानंतर ह्या आत्मनिरीक्षण करून घेतलेल्या धड्यानंतर एकामागून एक येणार्‍या शोकांतिकामधे  पहिली एक शोकांतिका झाली ती म्हणजे माझ्या आजीच्या आजाराची.मनुष्याचं रहाणीमान बरचसं सुधारल्यामुळे आयुरमानसुद्धा वाढत आहे.माझी आजी आता नव्वद वर्षाची झाली होती.तिला मेंदूचा रोग झाला होता.ती सर्व गोष्टी विसरत चालली होती.माणसांची ओळख सुद्धा.आता माझ्या आजीचं जगणं, जगून असल्या-नसल्या सारखं झालं होतं.

डॉक्टरानी आपलं मत दिलं होतं की,हा रोग सद्धयातरी सुधारता येत नाही.त्यावर काही औषध मिळत नाही. आजीचे हाल मला पहावत नव्हते.मी तिच्या शेजारी बसून रहायचो.आणि रात्री आजी जेव्हा झोपी जायची त्यावेळी मी हळूच उठून बाहेर अंगणात यायचो.शहरात तारे पहायला मला एकांतासाठी गच्ची होती इथे मात्र तेव्हडीच शांतता माझ्या आजोळच्या अंगणात मिळायची.मी खाट टाकून बसयाचो आणि वर आकाशाकडे लक्ष केंद्रित करायचो.आकाशातले तारे पाहून मला मन:शांतता मिळायची.थोड्या दिवसानी माझी आजी गेली.तिला आता कायमची शांतता मिळणार आहे हे मनात येऊन मी ही शांत व्हायचो.मृत्यु हा पीडीत व्यक्तीचा खरा मित्र असतो हे म्हणणं मला खरं वाटायला लागलं.कारण त्यानेच बिचारीला त्या पीडेतून सोडवलं.

जरी अडखळत का होईना मी ह्या शांततादायी जागेची महती जाणवू शकलो तरी एखादेवेळी पीडीत परिस्थितीशी दोन हात करायची पाळी आल्यावर “पुरूषासारखा पुरूष व्हावं”हे माझ्या बाबांचं सांगणं मला समजायला लागलं.पण हे बाबाचं सांगणंसुद्धा मागे पडलं जेव्हा मी माझ्या बाबांनाच एकदा त्यांच्या खोलीत रडताना पाहिलं.त्यांच्या हातात माझ्या आजीचा फोटो म्हणजेच त्यांच्या आईचा फोटो होता.
मी ही पाहिलेली गोष्ट माझ्या बाबांकडे कधीच उघड केली नाही.पण त्या क्षणी माझ्या एक लक्षात आलं की माणूस कितीही कणखोर असला तरी जीवनात एकदा तरी त्याला रडायची पाळी येते.

निराश व्हायला सोपं असतं पण निराश व्हायची संधी ही सोपी असते.आजतागायत मी सर्व काही संपलं अशा परिस्थित असतो तेव्हा वर आकाशातले तारे पहात बसतो आणि पुन्हा आशावंत होतो.”

समिरचं हे सर्व ऐकून घेतल्यावर मी समिरला म्हणालो,
“विचार करण्यासारखी तुझी ही गोष्ट हे नक्कीच.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

 

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: