लाकडी जमीन.

“पुष्कळ वर्ष वापरून वापरून जुनाट झालेल्या लाकडी जमीनी विषयी मला विशेष वाटतं.”

बरेच वेळा एखाद्याच्या कुटूंबात दुर्दैवाने आनुवंशिकतेचं बरंच बंड माजलेलं असतं.शास्त्रिय कारण काहीही असूंदे त्याचे दुष्परीणाम कुटूंबातल्या काही लोकाना भोगावे लागतात.
सुनंदाच्या कुटूंबात अपंगत्व येण्याची परंपरा होती.तीच्या मावशीला पोलियो झाल्याने ती अपंग होती आणि सुनंदाला स्वतःला डाव्या हातापेक्षा उजवा हात काहीसा तोकडा असल्याने अपंगत्व आलं होतं.तशी सुनंदा दिसायला सुस्वरूप होती.चांगली शिकलेली पण होती.
पण तीने लग्न केलं नव्हतं.तीची मावशीसुद्धा अविवाहित होती.
सुनंदाला लग्नाच्या बर्‍याच ऑफर्स आल्या होत्या.पण तीने चक्क आपण मावशीसारखंच रहाणार म्हणून घरात सांगीतलं होतं.मी तीला एक चांगला मुलगा सुचवला होता.त्याचा एक डोळा दुसर्‍या डोळ्यापेक्षा जरा लहान होता. सुनंदाच्या अपंगात्वाबद्दल ज्यावेळी मी त्याला सांगीतलं त्यावेळी तो तीच्याशी लग्न करायला एका पायावर तयार झाला होता.पण सुनंदाच स्वतः तयार नव्हती.माझा नाइलाज झाला.
त्यानंतर बराच काळ निघून गेला.सुनंदाला मी अचानक एका औषधाच्या दुकानात भेटलो होतो.ती तीच्या गावात न मिळणारी काही औषधं न्यायला शहरात आली होती.मी तीला विचारलं,
“सुनंदा कशी आहेस तू?”
मला म्हणाली,
“आता मी बरीच सुखी आहे.मधे पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं.”
मी तीला माझ्या घरी घेऊन गेलो.ती एक दिवस माझ्या घरी राहिली.
खूप दिवसानंतर मी तीच्या कडून ऐकत होतो.

मला म्हणाली,
“तुम्ही माझ्या लग्नासाठी प्रयत्न केला होता.पण लग्न न करण्याचा माझ्या निर्णयाला मी चिकटून राहिले ते आता मला बरं वाटत आहे.
माझी मावशी मला नेहमी म्हणायची,
“स्त्री जन्माची कहाणी पुरूषाच्या जन्मापेक्षा बरीच निराळी असते”.
तीन वर्षापूर्वी माझ्या मावशीचं निधन झालं.माझ्या आईबाबांच्या पीढीत हा पहिलाच मृत्यु होता.माझी मावशी एकटीच होती.ती माझ्या बालपणातली माझी अनुकरणीय व्यक्ति होती.तीच्या सारखं मलाही लग्न करायचं नव्हतं.कुटूंब वाढवायचं नव्हतं.माझ्या मावशीला पोलियो झाला होता. ती एका पायाने अधू होती.त्या आजाराला पूर्वी पायातून वात गेला म्हणायचे.त्या अपंगपणाच्या व्याधीमुळे तीचा लग्न न करण्याचा उद्देश उघड होता.”

मी सुनंदाला म्हणालो,
“आपल्या समाजात स्त्रीयांना लग्न केल्यानंतर म्हणा किंवा लग्न केलं नसलं तरी आयुष्यात खूप समझोता करून घ्यावा लागतो.पुरूषांवर तेव्हडी परिस्थिती नसते.”
मला ती म्हणाली,
“माझ्या सारख्याना किंवा माझ्या मावशी सारख्यांना तर समझोत्याची फारच जरूरी भासते.माझी मावशी असेपर्यंत मला बराच धीर होता.तीच्याकडून मला नेहमीच सल्ला मिळायचा.
माझ्या मावशीच्या जाण्यानंतर माझ्या इतर नातेवाईकांबद्दल मी थोडी चिंतीत होते.तीच्या नंतर आता कोण हा माझा प्रश्न होता.कित्येक महिने मी उत्कंठा आणि करुणा तसंच थकावट आणि सुन्नता असल्या गोष्टींच्या कात्रीत सापडले होते.नंतर हळू हळू माझ्या लक्षात आलं की मी एका शब्दात काय अनुभवत होते ते.तो एकच शब्द होता: दुःखं.

मी ह्या दुःखाशी दोन हात करायचं ठरवलं.लांब रानात फिरायला जायचे,एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली बसायचे.देवाळात जाऊन बसायचे.
देवळातल्या किर्तनात भाग घ्यायचे.ह्या सर्वांचा काहीच उपयोग होत नव्हता.एकदा माझ्या एका मैत्रीणीने मला एका मेळाव्यात बोलवलं.अनेक तर्‍हेची दुःख सहन करून एकट्याच रहाणार्‍या समविचारांचा तो बायकांचा मेळावा होता. भातशेतीच्या परिसरात एक मोडका मांगर होता.आंब्याच्या झाडाच्या फळ्या कापून,लाकडाची जमीन बनविण्यात आली होती.शिवाय त्याची आणखी डागडूजी करून तो मांगर वापरण्याजोगा केला होता. त्या जागी आम्ही सर्व जमायचो.सगळी जमल्यावर आम्ही कधी कधी भजनं करायचो,कधी एकमेकाचे विचार एकमेकाना समजावून सांगायचो.ती एक चिंतनशील सक्रियता असायची.मनःशांती मिळायची.
एकदा अशीच मी चिंतनात मग्न असताना माझ्या मावशीची मला आठवण झाली.तीच्या जाण्यानंतर मला प्रथमच जाणीव झाली की पुन्हा मला दुःखाने घेरलं आहे.मी ही गोष्ट होण्यापासून खूप टाळलं होतं.”
“पण हे असं का झालं?”
असं मी तीला कुतूहलाने विचारलं.

“त्याचा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की एकदा त्या मांगरात असताना मी एकाएकी माझ्या पायाखालच्या लाकडी जमीनीवर एकटक बघू लागले होते.माझ्या मनात आलं की नक्कीच अगदी सुरवातीला ही लाकडाची जमीन रंगवून ती चांगली पॉलीश केली गेली असणार.त्यानंतर बरेच दिवस त्यावर अनेक पाऊलं चालली असावीत.खुर्च्या एकडे तीकडे करून तीचा वरचा थर खरचटला गेला होता.सूर्याच्या उन्हाने ती फिकी झाली होती.थंडीने ती आकसली गेली होती.शेवटी रंग आणि पॉलीश तर खरडून गेलं होतंच शिवाय लाकुड अगदी जूनं झालं होतं. आणि आता आता तर मुळ लाकडाचं रूप दिसू लागलं होतं.त्या लाकडावर असलेल्या नैसर्गिक आकृत्या उठून दिसत होत्या. आणि त्या आकृत्या पेंट आणि पॉलीशपेक्षा सुंदर दिसत होत्या.त्या जीवंत आंब्याच्या झाडाच्या सुरवातीच्या लाकडाचा भास होत होता.
मी माझ्या मैत्रीणीना हेच सांगत होते.माझ्या मावशीच्या मृत्युनंतर मी पण अशीच खरडलेली,पावलानी घासल्यासारखी, उन्हाने फिकी झालेली आणि थंडीने आकसलेली झाली आहे.माझ्या शरिराचा पृष्ट थर सुद्धा असाच खरडला गेला आहे.”
सुनंदा मला हे डोळयात पाणी आणून सांगत होती.

आणि नंतर पूढे म्हणाली,
“बरेच लोक मी ज्या दुःखातून जात होते त्याहूनही जास्त आणि भयंकर दुःखातून जात असतील.पण त्यांच्यासाठी मला काहीच सांगता येणार नाही.
परंतु ज्यांचा दुःखाचा दर्जा माझ्या दुःखाशी मिळता जुळता असेल त्यांना मी सांगेन की,मृत्यू,नुकसानी आणि निराशा ह्या बाबत नाराज होणं,ते नाकारणं आणि त्यापासून अलिप्त होणं असं करण्याची मुळीच जरूरी नाही.जर नशिबात असलं तर जीवनात मिळणारा चांगला किंवा तापदायक अनुभव आपल्याला आपल्या जीवनाचं जे खरं सार आहे त्याच्या जवळ आणून सोडतं.सारगर्भित आपला वयक्तिक नकाशा त्या जमीनीवरच्या लाकडाच्या नकाशासारख्या उजेडात आणतं.त्या लाकडाच्या जमीनीकडे पाहून मी माझी समाधानी करून घेत असते.”

सुनंदाचं हे मनोगत ऐकून मला तीच्याबद्दल आदर वाटला.मी तीला म्हणालो,
“सुनंदा,तू अविवाहित रहाणार आहेस असं त्यावेळी मला तू सांगीतलं होतंस ते किती दूरविचाराने सांगीतलं होतंस ते आत्ता हे तूझं ऐकून मला पटलं.सुख आणि दुःख हे जो तो कसं मानुन घेतो त्यावर अवलंबून आहे.आयुष्यात समझोता करून कसं रहायचं ते तुम्हा स्त्रीयांकडून शिकलं पाहिजे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

विजय अणावकरचा समजूतदारपणा.

“मी बरेच वेळा अपयशी ठरलो,खूप ठोकरी खाल्ल्या,पण असं होऊन सुद्धा मला वाटतं मुर्खता,क्लेश आणि दयनीयता जरी आजुबाजूला असली तरी हे जग चांगलं आहे.”

“मला नेहमी असं वाटतं की जीवनात आनंदी-आनंद अगदी साध्या साध्या गोष्टीतून मिळतो.एखादं रानटी रंगीबेरंगी फूल पहाण्यात, आवाज करीत जाणारा एखादा ओहळ पहाण्यात,नुसतं जरी कुणी सकाळी नमस्ते म्हणण्यात,एखादं सुंदर हस्त-चित्र पहाण्यात,एकांतात, एखाद्या पक्षाचं सुंदर गाणं ऐकण्यात,खूप धावून आल्यानंतर एखादं थंडगार दूधाचं ग्लास पिण्यात,आणि अशा लहानसहान किती गोष्टी सांगता येतील.
जेव्हा आमची छोटीशी मुलगी एखादं सुंदर फूल आम्हाला आणून द्यायची तेव्हा मला आणि माझ्या पत्नीला खूप उमेद यायची.किंवा आमच्या दोन्ही मुलांबरोबर जेव्हा आम्ही सूर्यास्त पहायला जायचो तेव्हा ही खूप आनंद व्हायचा.”
मला विजय अणावकर आवर्जून हे सांगत होता.

विजय मनःशांतीसाठी हे सांगत असला तरी त्याला आतून खूपच त्रास होत होता.त्याच्या मुलाच्या अपघाती निधनानंतर मी त्याला भेटत होतो. हाता-तोंडाला आलेलं मुल असं अचानक गेल्याने मुलाच्या आईवडीलांना काय होत असेल याची कल्पना फक्त ते भोगत असलेल्याच जाणवतं.
विजयचा मुलगा सोळ वर्षाचा होणार होता.आपल्या मित्राच्या स्कुटरवर मागच्या सीटवर बसला होता.एक अगदी शार्प वळण घेत असताना त्याचा तोल गेला आणि मागच्या मागे तो पडला.डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता.आणि जागच्या जागीच तो गेला.
मी ज्यावेळी विजयला भेटायला गेलो होतो तेव्हा बोलायला सुरवात कशी करूं असा प्रश्न पडला होता.

मी विजयच्याच बालपणाची आठवण काढून त्याला बोलता केला.
मी त्याला म्हणालो,
“कोकणात तुझं बालपण गेलं.तू लहान असतानाच तुझे वडील गेले.आठवतात का तुला तुझे ते दिवस?”

मला विजय म्हणाला,
“अगदी लहानपणाचे दिवस जरी आठवले नाहीत तरी काही वेळा सांगून ऐकलेले आणि काही स्मरणात राहिलेले दिवस नक्कीच आठवतात.
मी तीनएक वर्षाचा असेन जेव्हा माझे बाबा मला सोडून गेले.आणि त्यांच्या जाण्यानंतर आमच्या आईने आमच्यासाठी जे कष्ट घेतले त्याला सीमाच नाही.आमचं घर साधं असायचं आणि स्वच्छ आणि आकर्षक असायचं. शाळेतून किंवा कामावरून जेव्हा आम्ही घरी यायचो तेव्हा आमची आई आमच्यासाठी सदैव असायची.खूप थकलेली किंवा खूप व्यस्त असलेली कधीही वाटायची नाही.शनिवार हा विशेष लक्षात ठेवण्यासारखा दिवस असायचा.त्यादिवशी आमच्या घरात, खाण्याची विशेष डीश असायची.मग ती झुणका-भाकरी असो,चपाती-शिखरण असो वा एखादी केळं घालून शीर्‍याची डीश असो.”

मी विजयला म्हणालो,
“मला आठवतं तुझ्या मोठ्या भावाच्या आग्रहास्तव मी कैक वेळा तुमच्याकडे जेवायला राहिलो आहे.तुझी आई आपल्या सर्वांना आग्रह करून वाढल्यानंतर आपल्याला जेवताना पाहून तुझ्या आईच्या चेहर्‍यावरची तृप्ती पाहून मला तीच्या विषयी खूप आदर वाटायचा.बरं तू काय सांगतोस ते सांग”

मला म्हणाला,
“माझा पण एखादा मित्र आमच्या बरोबर जेवायला असायाचा. त्या दिवशी आम्ही मारूतीच्या मंदीरात न चूकता जायचो.
मारूतीचं मंदीर आमच्या रहात्या घरापासून बरचसं दूर असल्याने बरीच शेतं ओलांडून जायला लागायचं.वाटेत रानटी फूलं,केवड्याची बनं दिसायची आणि वेणीचा सर करण्यासाठी ओवळीची फुलं नविसरतां वेचून घरी आणायचो.देवाला वहाण्यात किंवा बायकानी डोक्यात माळण्यात त्या वेणीच्या सरांचा चांगलाच उपयोग व्हायचा.
मी शिकत असतानाच आईला मदत होण्यासाठी काही परचूटण कामं करायचो.चांगल्या लोकांच्या सानीध्यात मला काम करायला संधी मिळायची.मला नेहमीच वाटतं की कुठचही काम करताना ते चांगल्या तर्‍हेने करण्यात खरा अर्थ आहे. मग त्या कामासाठी मिळणार्‍या मोबदल्यापेक्षा त्यासाठी घेतलेली मेहनत जास्ती का असेना.मी असंही पाहिलंय एखाद्या कामासाठी पराकाष्टा केल्यास ते जास्त सोपं जातं, आणि दुसरं म्हणजे कुठचंही कठीण काम सोडून देण्यात हाशील नाही.तसंच कुठच्याही कामाची टाळाटाळ केल्यास ते जास्तच कठीण जातं.ही सर्व शिकवण आम्हाला आमच्या आईकडून मिळाली.”

मी विजयला म्हणालो,
“आणि आता तू आणि तुझी पत्नी मिळून कामं करीत असता.किती लोकाना मदत करीत असता.मला बर्‍याच जणानी तुझ्याबद्दल असं सांगीतलं आहे.”
विजयला त्याच्या विषयी असं लोक बोलतात हे माझ्या तोंडून ऐकून खूप आनंद झालेला दिसला.
मला लागलीच म्हणाला,
“मला आणि माझ्या पत्नीला एकत्र काम करायला खूप मजा येते. आमच्या हाताने,आमच्या डोक्याने आणि आमच्या ह्रुदयापासून ही कामं होतात. सृजनशील कामाचं शांतीदायक महत्व,सत्यशोध,आणि नव्या व जून्या मित्रांकडून मिळणारी प्रेरणा हे सर्व अनमोल आहे. मला वाटतं सर्वात जास्त समाधान जीवनात मिळतं जेव्हा आपण मदतीचा हात पुढे करतो आणि तो सुद्धा त्याना जे स्वतःहून वर येण्याच्या प्रयत्नात असतात तेव्हा.माझ्या दृष्टीने जास्तीत जास्त लोक जे काही मला माहित आहेत ते दयाशील,उदार आणि सहयोगशील असतात.”

