नवखा

“एकमेकात दोस्ती सांभाळल्याने जगातल्या सर्व समस्या काही सुटत नसाव्यात पण निदान,शालीनता आणि मित्रत्व असल्याने शत्रुत्व तरी तयार होत नाही.”….इति रमाकांत

सैन्यात भरती झालेले माझे बरेचसे मित्र मला अधून मधून भेटत असतात.ह्या लोकांकडून एक घेण्यासारखे म्हणजे सैन्यात राहून ह्यांच्या आयुष्यात शिस्त,धडाडी,प्रकृती धडधाकट ही वैशिष्टं अवश्य असतात.परंतु,माझा एक सैनिक मित्र रमाकंत धूरी जरा वेगळाच होता.जणू काय सर्व सौनिक मित्र करून घ्यायला कमीच पडले म्हणून की काय रमाकांत रजेवर असल्यावर सर्व साधारण जनतेत वावरताना नवखा माणूस दिसला की त्याला मित्र करून घ्यायला झपाटलेला असतो.

मला रमाकांत म्हणाला,
“जो,जो मला भेटतो तो माझा मित्र आहे असं मी समजत असतो.नवखा मात्र नवखेपण सोडून दुसरं काहीही असतो. अशा नवख्याशी जरी दहा मिनिटं बोलणं झालं तरी माझा असा समज होऊन जातो की काही पक्वान खाण्याची अपेक्षा करून जावं आणि पिठलं भात मिळावा आणि तो खाल्याने जशी समाधानी होते अगदी तसं वाटतं.
मी ज्यावेळी सैन्यात भरती झालो,तेव्हा माझ्या लक्षात आलं की,सच्च्या नवख्याशी बोलायची मी इच्छा ठेवली तरी सैन्यात तशी व्यक्ती मिळणं कठीण कारण ह्या ठिकाणी अगदी एखाद्या विचित्र वागणार्‍याची निरागसता किंवा त्याचं एखादं बिंग पसरलेलं असतंच. त्या अनुभवामुळे माझ्यात एकप्रकारची प्रतिबंधता आणि शिष्टपणा आला.सैन्य
म्हणजे एक प्रकारचं खिचडीचं भांड असतं आणि त्या भांड्यात भरपूर चविष्ट आणि आकर्षक खिचडी असते तसं. प्रत्येक सैनिक आपआपल्यापरिने खिचडी रुचकर करण्याच्या प्रयत्नात असतो.मी ह्या वातावरणात मग्न होण्याच्या प्रयत्नात असतो.ती खिचडी संपन्न करावी की ती खपवून घ्यावी ह्या प्रयत्नात असतो.

सैन्यात थोडे दिवस काम केल्यावर थोडे दिवस विश्रांतीसाठी रजा मिळते.अशी रजा मिळाल्यावर मी आणि माझी पत्नी कुठेतरी नविन गोष्टी पहाण्याच्या शोधात असायचो.
कोकणात कितीतरी गावात सृष्टीसौन्दर्य पहायला मिळतं.ह्यावेळी चिठ्या टाकून निवडलं जाईल त्या गावात जायचं ठरलं.असंच एक गाव निवडलं.वरती नीळं नीळं आकाश आणि खाली हिरवेगार डोंगर हे दृश्य पाहून आणि त्यामधला विरोधाभास पाहून माझ्या मनात त्याबद्दलची उज्वल चित्रं उभी राहिली.आणि माझ्या संवेदना जास्त तीव्र झाल्या. आंब्याच्या झाडांच्या बनातून पुढे पुढे जात असताना काही अर्धे पिकलेले आंबे झाडाच्या मुळाशी पडलेले होते आणि त्यावरच्या गोड रसावर ताव मारण्यासाठी घोंघावणार्‍या माशांचा आवाज मला स्पष्ट ऐकायला येत होता.आंब्याच्या बनामधून बाहेर पडल्यावर लांबच लांब जाणार्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवे-गार भात-शेतीचे मळे पहात असताना एका उंचवट्याच्या जागी एक छोटसं मंदीर दिसत होतं.मंदिराच्या बाहेर आल्यावर गवत कापल्यावर वास येतो तसा तांदळाच्या लोंब्यानी वाकलेल्या रोपांचा वास वार्‍याच्या झोतीबरोबर मंदिरात शिरत होता.आजुबाजूला इतकी शांतता होती की आमच्या दोघांचं त्या देखाव्या संबंधाने स्तुतीसदृश्य बोलणं त्या शांततेचा भंग तर करीत नाहीना असं आम्हाला वाटलं.

मारुतीच्या देवळात थोडावेळ बसावं असं वाटलं.माझी पत्नीपण माझ्याशी सहमत होती.तेव्हड्यात एक आजीबाई आमच्याजवळ येताना पाहिली.आजी म्हणावी तसे तिचे डोक्यावरचे सर्व केस पांढरे शुभ्र होते.तोंडावर थोड्याश्या सुरकुत्या दिसल्या.तिने आमची चौकशी केली आणि म्हणाली,
“मी ह्या मंदिराचं रोजच साफ-सफाईचं व्रत करते.ह्याला खूप वर्ष झाली.तुमच्यासारखे नवखे किंवा अनोळखे मंदिरात आले की मी नेहमी त्यांना थोड्यावेळासाठी आमच्या घरी यायला विनंती करते.तुम्ही याल का?”

सुरवातीला मी थोडा चिंतीत होतो पण माझ्या पत्नीचा रुकार बघून आम्ही ह्या आजीच्या घरी गेलो.आजीच्या मुलीने आमच्यासाठी थोडा नाश्ता तयार केला आणि आम्ही तो रुची घेत खाल्ला.आणि जाताना त्यांनी आम्हाला पिशवीभरून आंबे दिले.
आम्हा दोघांना त्या आई-मुलीने दिलेला आदर सत्कार पाहून आम्ही खजिल झालोच शिवाय ती दोघं आम्हाला आणि आम्ही त्यांना नवखे असूनही थोड्या काळापुरता त्यांच्या जीवनात आम्हाला त्यानी सामावून घेतल्याबद्दल आम्हाला रहावलं नाही.जाता जाता मी माझ्या खिशात हात घालून मिळतील तेव्ह्ड्या सुट्या नोटा बाहेर काढून तिच्या हाताच्या ओंजळीत ठेवून मी तिचे दोन्ही हात दाबून धरले.आणि सद्गदीत झालो.

चिठ्ठीतून सुचवलेल्या ह्या गावात आम्ही सहलिला येऊन एक नवीनच अनुभव घेऊन जात आहो ह्याबद्दल विशेष वाटून निघताना आम्ही त्यांना हसमुख चेहर्‍याने अलिंगन देऊन घरी परतलो.

ह्यानंतर मला नवखा असा कोणीच भेटला नाही.ग्रोसरीच्या दुकानात,बाजारात,एखाद्या रेस्टॉरंटमधे किंवा अन्य कुठेही कुणी भेटला की मी पुढाकार घेऊन त्याच्याशी संवाद साधतो.खिचडी रुचकर व्हावी ह्या प्रयत्नात मी असतो.कुणी नवखा दिसल्यास त्याच्याशी आपणहून बोलायचा धीर करायचा नाही हा विचारच माझ्या मनातून गेला आणि त्या नवख्याबरोबर बोलण्याची एकप्रकारची निकड तयार होऊन त्या नवख्याशी कसा समन्वय साधावा ह्या प्रयत्नातमी असतो.माझ्याकडून होणार्‍या संक्षिप्ततेमुळे, काही थर उचकलेले जातात हे असे थर जे ह्या जगाकडून आणि ह्या समाजाकडून आपल्यावर बोज्याचा स्वरूपात भार समजून टाकले जातात आणि सहप्रवाशाबरोबर होणार्‍या घनिष्ठ नात्यात चकाकी आणण्यासाठी अनुमती देण्यात कारणीभूत होतात.

सर्व स्थरातल्या लोकांकडून,दिवसांशी,मार्गांशी,जागांशी,गोष्टींशी आणि क्षणांशी आपण सहभागी व्हावं अशी उत्सुकता दाखवली जते.आणि हे मला फारच भावतं.नवख्याशी सलगी करताना मी काळजी घेत असतो की कुठे मी अनुरूप होईन आणि ते सुद्धा अशा तर्‍हेने की कुणाच्या निष्कारण अंतस्थात शिरणार नाही. बोलण्यात अगदी संक्षिप्त
राहून हवं तेव्हडंच बोलून झाल्यावर मी एक नवा मित्र मिळवला ह्याचं मला समाधान होऊन बरं वाटतं.बरं वाटून घ्यायलासुद्धा अलीकडे किंमत द्यावी लागते.एकमेकात दोस्ती सांभाळल्याने जगातल्या सर्व समस्या काही सुटत नसाव्यात पण निदान,शालीनता आणि मित्रत्व असल्याने शत्रुत्व तरी तयार होत नाही.आता मी नवख्याशी हसायचा
प्रयत्न करतो,निष्कारण भयभीत होत माही आणि त्या आजीला आणि तिच्या मुलीला त्यांनी केलेला नाश्ता फार रुचकर होता हे ही सांगायला विसरत नाही.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

मध्य-आयुबद्दल

एकमेकासाठी आपण काय करीत असतो.

शरद निवृत्त झाला हे मल माहित नव्हतं.कारण तो अजून साठ वर्षाचा झाला नव्हता.पण माझं चुकलं. काही कंपन्यात अठ्ठावन वर्षावर निवृत्त करण्याची पॉलिसी असते.

मी शरदला म्हणालो,
माझं चुकलं.साठ वर्षावर निवृत्त होणं हा एक नियम झाला होता.पण जशी वस्ती वाढायला लागली तशी उमेदवारी वाढायला लागली आणि हे स्वाभाविक आहे.आणि त्यावर उपाय म्हणूनच अशी लवकर निवृत्त करण्याची पॉलीसी व्हायला लागली असावी.

मध्य-आयुबद्दल (४० आणि ६० वय) एक सांगायचं म्हणजे,जर कुणी नीट विचार करणारा असेल तर,त्या व्यक्तीच्या एक गोष्ट लक्षात आल्यावाचून रहाणार नाही की,ज्या ज्या गोष्टी होणार असं त्याच्या मनाला वाटतं,त्या नक्कीच होत नाहीत.

खूप कष्ट घ्यावेत म्हणजे यशस्वी व्हायला होतं—–कदाचित.

आपला पैसा-आडका जर का व्यवस्थीतपणे देखभाल कराल तर तुम्ही कधीच कर्जबाजारी होणार नाही—- कदाचीत शक्य आहे.

प्रेम-विवाह करा आणि तुम्हाला कधी ही पस्तावा होणार नाही.—-होईल किंवा होणार नाही.”

हे माझं ऐकून शरद मला म्हणाला,
“मध्य-आयु हा असा एक शोध आहे की,सर्व काही तुम्हाला कळत असतं असं वाटणं. आणि हे खरं आहे असं मुळीच नाही तर असं प्रकटीकरण आहे की वास्तवात तुम्हाला काहीच कळत नाही.”
काही थोर लोक असं सूचीत करतात की,हे वय बुद्धिचातुर्य़ दाखवण्याची सुरवात आहे.पण ज्या क्षणी माझ्या धान्यात आलं मला खरंच काही माहित नाही त्यावेळी ते भयावह जाणवलं.ज्या व्यक्ती मला माहित आहेत अशी माझी समजूत होती,ज्यांच्यावर माझा विश्वास होता आणि त्यांना मी मानायचो तेच अप्रामाणिक आणि ढोंगी ठरले.
ज्या लोकांचं मी खंडन केलं होतं की, ते बुद्धिने कमी आहेत,शिक्षीत नाहीत शिवाय काहीकरून गौण आहेत,अशाच लोकांवर कुठच्याही क्षणी विश्वास ठेवण्यासाठी ते पात्र आहेत,असं माझ्या लक्षात आलं.”

मला हे शरदचं म्हणणं खूप आवडलं.चटकन मला आठवलं ते त्याला म्हणालो,
कुणीतरी म्हटलंय की,
“माझं अर्ध आयुष्य मी ज्याना सोनं म्हणावं त्यांना कमी लेखीत गेलो आणि जे क्षुल्लक होते त्यांची प्रशंसा करण्यात घालवलं.”

“गेल्या दहा वर्षाच्या आयुष्यात मी डोकावून पाहिल्यावर मला ध्यानात आलं की,ज्यांच्यावर माझी मदार होती,ज्यांचा मी आदर करायचो तेच अपयशामुळे,व्याधीमुळे आणि निधनामुळेसुद्धा कुचकामी झाले.”
शरद सांगत होता.

तो पुढे म्हणाला,
आता वय वर्ष अठ्ठावन असून सुद्धा माझ्या ज्ञानात बर्‍याच गोष्टींचा आभाव आहे,मात्र एव्हडं सोडून—-
जे आपण एकमेकांसाठी करतो ते फार महत्वाचं असतं शिवाय ते टिकाऊ असतं.
जवळच्या आजारी आप्तासमवेत राहून त्याची जमेल ती सेवा करणं.
संकटात असलेल्या आप्तानां दिलासा देऊन त्यांच्या चौकशीत रहाणं.
लग्नासंबंधाने हवालदिल झालेल्या आप्तला आधार देऊन त्यांचं संगनमत होई पर्यंत त्यांच्यासाठी मदतीचा हात देणं.
रडणार्‍याला आपल्या खांद्याचा आधार देणं,सहानभूतीचा कान देणं,थोडक्यात जो अत्याधिक तीव्र परिस्थितीत आहे त्या जवळच्याना भक्कम आधार देणं.”

चर्चा संपवताना मी शरदला म्हणालो,
“शेवटी एव्हडंच मी म्हणेन की,एकमेकांसाठी जे काही केलं जातं त्याचीच खरी गणना होते.माझ्या मते हे तितकच खरं आहे.आणि माझा त्यावर विश्वास आहे.”

शरद माझ्याशी शंभर टक्के सहमत झाला हे सांगणे न लगे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

हा ही क्षण निघून जाईल.

“हा ही क्षण निघून जाईल.हे वाक्य माझं ध्यान खेचतं.” रघूनाथ नव्हेतर अण्णामास्तर मला सांगत होते.

रघुनाथाला अण्णामास्तर म्हणतात हे मला ह्या पूर्वी माहित नव्हतं.
त्याचं असं झालं,ह्यावेळी मी कोकणात गेलो होतो तेव्हा ठरवलं होतं की,रघुनाथाला ह्यावेळी नक्कीच भेटून यायचं. मागच्या खेपेला मी कोकणात गेलो होतो आणि त्याला कुणीतरी मी आल्याचं सांगीतलं होतं.तो माझी वाट पहात होता.पण मला त्यावेळी वेळ मिळाला नाही.कारण पुढच्या खेपेस कोकणात आलास तर मला भेटून जा, तुला
भेटण्याची मला खूप इच्छा आहे असा त्याने मला निरोप पाठवला होता त्यावरून मी अंदाज केला.

मी एस.टी.तून उतरून आजुबाजूला पाहिलं,रघुनाथ ज्या गावात रहात होता त्या गावाचा अगदी कायापालट झालेला मला दिसला.मी ही तसा बरेच वर्षानी रघुनाथच्या गावाला आलो होतो.लहानपणी मी पाहिलेलं ह्या गावाचं सृष्टीसौन्दर्य आणि आताचा कायापालट, सहाजिकच बदलत्या जमान्याप्रमाणे होता.नंतर मी जेव्हा गाव फिरून आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की,मुळचे काही देखावे तशेच्यातशेच होते.ते पाहून बरं वाटलं.

एस.टी.तून उतरल्यानंतर मी जवळच्या एका पानपट्टीच्या दुकानात जाऊन रघुनाथाच्या पत्याबद्दल चौकशी केली. गावातले लोक इतके प्रेमळ की रघुनाथ म्हणताना त्याचा नामोच्चर होताच आणखी दोघे चौघे माझ्या जवळ आले आणि एकाने मला विचारलंही की,रघुनाथ म्हणजे तुम्ही अण्णामास्तरांबद्दल चौकशीत आहात का?
त्यांच्या एकंदर सांगण्यावरून मी रघुनाथ म्हणजे अण्णामास्तर हे जाणलं.मी हो म्हणताच एक बंदा माझ्याबरोबर मला घर दाखवायला आला.

रघुनाथाच्या घराच्या बाहेर एक पाटी होती त्यावर लिहलं होतं,
“हा ही क्षण निघून जाईल.”
ह्या वाक्याचा अर्थ आणि कोणत्या संदर्भाने ते वापरलं आहे हे विचारण्यापूर्वी मी रघुनाथाला विचारलं की तू अण्णामास्तर ह्या नावाने गावात ओळखला जातोस हे कसं?
रघुनाथ मला म्हणाला,
“मला पूर्वीपासून समाजकार्य करण्याची आवड होती ते तुम्हाला माहित आहेच.मी माझा हा गाव सोडला नाही आणि इथेच कार्य करण्याचा ठरवलं.शिक्षण क्षेत्रासंबधाने काहीतरी गावात करावं ह्या इर्षेने मी गावात शाळा बांधल्या.आणि काही वर्गात शिकवायला पण लागलो कदाचित त्यामुळेच मला इकडे अण्णामास्तर म्ह्णून लोक ओळखायला लागले असावेत.गावात शाळा बांधण्याचं वेड मुख्यत्वे माझ्या आजोबांकडून झालेल्या संस्कारातून जन्माला आलं.”

रघुनाथ सांगत होता आणि मी ऐकत होतो.इतकं समाज कार्य केलेला माणूस अनुभवसंपन्न नक्कीच असणार हे माझ्या मनाने पक्कं केलं.म्हणूनच मी निमूटपणे तो काय सांगत होता ते ऐकत होतो.

“हा ही क्षण निघून जाईल.हे वाक्य माझं ध्यान खेचतं.” रघूनाथ नव्हेतर अण्णामास्तर मला सांगत होते.
“जेव्हा,जेव्हा,मी आनंदाने भारावून गेलेला असतो किंवा मला वैष्यम्याने पक्कं गाठलेलं असतं तेंव्हा.एखाद्या क्षणाचं मला गोड कौतूक करायला आवडतं पण म्हणून तो क्षण माझ्या मनात घर करून ठेवणं मला भावत नाही.एखादी संवेदना उराशी बाळगावी असं वाटतं पण ती संवदेना माझा ताबा घेईल असं मी करूं देत नाही.

मनोभाव व्यक्त करणारे आणि निघून जाणारे, क्षण पाहून मला एक बाब उघड झाली आहे की जीवन इतकं अपूर्ण असतं की त्याचा क्षोभ करण्यात अर्थ नाही.वेळेची क्षणभूंगरता मी बरेच वेळा अनुभवण्यात साक्षी आहे. मुख्यत्वे,माझ्या आजोबांचं निधन मला ती क्षणभंगूरता स्विकारण्यास कारणीभूत झाली.माझे आजोबा गेल्यानंतर बरेच दिवस मी त्यांची आठवण आल्यावर मुसमुसून रडायचो.पण नंतर माझ्याच मनाला मी समजावलं की,मृत्यु हा जीवनाचं एक अंग आहे.

माझ्या आजोबांची वेळ आली आणि गेली. परंतु,त्यांचं बरचसं मोठं असलेलं अस्तित्व अजून बरंचसं फळत-फुलत आहे.माझ्या आजोबाबाबत मी जितका खोलात जात होतो तितकं मला ध्यानात येऊ लागलं होतं की माझे आजोबा आपल्या जीवनात ओतप्रोत क्षमतेने भारलेले होते.दुसर्‍यांबद्दल आदर ठेवण्यात त्यांना अतिशय आनंद व्हायचा.मी
त्यांच्या संगतीत असताना शिकण्याबद्दल प्रेम असावं हा संदेश माझ्या मनात त्यांनी कोरून ठेवला होता.काही कारणानें त्यांच्या बरोबरच्या क्षणांनी माझ्या अंतरात केव्हाच शिरकाव केला होता.

नंतर,माझ्या आजोबांना गमावण्याची माझ्या मनातली संकल्पना,माझ्या जीवनाची अंगभूत बाब व्हायला लागली तशी, “हा ही क्षण निघून जाईल” ही उक्ति मला माझ्या जीवनात जास्त मोलाची वाटायला लागली.जशी मित्रमंडळी,दोस्ती ह्वेत विरून जाऊ लागली,एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्याच्या प्रक्रियेत,भावनाप्रधान गोंधळ मनात येऊ लागला,आणि निरनीराळी नातीगोती उदयाला येऊ लागली तसं सर्व काही एकत्रीकृत व्हायला लागलं.आणि त्यातून मला एक तथ्य दिसून यायला लागलं की,माझ्या डोळ्यातले आनंदाश्रू वा दुःखाश्रू काळाच्या ओघात पारित होऊ शकले नाहीत.उलटपक्षी माझा इतरांबरोबरचा अनुभव त्यांच्यावर एक प्रकारची छाप टाकून जायचा.आणि ही
घटना कधी कधी मला बेचैनही करायची.

“हा ही क्षण निघून जाईल” ह्या उक्तिची माझ्या मनात पुनरावृत्ती होत राहिल्याने माझ्या मनोभावना निष्प्रभावित होऊ लागल्या.माझ्या त्या क्षणांवरचे जीवंत परिणाम उघड व्हायला लागले. जर का माझ्या मनावर वेदनांची कटकट व्हायला लागली की, मी भविष्याचा विचार करायचो आणि मनात म्हणायचो आनंदाचे दिवस नक्कीच येतील.
ह्या दृष्टीकोनामुळे मला मनोभावना नसल्याचं माझ्या मनात उल्लेखलं जात नव्हतं, तर मी समजून घ्यायचो की हे क्षण ऐहिक असण्याच्या पलीकडचे होते.

“हा ही क्षण निघून जाईल” ही उक्ति वेळो वेळी आठवणीत ठेवल्यामुळे,त्या क्षणाचा पुरेपूर ताबा घ्यायच्या प्रयत्नात मी असायचो.आत्म-स्तुतीचा त्यात लवलेश नसायचा.
इतरांच्या उन्नतिबद्दल उद्देश असायचा.फक्त एकच आशा करायचो की एकदा कधीतरी मला कुणीतरी समजून घेईल. माझ्या एक ध्यानात आलंय की,जीवनाचं सार हे वर्षानुवर्ष मजा करत करत जगण्यात नाही तर जीवनाच्या पश्चात, दुसर्‍यांसाठी विचार,कल्पना आणि कारुण्य किंवा कळवळा असण्यात जीवन खर्ची झालं,ह्याची आठवण,मागे राहिलेल्या लोकांत असण्यात आहे.
गम्मत म्हणजे,आत्ता मी तुम्हाला हे सर्व सांगत असताना हा ही क्षण निघून गेला आहे.”

रघुनाथाचं हे सर्व तत्वज्ञान ऐकून,
रघुनाथाला अण्णामास्तर असं का म्हणतात हे उलगडायला मला वेळ लागला नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

सूर्यप्रकाश आणि निरूपद्रवी कोलाहल.

“कधीकधी दुपारच्यावेळी,मऊ उशांवर पाठ टेकून बसल्यावर,बाजूला गरम गरम चहाचा कप ठेवून,पाडगावकरांच्या कवितेचं पुस्तक मांडीवर ठेवून कविता वाचताना,मधूनच मनात विचार डोकावतात की हे जीवन किती चमत्कारांनी भरलेलं आहे.”……इति सुधाताई.

सुधा वानखेडे माझी लहानपणाची मैत्रीण.सुधाला शिक्षणाची खूप आवड होती.ती शिकत गेली,शिकत गेली आणि शेवटी मराठीत एम.ए. झाली आणि एका कॉलेजात लेक्चरर म्हणून शिकवायला लागली.चिकाटी,हुशारी आणि सच्चेपणा ह्या गुणावर तिची त्याच कॉलेजात चांगली प्रगती झाली.शेवटी प्रो.सुधा वानखेडे म्हणून तिची नियुक्ती होऊन चाळीस वर्षाच्या शिक्षकी पेशानंतर निवृत्त झाली.

सुधाताईला मी प्रथम जेव्हा भेटलो तोपर्यंत ती निवृत्त होऊन जवळ जवळ महिना उलटला होता.सुरवातीची औपचारक चर्चा झाल्यानंतर विषय घेऊन तिच्याशी बोलायचं झाल्यास कुठचाही विषय अपुरा नव्हता.निवृत्ती नंतर तुझा वेळ कसा घालवतेस ह्याच विषयावर चर्चा केली तर कसं? असा विचार येऊन तेच मी सुधाताईला विचारलं.

सुधाताई मला म्हणाली,
“ह्या निवृत्तीच्या काळात एखादा क्षण शांतपणे चिंतन करण्यास मिळण्याची शक्यता असावी असं मला नेहमी वाटतं. दिवस, बराचसा वर आल्यावर मी घरात एकटीच असताना निरूपद्रवी कोलाहल असूनही शांतता मिळण्याचा हा क्षण मला अपेक्षित असतो.आमच्या शेजारच्या बिल्डींगमधे विद्यार्थ्यांचे क्लासीस घेतले जातात.हे विद्यार्थी
क्लासमधे शिरताना मोठ्यांनी बोलत असल्याचा आवाज आणि रस्त्यावरून जाणार्‍या गाड्यांचा खडखडाट आणि कर्कश आवाज येत असताना त्याच बरोबर सूर्याच्या उन्हाचा सर्वांवर होणारा परिणाम, सर्व कोलाहल काही प्रमाणात मंद करण्यात होतो.

घरातले सर्व आपआपल्या कामावर गेले की, ही जागा म्हणजे माझा शांत आश्रमच आहे असं मला भासतं.आणि त्यात खिडकीवर पडणारा सूर्यप्रकाश पडद्यातून डोकावून बघत उबदार ऊन माझ्या खोलीत आणतो.खरंच,मला सूर्यप्रकाश आणि निरूपद्रवी कोलाहल भावतो.

मी शांत बसलेली असताना आणि खिडकीतून आजुबाजूला न्याहळत असताना माझ्या मनात सतत विचार येतो की मनुष्यजातिचा हा उत्तेजित गतिक्रम किती विस्मयकारक आहे.समृद्धि,उन्नति आणि जीवनात सतत होणारा बदल ह्यानी भरलेलं हे जीवन उद्देशपूर्वक असतं आणि त्यात जोश ही असतो.परंतु,काही माझ्यासारखी मंडळी,शांत आणि
साध्या आनंदाच्या क्षणापासून, तसंच चिंतन करण्यापासून दूरावले जातात.मात्र सध्याच्या माझ्या उल्हासित जीवनात,हे असले क्षण अतिरिक्त आणि उत्कृष्ट अशा पैलूंची भर घालतात.

कधीकधी दुपारच्यावेळी,मऊ उशांवर पाठ टेकून बसल्यावर,बाजूला गरम गरम चहाचा कप ठेवून,पाडगावकरांच्या कवितेचं पुस्तक मांडीवर ठेवून कविता वाचताना,मधूनच मनात विचार डोकावतात की हे जीवन किती चमत्कारांनी भरलेलं आहे.माझी नातीगोती आणि ह्या समाजातलं माझं अप्रत्यक्ष योगदान काय असावं याचं मी चिंतन करते.
माझे मलाच मी मोठे मोठे प्रश्न विचारते.आणि त्या प्रश्नांना पूरी किंवा समाधानकारक उत्तरं क्वचितच मिळत असताना,ह्या सुखद क्षणांबद्दल ज्यात निरंतर विचार उत्पन्न होतात,ते क्षण माझ्या जीवनात एक प्रकारची समझ आणतात आणि सुखाने कंठलेल्या जीवनाबद्दल माझं मन शांत करतात.

एक मात्र खरं की,जशी माझीच मी चिंतन करते आणि ते सुद्धा माझ्या पूरतं करते,तेव्हा त्याचं जे येईल ते उत्तर माझ्यासाठीच असतं.अशावेळी मला होणारी दगदग आणि मनात होणारा सावळा गोंधळ हा जणुकाही, एखादा कॅनव्हासवर चित्र रेखाटत असताना,खर्‍या चित्राला आकार यायला अजून वेळ असताना सुरवातीचा त्या कॅनव्हासवर
फासलेला रंग काहीसा थपथपलेला मोठा ठिपका दिसातो आणि खर्‍या आकृतीला अजून आकारच आलेला नसतो, तसंच काहीसं वाटतं.

निवृत्त होण्यापूर्वीच्या जीवनात जसा फापट-पसारा असायचा,तसं आता मुळीच काही नसतं,उलट माझं मन एव्हडं विस्फारलेलं असतं की,पूर्वी जसं गुंता आणि गाठीमुळे हात बांधलेले असायचे आणि त्याचा परिणाम माझ्या महत्वाकांक्षी ध्येयाना आवरलं जायचं,तसं न होता,मी मला हवं तसं मनात वर्गीकरण करायला मोकळी असते.
ह्या चिंतन करण्याच्या क्षणात मला कधीही विलक्षण साक्षात्कार झाला किंवा अभूतपूर्व देवदर्शन झालं अशातला भाग नाही.उलटपक्षी,कधी कधी माझ्या नवर्‍याबरोबर उत्पन्न होणा्रे तणावपूर्ण प्रसंग प्रेमाने सुलझावले जातात,फावल्या वेळात काही तरी विषय घेऊन लेख लिहायला हुरूप येतो.

मी काही जगातली अगदी हुषार अशी बाई नाही,किंवा कुणी संतीण नाही.परंतु,सूर्यप्रकाशामुळे आणि निरूपद्रवी कोलाहलामुळे मी स्वतःचाच शोध लावला आहे आणि माझं जीवन सौन्दर्यासाठी आणि हिेतासाठी समर्पित केल्याचा आनंद घेतला आहे.”

सुधाताईने जेव्हा चर्चा संपवली तेव्हा असं वाटलं की त्यांनी ही चर्चा अशीच पुढे करत रहावी.त्यांनी मला सांगायला सुरवात केली आणि मला वाटलं की ज्यात शांत,निर्विकार आणि तत्वज्ञानविषयक माहिती आहे ती सांगायचा त्यांचाच अधिकार आहे.इतकी वर्षं शिक्षीका म्हणून जीवन जगल्याने,असंच काहीसं तत्वज्ञान त्यांच्याकडून अपेक्षित होतं असं म्हटलं तर वावगं होणार नाही.

मी सुधाताईना म्हणालो,
“सुधाताई,तुझा स्वत:बद्दलचा तू लावलेला शोध समजायला मला वेळ लागला नाही.
सूर्यप्रकाश येण्यापूर्वी तुला घरातून कॉलेजला जायला पाय काढावा लागायचा आणि दिवसभर विद्यार्थ्यांचा निरूपद्रवी कोलाहल सहन करावा लागायचा.आणि हे कमी नाही, गेली चाळीस वर्ष असं चालंय.आता निवृत्त झाल्यावर सूर्यप्रकाश तुझ्या जास्त परिचयाचा झाला आहे आणि कोलाहलाशी तू अपरिचीत राहिली आहेस.म्हणूनच तुला
सूर्यप्रकाश आणि निरूपद्रवी कोलाहल भावतो. म्हणूनच तुझ्या निवृत्तीच्या चिंतन काळात तुला तुझं जीवन सौन्दर्यासाठी आणि हितासाठी समर्पित केल्याचा आनंद होत आहे.आणि ते स्वाभाविक आहे.बरोबर ना?”

सुधाताईचा खजिल झालेलेला चेहरा पाहून माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

“Trust but verify”.(विश्वास ठेवा पण खात्री करून)

“तुम्हाला जे भावतं,ते तुमच्या अंतःकरणापासून असतं.आणि ज्याचा तुम्ही विचार करता किंवा जे तुम्हाला जाणवतं ते वरवरचं असतं”

प्रमोदला भेटल्यावर त्याच्याशी कोणत्या विषयावर बोलायला ह्वं हे मला चांगलंच माहित होतं.प्रमोद एक तत्वनीष्ट माणूस.आयुष्यात जगण्यासाठी माणसांची स्वतःची म्हणून काही तत्व हवी असतात असं तो नेहमी आवर्जून सांगत असातो.
ह्यावेळी त्याच्याशी चर्चा करताना मी त्याला म्हणालो,
“हे बघ प्रमोद,माणसाने तत्वनीष्ट असावं ह्यात वाद नाही.पण मला असं वाटतं की,काही वेळेला आपली तत्व गुंडाळून ठेववी लागतात आणि त्याचं कारण परिस्थिती असू शकते.अशावेळी,वास्तविकता आडवी येते.तेव्हा आपल्या तत्वांना काहिशी मुरड घालावी लागते.मला वाटतं तु माझ्याशी सहमत असशील.”

प्रमोद मला म्हणाला,
“मी तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे.माझी मतं मी मांडतो”
असं म्हणून प्रमोद मला पुढे सांगू लागला,

“तुम्हाला जे भावतं,ते तुमच्या अंतःकरणापासून असतं.आणि ज्याचा तुम्ही विचार करता किंवा जे तुम्हाला जाणवतं ते वरवरचं असतं. मला जे भावतं त्याबद्दल मी कल्पना करीत असतो.मला म्हणायचं आहे की,त्यात माझी श्रद्धा एव्हडी तीव्र असते की,मी नेहमीच त्याचं समर्थन करतो.मग कोणतीही परिस्थिती असो किंवा कोणताही प्रसंग येवो.
काहीसं म्हणतात ना,
“आजच्या दिवसासाठी एव्हडं बस,उद्या काय होणार आहे ते “उद्या” ठरवील.”
ह्या म्हणण्यावर माझा पूरा विश्वास आहे.जेव्हडं म्हणून असंतोषजनक व्यक्तींशी मी क्रय-विक्रय करतो,जे स्वतःशी आणि इतरांशी असंतोषजनक असतात,अशाना भूतकाळात काय झालेलं असतं ह्याची जाणीव नसते,परंतु,अशा व्यक्ती भविष्याबद्दल आवेशपूर्ण स्वारस्य घेत असतात,आणि स्वेच्छापूर्वक वर्तमानकाळाला सामोरं जायला नकार देत
असतात.

ह्या क्षणाला खरंच काय होतंय हे समजणं माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे, असं मला नेहमीच वाटत असतं. जगात आणखी कुठे काय होतंय,मग ते राजकारणात असो वा समाजकारणात असो ते माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं नाही.त्याचा अर्थ जे होतंय ते न समजल्याने माझ्यात काही फरक होणार नाही असं नव्हे.कदाचित फरक होणं संभव आहे.परंतु,मला आत्ता काय होतंय हे कळण्याने आणि त्याचा नीट विचार करून पाहण्याने ह्या जगात जिथे मी रहात आहे,त्या जगात मी राहू शकतो का? हे पहाणं माझ्या दृष्टीने मला समाधानकारक वाटतं.

माझ्या क्षमतेप्रमाणे अगदी संपूर्णपणे आजच्या दिवशी जगणं हे मला महत्वाचं वाटतं.माणसाचे परिश्रम,नियोजन करण्यात आणि चिंतन करण्यात,वाया जात असतात.ह्याचं कारण,मला काही मंडळी अशी ही दिसतात की जी काल्पनिक जगात जगतात आणि ती ही त्यांच्या भविष्यात जगतात.अगदी सरतेशेवटी नीट विचार केला तर, त्यातून मला असं दिसून येतं की एखाद्याला जर का,दुसर्‍या कोणत्याही व्यक्तीला,किंवा व्यक्तीवर सहजपणे काही करायचं
झाल्यास प्रेमा शिवाय दुसरं काही करता येणार नाही.हे करणं बरंच सोपं आहे असं मला वाटतं.हवं तर कुणीही प्रयत्न करून पहावं.

एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की,दुसर्‍या कुणातही बदल घडवून आणायचा झाल्यास,जेव्हड्या प्रमाणात तो बदल व्हावा असं वाटतं,तेव्हड्या प्रमाणात त्या व्यक्तीचा तिरस्कार केला गेला पाहिजे. काही व्यक्तीना त्यांचा केलेला तिरस्कार न्यायसंगत वाटतो. एखाद्या व्यक्तीवर ममोहित होऊन ती जशी आहे तशी पसंत केली असेल तर
अशा परिस्थितीत त्या व्यक्तीत परिवर्तन करण्याचा मी प्रयत्न करणार नाही,किंवा त्या व्यक्तीमधे सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार नाही. मला वाटतं,तसं करणं एक प्रकारचं भ्याड दांभिकतेचं लक्षण दिसेल,कर्तव्यापासून पळ काढल्यासारखं दिसेल.

माणसानें नेहमीच इतरांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करून इतरात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो नेहमीच असं करण्याच्या प्रयत्नात असतो.खरं तर,मला असं वाटतं की,हा प्रयत्न व्हावा. कुणा एका शास्त्रज्ञाने नाही का,एका फुलावर प्रयोग करून त्या फुलात बदल आणण्याचा प्रयत्न केला कारण ते फुल त्याला दिसत होतं तसं ते त्याला आवडत नव्हतं. तशाच काहीश्या उत्साहात हा प्रयत्न व्हावा.त्या शास्त्रज्ञाने त्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं असं काही घडलं नाही.केवळ ते फुल जसं दिसत होतं तसं त्याला ते आवडत नव्हतं म्हणून त्यात बदल करण्याचा त्याने प्रयत्न केला.

जी माणसं मानवजातिवर प्रेम करतात त्यांना त्यात बदल व्हावा असं वाटत नाही.खरं म्हणजे त्यांच्यात त्यांना बदल हवा असतो. शेजार्‍यावर प्रेम करावं असं त्यांना वाटत असतं पण तसं करणं अंमळ कठीण जातं.आणि ते सोपं व्हावं असं त्यांना वाटत असल्यास स्वतःवर प्रेम करून घ्यायला ते आपखुषीने तयार व्हायला पाहिजेत.

मला सचोटी भावते.सचोटी ही नैतिकतेच्या दृष्टीने चांगली असते म्हणून नव्हे तर ती भाबडी असते.प्रत्येकाला आपल्या जीवनात गोंधळ आणता येतो.पण हे केव्हा शक्य होईल? जेव्हा त्यांना त्यांचच उगमस्थान माहित नसतं तेंव्हा.आणि ह्याचं कारण सोपं आहे. कुणाचाच कुणावर विश्वास नसतो तेव्हा हे होतं असं त्याचं कारण आहे.अशा परिस्थितीत,मला असं वाटतं,दुसर्‍यावर विश्वास ठेवण्याची वृत्ती ठेवल्याने,स्वतःलाच प्रचंड मदत होते.”

मी हे सर्व प्रमोदकडून शांतपणे ऐकून घेतलं.अर्थात तो जे सांगत होता ते विचार करण्यासारखं नक्कीच आहे.
मी प्रमोदला शेवटी म्हणालो,
“ही जी काही सर्व परिस्थिती तू सांगीतलीस तिला सामोरं जात असताना ज्या कुणाला स्वतःची तत्व सांभाळून वापरात आणायची असतील तर तू म्हणतोस तसं ती तत्व त्याला भावली पाहिजेत.हे नक्कीच.
पण तुझं शेवटचं सांगणं,
“दुसर्‍यावर विश्वास ठेवण्याची वृत्ती ठेवल्याने, स्वतःलाच प्रचंड मदत होते.”
हे तू म्हणालास ते ऐकून माझ्या वाचनात आलेली गोष्ट मला आठवली.
विश्वास ठेवण्याच्या ह्या वृत्तीवर एका अमेरिकन प्रेसिडेन्टचं म्हणणं आहे,
“Trust but verify”(विश्वास ठेवा पण खात्रीकरून)
आणि हे म्हणणं मला नक्कीच भावतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

“होय” आणि “धन्यवाद”

बबनला मी नेहमी निरखून पहात असायचो की,तो क्वचितच कुणालाही “नाही”म्हणायचा नाही,तसंच कुणालाही कदापीही “धन्यवाद ” म्हटल्याशिवाय रहायचा नाही.

“अरे,तू प्रत्येक साध्यासाध्या गोष्टीसाठी “धन्यवाद” महणतोस.बाहेरच्या सर्वांना म्हणतोसच पण मी पाहिलंय की तुझ्या घरात्तल्या सर्वांना म्हणत असतोस मग तो तुझ्या छोट्या मुलाला असो किंवा तुझ्या आई-बाबांना असो.मला हे तुझं आवडतं.पण तुला ही सवय कशी काय लागली.?आपल्या नेहमीच्या रीतीरिवाजात”धन्यवाद” म्हणण्याऐवजी त्याचा अर्थ चेहर्‍यातून दाखवला जातो.
तसंच तू क्वचितच कुणाला “नाही”म्हणत नाहीस.हे मी निक्षून तुला पाहिलं आहे.हे तुला कसं शक्य होतं?.त्या कुणाचं काम झालं नाही तर तुला निराश व्ह्यायला होत नाही काय?”
मी जरा धारिष्ट्य करून बबनल विचारलं.

“होय” आणि “धन्यवाद” हे दोन शब्द मला सकाळी बिछान्यातून उठवतातत आणि रात्री बिछान्यावर झोपवतात. मी कुणाला “होय” कशासाठी म्हणतो आणि “धन्यवाद” कशासाठी म्हणतो हे मला ठाऊक नाही पण माझा दिवस आणि माझी रात्र मजेत जाते.आणि हे करायला मला भावतं.”

बबन मला म्हणाला आणि पुढे सांगू लागला,
“होय” आणि “धन्यवाद” हे पूर्वीपासूनचे व्यवहारीक शब्द आहेत असं मी कुठेतरी वाचलं.”होय” म्हणाल्यावर मला पेढा मिळायचा आणि “धन्यवाद” म्हणाल्यावर मला पाठीत शाबासकीची थाप मिळायची.”नाही” आणि “मीच का?” हे शब्द जेव्हा मला आवडलं नसतं तेव्हा आणि मला करायचं नसतं तेव्हा म्हणायला शिकलो.
मी मोठा होत असताना माझ्या वाचनात आलं की,हे दोन शब्द एखादी प्रार्थना म्हटल्यासारखे आहेत.हे वाचून मला फार आवडलं.किती आल्हादक किती साधे हे शब्द वाटतात.पण आचरणात आणायला साधे नाहीत.

आचरणात आणायचं म्हणजे “होय” म्हणायचं.जे काही विचारलं जाईल त्याला “होय” म्हणायचं. मग ते आचरणात आणताना आनंद,दुःख,गम्मत,चंगळ नुकसान, खेद,पूर्ति, ह्यातलं एखादं तरी आलंच.आणि “धन्यवाद” म्हटल्याने येईल ते सकारात्मक किंवा नकारात्मक स्विकारल्यासारखं होतं.

हे शब्द उच्चारणं म्हणजे थोडं उन्मादी झाल्यासारखं होईल, अशक्य झाल्यासारखं होईल.उन्मादी असेलही पण अशक्य मात्र नाही. “होय” म्हणणं किंवा “नाही” म्हणणं हा एक प्रकारचा पर्याय आहे असं म्हटलं तरी चालेल.
माझे आजोबा जेव्हा गेले ती बातमी म्हणून कुणाला सांगताना “होय” गेले असं कबूल करायला मी बरेच दिवस तयार नव्हतो.
“धन्यवाद” हे म्हणायला मी जरासा उद्वेग आणायचो.पण सरतेशेवटी हे दोन्ही साधे शब्द वापरात आणायला लागलो तेव्हा माझ्या आतून थोडसं अडखळल्यासारखं होऊन,जणू एखादी टण्णक सुपारी फोडल्यासारखं वाटायचं. जेव्हडं मी “होय” म्हणायचो तेव्हडे माझे डोळे पाणवायचे.हळुहळू, माझ्या मनात शांतीच्या संवेदना व्हायच्या आणि
मी थोडासा हसतमुख रहायचो.ह्या शब्दाचं अस्तित्व माझ्या शरीरातून वहात आहे असं मला वाटायचं.

हा थोडसा नाखूष होऊन बोललेला “होय” असायचा.परंतु,दिवसभर अनेक वेळा अविचारातून मी “नाही” हा शब्द उपयोगात आणायचो.मी कसा प्रतिसाद देतोय याची मला जेव्हा जाण आली,तेव्हा मी “होय” म्हणायला उद्युक्त झालो.अजूनही तसं करणं तेव्हडं सुलभ महणा किंवा सोप म्हणा असं वाटत नाही.
माझ्यासाठी दिवसेदिवशी “होय” आणि “धन्यवाद” हे शब्द – हा मार्ग- वापरण्याने मला वाटतं,मी चांगली व्यक्ती आहे हे भासवण्यात मदत होते.

कुणी तरी म्हटल्याचं आठवतं,
“देव हा एक विदुषक होऊन, जे श्रोते हसायला काचकुच करतात त्यांना हसायला लावतो.मी जेव्हा “होय” म्हणतो किंवा “धन्यवाद” म्हणतो,तेव्हा मी जास्त हसतमुख असतो,मी मोकळा श्वास घेतो,मला ताजातवाना झाल्यासारखं वाटतं.
कुणी तरी म्हटलंय,
“प्रबोधन ह्याचा अर्थच असा की,तुमच्यातला राग तुम्हाला रागीट बनवत नाही,तुमच्यातलं नैराश्य तुम्हाला निराश बनवत नाही,तुमच्यातलं दुःख तुम्हाला दुःखी बनवत नाही,तुमच्यातली भीति तुम्हाला भित्रा बनवीत नाही.

मी जेव्हा एकांकीपणाला “होय” म्हणतो,तेव्हा असं दिसतं की,ह्या एकांकीपणाचं,शांतीत,आनंदात,एकांतवासात रुपांतर होतं.थोडक्यात सांगायचं झाल्यास मी जेव्हा मनोहरतेत असतो तेव्हा मनोहरता माझ्या अवतिभवति असते, पण ती तशी असली तरी मला ती नेहमीच दिसत नाही.जेव्हा मी “होय” आणि “धन्यवाद” म्हणतो, नुसतेच शब्द म्हणून नव्हे तर माझ्या बाहेरून आणि अंतरातून म्हणतो तेव्हा ती मनोहरता मला निश्चितच दिसते.”

“होय” तुझं म्हणणं मला पटलं.असं म्हणून मी बबनला त्याबद्द्ल “धन्यवाद” असंही म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

उतावीळपणा.

“जीवनात उतावीळपणा झाला की त्या जीवनाची मनोहरता हरवली जाते.”

संदीप त्याच्या लहानपणी नेहमीच आपण घाईगर्दीत आहे असं भासवायचा.बरेच लोक असं भासवत असतात.कदाचित त्यांना असं दाखवून द्यायचं असेल की तसं केल्याने दुसर्‍यावर आपली चांगली छाप पडते.अशा व्यक्तीला नेहमी पहाणारे समजायचं ते समजतात.

आता मोठा झाल्यावर संदीप त्यामानाने बराच सावरल्यासारखा दिसत होता.मी त्याला सरळ प्रश्न केला,
“हे स्थित्यंतर कशामुळे झालं रे?
मला म्हणाला,
“काय सांगू? आपल्यातला उतावीळपणा कमी करावा नव्हेतर थांबवावा असं मला नेहमी वाटायचं.सतत पुढे पुढे मार्गस्थ व्हायच्या सवयीचा शेवट करावा,गाडीचा हॉर्न वाजवत लवकर जायचं आहे असं भासवीत रहाण्याचा शेवट करावा,चला चला लवकर चला मला शाळेत जायला उशीर होतोय असं बाबांकडे खणपटीला लागण्याचा शेवट व्हावा.

उन्हाळ्याची शाळेला सुट्टी पडली म्हणजे माझा हा फुरसतच नसल्याचा काळ.खरं म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी ही आराम करण्यासाठी खर्चायला हवी.पण माझ्यासाठी म्हणाल तर ही सुट्टी पुर्‍या वर्षाला भ्रांतचित्त करायला लागतं तशातली समजा.मला जो मोकळा वेळ मिळायचा तो बरेच वेळा पोहण्याच्या शर्यतीपूर्वी करण्यात येणार्‍या सरावासाठी जायचा. आणि माझे आई-बाबा दिवसभर आपल्या कामात व्यस्त असायचे.शिवाय माझ्यात आणि माझ्या भावात उरलेला काळ, योजून दिलेल्या कामात किंवा थकल्यामुळे डुलकी काढण्यात जायचा.दिवसभर तेच तेच काम करून दिवसाच्या शेवटी कंटाळा यायचा.कधी कधी मला असं वाटायचं की माझ्या जीवनात श्वास घेण्यासाठीपण फुरसतसुद्धा मला मिळू नये?.

पण एक दिवशी माझ्या बाबांनी ठरवलं की,सर्वांनी सुट्टीवर बाहेर गावी जावं.कोकणात आमच्या मावशीचं गाव एका नदीकाठी वसलेला होता.निसर्ग सौंदर्य त्या गावी अप्रतिम होतंच शिवाय मला रोज नदीवर पोहायला जायला मिळणार होतं.माझ्या दृष्टीने हा बेत अप्रतिमच होता.माझ्या आई-बाबांना वाटलं की सर्वांनाच शहरातल्या व्यस्त जीवनापासून थोडा विरंगुळा मिळावा.पण गम्मत म्हणजे बरेच वर्षांनी आम्ही मावशीच्या गावात आल्याने,आवडीच्या गोष्टी पहाण्याच्या आतुरतेने सुरवातीची सुट्टी घाईगर्दीचीच ठरली.

पण तुम्हाला मी एक गम्मत सांगतो.माझ्या जीवनातला तो टर्नींग-पॉइन्ट होता.
त्या दिवसाची मला आठवण आली.सकाळीच उठल्यावर नदीवर असलेल्या खोल कुंडात पोहण्याचं ठरलं.ही माझीच कल्पना होती आणि माझ्या बाबांना आणि भावाला ती कल्पना आवडली.पोहण्यात विशेष वाकबगार असल्याशिवाय ह्या कुंडात पोहण्याचं गावतले कुणी धारिष्ट करत नसायचे.त्या कुंडात वरचेवर पोहण्यात सराव असलेल्या एका गावकर्‍याला घेऊन आम्ही सकाळीच उठून पोहायला गेलो.नदीवर बांधललेला नवा पुल कुंडापासून बराच दूर होता. कारण खोल कुंडावरून पूल बांधणं बरच खर्चीक होतं.हे समजण्यापूर्वी कुंडाजवळच एक उंच चौथुरा बांधला गेला होता.त्याचा उपयोग लोक चौथुर्‍यावर चढून नदीत सुरंग उडी मारण्याचा प्रयत्न करायचे.आम्ही तेच केलं.

शहरातल्या धावपळीच्या जीवनाची आठवण येऊन,बाबांबरोबर नदीत पोहत राहिल्याने आयुष्यात थोडी उसंत मिळेल ह्या विचाराने मी त्या कुंडात उडी टाकून पोहत होतो.पण कसलं काय? त्या कुंडात खोलवर दिसणार्‍या निरनीराळ्या जातीच्या माशांचे कळप कसे बिनधास्त पोहत होते तो देखावा पहाण्यासाठी मी नेहमी प्रमाणे माझ्या घाईगर्दीच्या आहारी गेलो.पण एका क्षणी मी त्या खोल पाण्यात थबकलो.वरून सूर्याचं उन पाण्यात पडून खोलवर चमकत होतं. कुंडाच्या तळावर पांढरी शुभ्र वाळू दिसली.गम्मत म्हणजे ही वाळू जास्त हलत नव्हती.आणि एकाएकी माझ्या एक लक्षात आलं की,माझ्या डाव्या बाजूला एक मोठ खडक होता आणि त्या खडकाच्या आडोशोला एक मोठा मासा मला टवकारून पहात आहे.आम्ही दोघं एकमेकाला सामोरं आलो होतो असं म्हटलं तरी चालेल.

सुरमई सारखा पण आकाराने भला मोठा मासा माझ्याकडे खडकाचा आडोसा घेऊन टवकारून पहात आहे हे दृष्यच एव्हडं विस्मयकारक होतं की,त्या खडकाची सावली त्याच्या अंगावर पडत असताना त्या माशाची रूपरेषा माझ्या नजरेतून सुटली नाही.
तो मासा जवळ जवळ चारएक फुट लांब होता.त्याच्या पाठीवर आणि बाजूला हळुवार हलत असलेले पंख दिसत होते.आणि त्याची शेपूट अगदी शिथिल होऊन अंगाच्या सरळ रेषेत दिसत होती. त्या माशाचे पांढरे फटफटीत डोळे माझ्याकडे टवकारून पहात होते.त्याचे डोळे मला भीतिसम वाटत नव्हते तर उलट ते निष्पाप नजरेचे होते.आणि त्या नजरेची खोली, मोजण्याच्या पलीकडची होती.माझ्या मनात कोणतीही भीति उत्पन्न झाली नाही कारण येऊ पहाणारी भीति एका शुद्ध विस्मयाच्या संवेद्नाने काबूत आणली गेली होती.

आम्ही एकमेकाकडे क्षणभर बघत राहिलो.तो मासा आपल्या जागेवरून हलला नाही आणि मी पण.
कारण माझे विचार एकाएकी आलेल्या पुर्ततेच्या वावटळीमधे मंथन करायला लागले होते.माझे बाबा कुंडात खूप स्वारस्य घेऊन पोहत असताना मी हळूच त्यांच्यापासून दूर पोहत गेलो आणि त्यामुळेच हा मासा पहायला मला मोका मिळाला.कुणास ठाऊक मी आणखी काय हरवून बसलो असतो.माझ्या घाईगर्दीच्या किंवा उतावीळपणाच्या जीवनामुळे इतका जवळ येऊनसुद्धा निसर्गाचा हा चमत्कार पाहू शकलो नसतो,म्हणजेच मी ह्या गोष्टीपासून आंधळा राहिला असतो, मी आणखी काय हरवून बसलो असतो?मी किती दृष्टिहिन राहिलो असतो.? ह्याचा विचार न करणंच बरं.

क्षणातच तो मासा माझ्या पासून दूर निघून गेला.दोन व्यक्ती एकमेकाला रस्त्यात भेटतात आणि नुसतं दृष्टीक्षेप टाकून काही न बोलता निघून जातात तशातलाच हा प्रकार होता.तो मासा त्याच्या वाटेने जाताना शेपटी हलवीत हलवीत जाताना मी पाहिला.हे सर्व काही क्षणात घडलं.आणि माझ्या उतावीळपणाच्या सवयीचा मी जरा गंभीर होऊन विचार करू लागलो.

त्या कुंडामधेच पोहत असताना मी मलाच वचन दिलं की,माझ्या जीवनात मी एव्हडा उच्छ्रुंखल न रहाता मधून मधून सुट्टी घेण्याकडे माझं ध्यान केंद्रीत करीन.
सकाळी उठल्या उठल्या मी मोकळा व्हायला पहायचो तसं करायचं नाही,कामावर जाताना घाईगर्दीच्या वेळी एव्हडं क्रोधीत व्हायचं नाही आणि स्वतःलाच म्हणायचं की,अखेरीस मला जिथे जायचं आहे तिथे मी पोहचणारच आहे.

हे ऐकून मी संदीपला म्हणालो,
जीवनात अशी काळजी करण्याची गरज का भासावी? कारण ह्या सर्व गोष्टी काय करतात तर एखाद्याला त्याच्या सुखापासून दूर ठेवतात.बरेच वेळा एखादा त्याच्या जीवनाच्या स्वतःच्या निश्चित अशा विशिष्टतेकडे अगदी गाफिल होऊन पहात असतो.काय महत्वाचं आहे त्याबद्दलचा गैरसमज तो मनात आणून त्या जीवनात पूरा तल्लीन होण्याचा विचार करतो”.

माझं हे ऐकून संदीप मला लगेचच म्हणाला,
“तुमचं सांगणं अगदी बरोबर आहे.
मला असं वाटतं की,एखाद्याने जीवनाकडे अशा नजरेतून पाहिलं पाहिजे की हे जीवन संथ गतीने चालणारं आहे,सतत घाईगर्दी करून मार्गस्त होण्याकडे दुर्लक्ष करणं योग्य होईल.जीवनात उतावीळपणा झाला की त्या जीवनाची मनोहरता हरवली जाते.एखादी गोष्ट पूर्ण दृष्टीपंथात येण्यापूर्वी आपण अगोदरच अजाण राहिलं पाहिजे.आगेकूच करण्यापूर्वी विश्राम घेतला पाहिजे. जीवन आनंद घेण्यासाठी आहे,मजा करण्यासाठी आहे.जीवन बहुमूल्य समजलं गेलं पाहिजे.”

सुरवातीला मी संदीपला विचारलेला प्रश्न त्याने नीट उघड करून सांगीतला,ह्याने माझं समाधान झालं.मी त्याला तसं म्हणालोही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

डुलकी घ्याल तर वंचित व्हाल.

“जेव्हा निर्जीव वस्तु वापरणारा एखादा त्या वस्तुला, त्याच्यापूर्ती सजीव वस्तू समजून त्या वस्तुशी संबंधीत रहातो तेव्हा हे असं शाम सारखं तो विचार करीत असणार ह्याची मला खात्री पटली.”

मी हॉलमधे आजचा पेपर वाचित बसलो होतो.तेव्ह्ड्यात मला आमच्या बिल्डिंगच्या समोरच्या घड्याळजीच्या दुकानातून भांडण्याचा आवाज ऐकू आला.त्यातला एकाचा आवाज माझ्या परिचयाचा वाटला.म्हणून मी उठून बाल्कनीत येऊन त्या दुकानाकडे न्याहाळून पाहिलं.शाम माझा मित्र तावातावाने त्या घड्याळजीबरोबर वाद घालत
होता.तेव्हड्यात त्यांचा काहितरी समझोता झाला असं वाटलं.मी तसाच बाल्कनीतून टाळी देऊन शामचं लक्ष माझ्याकडे वेधून वर माझ्या घरी यायला सांगितलं.

थोडावेळ बसल्यानंतर मी शामला विचारलं,
“कसला वाद चलला होता?”
मला शाम म्हणाला,
“अरे माझ्या अलार्मच्या घड्याळाच्या दुरस्ती वरून वाद झाला.तो मला सांगत होता की,त्याच्याकडे खूप काम आहे आणि त्याला मला हवं तसं दोन तिन तासत हे घड्याळ दुरूस्त करून मिळणार नाही.मी त्याला अर्जन्ट कामासाठी जास्त पैसे द्यायला तयार झालो होतो पण तो त्याला कबूल नव्हता.शेवटी मी त्याला तिप्पट चार्ज देतो म्हणून
म्हटल्यावर कबूल झाला.”

“इतका चार्ज देऊन तुला ते घड्याळ दुरूसत करून घेण्याची तुझी निकड काय होती हे मला मनापासून कळलेलं नाही.”
मी शामला अधीर होऊन बोललो.

मला म्हणाला,
“अगदी बरोबर, त्या घड्याळजीला जर का मी आता तुम्हाला सांगणार आहे ते सांगीतलं असतं तर ते त्याच्या डोक्यावरून गेलं असतं.म्हणूनच मी त्याला तिप्पट चार्ज देऊन काम करून घेतलं.कारण त्याला फक्त पैशाचंच महत्व माहित असणार आणि त्याबद्दल मी त्याला दोष देऊ इच्छित नाही.”

“बोल बाबा बोल,आणखी माझी उत्सुकता शिगेला नेऊ नकोस.”
असं मी म्हणाल्यावर शाम मला सांगू लागला,
“कोंबडा आरवला की, शेतकरी जसा पहाट झाली अशी समजूत करून कोंबड्यावर विश्वास ठेवतो तसाच पहाटे होणारा अलार्म झाल्यावर उगवत्या दिवसाला सामोरं जायचं म्हणून उठण्यात मी विश्वास ठेवतो.
दिवस उगवून मोठा व्हायला लागलाय,हे परत परत आठवण करून देणार्‍या डुलकी न लागावी म्हणून योजलेल्या स्नुझ अलार्मचं बटण दाबूनही आणखी थोडं झोपावं म्हणून लहर येत असताना खरोखरंच त्या घड्याळाच्या यंत्राचं मुळीच स्वागत करू नये असं वाटणं स्वाभविक असल्यास नवल नाही.डुलकीचा तर हाच महिमा आहे.

हे घड्याळ,मला माझ्या आराम करीत असलेल्या बिछान्यातून आणि स्वप्नलोकात असलेल्या स्थितीतून खेचून उठवल्यासारखं करतं. आणि कठोर अशा दिवसातल्या पहिल्या कामाला लावतं. हे सगळं न होण्यासाठी मी माझ्या बोटाच्या एका झटक्याचा वापर करू शकतो.पण मी तसं करत नाही. घड्याळाची मागणी न टाळण्यासाठी,मी
माझ्या मनाला आणि जगाला सांगतो की,मला काही संकल्प पुरे करायचे आहेत आणि ते पुरे करण्यापासून मला टाळाटाळ करता येणार नाही.

नुसता अलार्म लावण्याच्या माझ्या कृती मधून एक सूचवलं जातं की,काही महत्वाच्या योजना मला गतिमान करायच्या आहेत.ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होईल की, माझ्या काही निष्ठा आहेत त्या पुढच्या अडचणीतून पुर्‍या करायच्या आहेत.त्या अलार्मच्या कर्कश आवाजाची उपेक्षा करण्यापेक्षा ह्या नियुक्त कर्मांना सामोरं जाणं पत्करलं असं वाटतं.पहाटे पहाटेच मी उगवणार्‍या दिवसाचा कब्जा घेऊन मीच आखलेल्या योजना-पुर्तीसाठी तयारीत रहातो.

माझ्याच आखलेल्या योजनाना कमतरता येऊ नये म्हणून त्या पहाटेच्या अलार्मची सोय आहे असा मी अर्थ धरला तरी तो कर्कश आवाज नक्कीच कमतरता न आणता मला एक प्रकारचा मोका देतो.डुलकी लागू नये म्हणून वापरायच्या बटणावर अलार्म बंद करण्यासाठी मी जर बोट लावलं तर मग,आदल्या रात्रीचा माझा अंतरंग मित्र,ज्याने
माझ्यासाठी अपुरं काम मी भविष्यात पूरं करावं म्हणून मला पटवलं होतं ते मी पुरं करायला तत्पर होतो.

मी जर का घड्याळाकडून मला मिळत असलेल्या अलार्मचा आदर केला तर मला मी केलेल्या आदल्या रात्रीच्या वचनबद्धतेचाही आदर करायला हवा.कारण आज न जमलेलं काम उद्या उगवणार्‍या दिवशी नक्कीच करीन आणि आलेली आव्हानं पुरी करीन ही माझी आदल्या रात्रीची वचनबद्धता होती ती मी पुरी करू शकणार होतो.पण त्या ऐवजी स्नुझ अलार्म (थोडा काळ डुलकी मिळावी म्हणून वापरायचं बटण) दाबला तर मात्र वचनबद्धतेला महत्व राहिलं नसतं.

आजचा दिवस कसाही गेला तरी दिवसाचं पहिलं पाऊल मी अगदी योग्य रितीनेच घेतो.अंथरूणातून झटकन उठून घड्याळाच्या अलार्मकडून मिळालेला उठण्याचा संकेत पाळतो,हे लक्षात येऊन मला आनंद होतो की,पुढच्या माझ्या सर्व आयुष्यात मला घड्याळाचा अलार्म आवश्यक असणार आणि दिवस उगवताना त्याची प्राथमिकता मला निष्फळ वाटणार नाही.क्वचितच वापरलं गेलेलं अलार्मच घड्याळ, वापरणारी व्यक्ती, कमी महत्वाकांक्षी आणि योजनाबद्ध नसलेली आहे असं आवर्जून सांगतं.आणि नियमीत वापरलं गेलेलं अलार्मचं घड्याळ निश्चितच सांगून जातं की वापरणारा दूर क्षितीजाकडे पाहून विलक्षण झेप घेण्यापूर्वीचं पहिलं पाऊल घेत आहे.”

असं सर्व अलार्मच्या घड्याळाबद्दल सांगणारा शाम मला ग्रेट वाटला.जेव्हा निर्जीव वस्तु वापरणारा एखादा त्या वस्तुला,त्याच्यापूर्ती सजीव वस्तू समजून त्या वस्तुशी संबंधीत रहातो तेव्हा हे असं शाम सारखं तो विचार करीत असणार ह्याची मला खात्री पटली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

भित्री जया.

“ह्या क्षणी जा! आणि जर तुम्हाला माहित नसेल कसं, तर तुम्ही ज्यावेळी मार्गस्त असतां त्यावेळी ते तुम्हाला कळेल. तुमचा मार्ग जर नापसंतिचा असेल तर त्यापेक्षा तो मार्ग नसलेलाच पत्करला.”

जया मला म्हणाली,
“भीतिचीच मला भीति वाटायची.कुठचीही गोष्ट करण्यापुर्वी ती करायला भीति वाटणं हा माझा वीक-पॉइंट होता. मुळे अंगात क्षमता असूनही मी कुठचीही गोष्ट करायला बिचकायचे.माझी आई मला न भीता काम करायला प्रोत्साहन द्यायची.माझी एक मैत्रीण कराटे करायला शिकली होती.

मी ज्यावेळी दहा वर्षाची झाले तेव्हा कराटे क्लास घेतला.हे करण्याचं माझ्या मनात केव्हा पासून होतं.पण मी कधी प्रयत्नच केला नाही.फटका मारून वीट तोडायची,समोरच्याला चितपट करायाचं,मुलांसमोर भाव खायचा वगैरे वगैरे. जरी मला कराटे कला शिकायची होती तरी माझ्या मनात यायचं की मी कितपत ह्यात सफल होईन?.मी माझ्या आईबाबांशी ह्या विचारावर बरेच वेळा बोलायचे.शेवटी माझ्या आईने जवळ जवळ फरफटत मला त्या क्लासमधे नेलं. मी पूर्ण बेचैन झाले होते. नव्याने क्लासमधे येतात ती सर्वच मुलंमुली अशी बेचैन असतात असं माझी आई मला म्हणाली.खरंतर माझ्या भीतिला हा तिने दिलेला आधार जरा कमकुवतच होता.

मी जरी मनात घाबरत असले तरी क्लास घेतला आणि नंतर तो मला आवडायला लागला.क्लास संपल्यावर घरी जाताना मी उत्तेजित होऊन जायचे.भविष्यात मी ब्लॅक बेल्ट होणार हे मनात येऊन मला आनंद व्हायचा.घरी गेल्यावर कधी कधी अर्ध्या रात्री पर्यंत मी पंचिसची सराव करायचे.नंतर मी कधीच मागे वळून पाहिलं नाही. परंतु,
नापसंतीची आणि नाचक्कीची भीति माझ्या मनात पुन्हा घर करून राहिली होती.माझ्या शाळेतल्या मित्र-मैत्रीणी कराटेबद्दल मला बरेच दिवस विचारत असायची.मी कराटेबद्दल काय काय शिकले ते त्यांना सांगायचं हे मला शक्यही झालं नाही”.

हे सग्ळं जयाकडून ऐकून मी तिला म्हणालो,
“भविष्यात अफसल होईन अशी दिसणारी ही धूसर भीति खरोखरच घातकी असते.ही भीति आपल्याला, सामान्य, कमजोर आणि अडाणी बनवते”.

माझं हे ऐकून जया मला म्हणाली,
“तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.मी जशी मोठी होत चालले होते म्हणजे माझ्या तिशी-बत्तिशीच्या वयात ह्या भीतिला थारा द्यायचा नाही असं मी ठरवलं होतं पण त्यासाठी मला संघर्ष करावा लागला.अजून सुद्धा आठवड्याचे आठवडे नीट जात असले तरी एखादा कटकटीचा दिवस माझ्या कुवतीबद्दल किंवा आकांक्षेबद्दल अनामित,
अनुभवजन्य,विवंचना देऊन जातोच जातो.मला अलीकडे माझ्या मलाच जाणीवपूर्वक आठवण ठेऊन सांगावं लागतं की काही तरी कर.कारण काहीतरी करण्यात जी गम्मत आहे ती न करण्यात नक्कीच नाही.”

हे जयाचं ऐकून मला तिला सांगावसं वाटलं.म्हणून मी तिला म्हणालो,
कुणी तरी म्हटलंय,
“ह्या क्षणी जा! आणि जर तुम्हाला माहित नसेल कसं, तर तुम्ही ज्यावेळी मार्गस्त असतां त्यावेळी ते तुम्हाला कळेल. तुमचा मार्ग जर नापसंतिचा असेल तर त्यापेक्षा तो मार्ग नसलेलाच पत्करला.”

“माझ्या बाबतीत सांगायचं तर मला मिळालेल्या अनुभवातून,मला माझ्या जीवनात जो बदल करावा लागला,खरं तर तेच अनुभव मला सुरवात करायला नकोसे झाले होते.जेव्हा मला कॉलेजची डीग्री मिळाली. डीग्री मिळवण्यासाठी मी सुरवात केली कारण दुसरं काही करायला मला भीति वाटत होती,ती मिळाल्यावर मला मीच गमवल्यासारखं वाटत होतं.”
जया मला सांगत होती.पुढे म्हणाली,
“नंतर मी ज्या लॉ फर्ममधे काम करायला लागले त्यातले बरेचसे माझे वरिष्ठ अजून डीग्री मिळवण्याच्या अवस्थेत होते.माझी प्राथमिक जबाबदारी होती की मी माझ्या प्राथमिक ज्ञानाची उजळणी करावी.माझ्या बरोबर डीग्री मिळालेली माझी एक मैत्रीण पिएचडी पूर्ण करून प्रोफेसर म्हणून कॉलेजमधे कारकीर्द करायला गेली.माझंही हेच
स्वप्न होतं,पण त्यासाठी पाठपुरावा करायला मी लाजत होते.सध्या आहे त्या फर्ममधे माझ्या वरिष्ठांपेक्षा मी वरिष्ठ आहे हे समजून घेऊन रहाणं हे प्रोफेसर होण्यात माझी प्रतिभा पडताळून पहाण्यापेक्षा मला सोपं वाटत होतं. जीवनाच्या प्रवाहात मी मला गमावले आहे,भरकटत जात आहे असं वाटून घेत होते.त्या प्रवाहात सामिल होण्याचं तर सोडूनच देण्यासारखं होतं.
काही दिवसापासून मी माझं पूर्वीचं जीवन अखेरीला आणलं आणि तत्पर राहून मी जोखीम घेणारी असं माझं जीवन जगू लागले.मी आशा करू लागले की माझी अस्थाई नामधारी पलटून जावी.

त्याचं असं झालं की,मी एका व्यक्तीच्या प्रेमात पडले.अगदी तडकाफडकी त्याच्या प्रेमात पडले.आमच्या कामाच्या जागी तो जेव्हा इकडून तिकडे फिरायचा ते पाहून,त्याला न्याहाळून मी प्रेमात पडले.माझ्या पासून दोन टेबलांच्या पलिकडे तो बसायचा.रिसेप्शनिस्ट्च्या टेबलाच्या पलिकडे तो बसायचा.काहीतरी करून त्याचं लक्ष मी माझ्याकडे
ओढून घ्यायचे.आमच्या दोघां मधे पूल बांधायला मी सक्षम झाले.आणि हे सुद्धा नकार मिळण्याच्या दारूण धडकीला न जुमानता. जणू तलावात पोहताना त्याच्याच जवळ सुरंग उडी घेतल्यासारखं करून मी त्याच्यावर प्रेम करीत होते.
त्याला पाहिल्यानंतर,
“ह्या क्षणी जा! आणि तुम्हाला माहित नसेल कसं, तर तुम्ही मार्गस्त असताना ते तुम्हाला कळेल.”
तुम्ही म्हणालात तो उपदेश मी तंतोतंत पाळायचं ठरवलं.
“कशाच्या तरी मागे लागावं आणि त्यातून मिळणार्‍या अनुभवातून मिळेल ते शिकावं” असं मी ठरवलं. निराशजनक,भयानक आणि उदास जीवन गेली आठ वर्ष जगल्यानंतर,फायद्याचं,प्रेरणादायी आणि सुखदायी जीवन जगायला मिळत होतं.
मी कौटूंबीक झाले आणि माझ्या लक्षात आलं की मला शिकवायला आवडतं आणि मी चांगलं शिकवू शकते.मला मनोमनी असं वाटतं की,आपण पुढे पुढे जात राहिलं पाहिजे आणि आपलं उद्दीष्ठ गाठलं पाहिजे.तसं न केल्यास आपण जागच्या जागीच रहातो. आळशी बनतो.आणि या जगातली अश्चर्यकारक भीति घालवून बसतो.”

मी जयाचं शुभचिंतन केलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

मैत्रीण

“मला असफलता भावते.”….इति शिल्पा
शिल्पा आपल्या मैत्रीणीवर फारच चिडलेली दिसली.
ती म्हणते,
“माझी मैत्रीण फटकळ आहे,मनात आलं की बोलून टाकते,समोरचा काय म्हणेल याचा विचारही करत नाही”..वगैर वागैरे.
शिल्पाचं हे बोलणं ऐकून मला त्यात थोडसं स्वारस्य वाटलं.
मी तिला म्हणालो,
“मला, तुझी मैत्रीण बरचशी बुद्धिमान वाटते.कारण कुणीही खात्री असल्याशिवाय मनात आलं तर बोलून टाकणार नाही तिचं नीट जर ऐकलंस तर तुला माझं म्हणणं पटेल”

“एकदा ती जे काय मला म्हणाली ते मी नीट ऐकलं.असफल होण्याबाबतचा तो विषय होता.पूरी चर्चा मी तुम्हाला सांगते.”
असं म्हणून शिल्पा मला सांगायला लागली,
“मी ज्या मैत्रीणी बद्दल बोलते तिची खासियत म्हणजे,काहीतरी जगावेगळं ती बोलायची.एकदा ती मला म्हणाली,
“जर का आयुष्यात अधुनमधून असफलता नसेल तर ते आयुष्य कुचकामी म्हटलं पाहिजे”

ती म्हणायची,
“तुम्ही जर का असफल झाला नाही तर तुम्ही कदापी तुमची परिसीमा पुढे रेटणार च नाही असं म्हणावं लागेल. तुम्ही जर का असफल झाला नाही तर नक्कीच तुम्ही धोके पत्करत नाहित असं म्हणणं गैर होणार नाही.एका अर्थी असफलता ही सफलतेचा दाखला आहे.सफलतेची गणना कशात आहे यावर ते अवलंबून असतं.”

शिल्पा मला पुढे सांगू लागली,
“माझ्या एका “बुद्धिमान” मैत्रीणीने मला हे सांगीतलं असं असं मी त्या मैत्रीणीबद्दल बोलत नाही.कारण मला खरंच माहित नाही की ती बुद्धिमान आहे.उलटपक्षी,जी व्यक्ती आपल्या तर्कशक्ती बद्दल ताठा ठेवते अशा व्यक्तीच्या जीवनाकडे मी आश्चर्यचकित होऊन बघते.तिचं जीवन हे निखालस अज्ञानतेच्या झोतीच्या प्रवाहात आहे असं मला
वाटतं.पण समजा ती अज्ञानी असो वा नसो,कदाचित तिची बुद्धिमत्ता माझ्या आकलनाच्या बाहेर असेल,ती सखोलही असेल परंतु,माझी मैत्रीण एका गोष्टीबाबत मात्र ठाम असते आणि ते म्हणजे ती विमुख होत नाही. जीवनापासून ती कदापी विमुख होत नाही.स्वतः पासूनही विमुख होत नाही, स्वत:पासून पराङ्गमुख होत नाही. अधुनमधून येणार्‍या असफलतेपासूनही.कारण ती धोका पत्करते आणि विमुख होत नाही.जीवनातल्या आलेल्या दिवसात ती इतकी स्वतःशी संतुष्ट असते की कदाचित आपल्या सारखे बरेच, एका आठवड्यात,एका महिन्यात किंवा कदाचित आणखी जास्त दिवस संतुष्ट व्हायच्या प्रयात्नात राहूनही संतुष्ट होणार नाही.

बरेचसे आपण बरेच वेळा भय-भीतिने सतावलेले असतो.असफलतेच्या भीतिनेसुद्धा जरा कठीण समस्या आली तरी प्रयत्नापासून वंचित रहातो. नकाराच्या भीतिने मनातलं उघडं करून इतराना सांगत नाही.किंवा आपलं हसं होईल म्हणून उघड करीत नाही.कॉलेजमधे शिकणार्‍यांना कॉलेज हे भरपूर असफलतेचं कार्यक्षेत्र वाटतं.आणि त्यातलं
प्रत्येक सत्र हे अपेक्षाभंगाच्या सामुद्रधुनीतून होणारी वाटचाल वाटते.बरेच विध्यार्थी कॉलेज शोधताना त्यांना मार्गदर्शन होतं ते असफलतेच्या भीतिचं. कमी आव्हानात्मक कॉलेजात कमी असफलता असावी अशी त्यांची धारणा असते.

बरेच वेळां मलासुद्धा असफलतेची भीति वाटते.माझ्या मैत्रीणीचं माझ्या बद्दलचं प्रतिपादन पाहून, मीच असंतुलित आहे असं वाटून, मी माझ्या मनात दचक घेतली.ते पाहून मला ती निश्चीतच तसं म्हणाली असावी.पण ते मी विसरू शकले नाही. परंतु,ह्या घटनेला काहिसा प्रतिसाद म्हणून मला मिळालेली नकाराची पत्र, प्रयत्न केला पण
असफल झाले ह्याची साक्ष म्हणून,त्याची एक फाईल मी तयार केली.मी त्यावेळी वकिली शिक्षण घेण्याच्या विचारात होते.माझी नकाराच्या पत्रांची फाईल बरीच जाड झाली.कारण जिथे जिथे म्हणून मुलाखत द्यायला गेले तिथे तिथे मी ठसा उमटूं शकले नाही.अजून मी काही व्यवसायी कंपन्यांकडून येऊ घातलेल्या नकारात्मक पत्रं मिळण्यासाठी आतुर आहे.

सर्वच असफलता फायद्याच्या असतात असं नाही.काहीवेळा आपल्याकडूनच गोची होत असते.सर्वच प्रयत्न करून झालेल्या अफसलतेना मी A देणार नाही.अशा परिस्थितीत मी असफलतेपेक्षा सफलता मिळवण्यात सफल होईन. सावधानतेने पावलं टाकणं म्हणजे असफलतेची ती खूण आहे असं मुळीच नाही.पण जीवनात ध्येय ठेवण्यासाठी जेव्हडा आपला हक्क असतो त्यापेक्षा जर का आपण उच्च ध्येय अंगिकारलं नाही तर ते ध्येय वृथा ठरेल.
मला नेहमीच सफलता मिळतेच असं नाही.कारण अजून मी विमुख होते.असं असलं तरी मला असफलता भावते.

हे सगळं शिल्पाचं ऐकून मी तिला म्हणालो,
“तुझी मैत्रीण बुद्धिमान असावी असं मी तुला म्हटलं ते ह्यासाठीच की ती फटकळ असल्याने तिचं ऐकून शेवटी “तुला असफलता भावते” असं म्हणायला तू प्रवृत्त झालीस.हेच मला तुला पटवून द्यायचं होतं.”

“खरंच माझ्या हे लक्षात आलं नाही”
शिल्पा, खाली मान करीत मला म्हणाली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)