आता मात्र विजयला आपल्या मुलाबद्दल विषय काढ्ण्यापासून राहावलं नाही.कारण त्याचा मुलगापण त्याच्या कामात त्याला मदत करायचा.त्याची आठवण येऊन विजय मला म्हणाला,
“सोळावं लागण्याच्या बारा दिवस अगोदर माझा एकच एक मुलगा अपघातात निधन पावला.ह्या अपघातातून तो वाचू शकला असता.पण आमचं कमनशीब म्हणावं लागेल.माझ्या स्वपनातलं आणि माझ्या आशेतलं सर्व काही त्याच्याकडे होतं.माझं सर्व जग त्याच्या जाण्याने संपूष्टात आलं.इतरा प्रमाणे मी ही त्या अघोर धक्क्यातून जगायला शिकलो.एका वेळी एक मिनीट,एक तास,एक दिवस.त्यापूढे सांगण्यात अर्थच नाही.
ह्या अपघातानंतर मी मनात कडवटपणा ठेवला नाही.उलट माझा देवावारचा विश्वास द्वीगुणीत झाला.मी बरेच वेळा अपयशी ठरलो,खूप ठोकरी खाल्ल्या,पण असं होऊन सुद्धा मला वाटतं मुर्खता,क्लेश आणि दयनीयता जरी आजुबाजूला असली तरी हे जग चांगलं आहे.”

आलेल्या दुःखातून सावरून,समजूतदारपणा ठेवून विजय स्वतःला संभाळून घेत आहे हे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं.मी त्याला जवळ घेत म्हणालो,
“विजय,हे ही दिवस जातील.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

अरूण आणि अरूणची आजी.

अरूणचा आपल्या आजीवर खूप जीव होता.तो आईपेक्षा आजीच्याच मांडीवर वाढला.लहानपणी झोपण्यापूर्वी आजीकडून एक तरी गोष्ट ऐकून घेतल्या शिवाय त्याला झोपच येत नसायची. तो चालायला लागल्यावर आजी त्याला आजुबाजूच्या परिसरात त्याचा हात धरून फिरायला न्यायची.जेव्हा आजी खूपच वयस्कर झाली तेव्हा त्याने आजीजवळ येऊन राहायचं ठरवलं.आजी जाईपर्यंत त्याने तीची सेवा केली.संध्याकाळ झाली की तीला तो उचलून
आणून पडवीत बसवायचा.वार्धक्यामुळे ती झोपेतच असायची.ते अरूणला समजायचं.
“माझी मला राहूं दे-लिव्ह मी अलोन-”
अशी तीची अवस्था झाली आहे ते त्याला कळायचं.पण तीचा जीव टिकण्यासाठी लागणार्‍या सर्व जरूरींची तो देखभाल करायचा.आजी गेल्यानंतर अरूण खूपच एकटा झाला.त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला हमखास आजीकडून मिळायची.आजीच्या निधनानंतर प्रश्नांची उत्तरं त्याची त्यालाच शोधून काढावी लागायची.
मी अलीकडे जेव्हा त्याला भेटलो तेव्हा सुद्धा तो आजीचाच विषय काढून मला जीवन मुल्यांचं तत्व सांगत होता.

“जेव्हा मी माझ्या जीवनाकडे मागे वळून पहातो आणि आतापर्यंत मिळालेल्या अनुभवातून कसली जीवन-मुल्य मी साधली ह्याबद्दल विचार करतो त्यावेळी,जसं एखादं जूनं चित्र आपण पहातो तसंच एक चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं.त्या चित्राचा पृष्ठ भाग श्रावण महिन्यातला एखाद्या सोनेरी दिवसा सारखा आहे,एक चार वर्षाचा मुलगा-बहुतेक मीच तो मुलगा-आजीबरोबर पायवाटेवरून चालला आहे,आणि रस्त्याच्या कडेला उगवलेल्या पिवळ्या रानफुलांकडे तो निरखून बघत आहे.
आजीने माझा एक हात धरला आहे.आणि माझा नेहमीच्या खेळण्यातला चेंडू माझ्या दुसर्‍या हातात आहे.आमच्या मागोमाग आमची सफेद रंगाची लहानशीच मनीमाऊ एका गळून पडलेल्या सुक्या पानाशी ते वार्‍याने सरकत पुढे जात असताना त्याचा पाठलाग करीत आहे,शेजार्‍यांचा दानगट कुत्रा मनीला पाहून भुंकत आहे आणि ते ऐकून पळून जाणार्‍या मनीचा पाठलाग करून तीला बाजूला पाडून आपल्या मागच्या दोन पायावर उभा राहून मला चेंडू फेकायला विनवणी करीत आहे.
ते मांजराचं पिल्लू हालचाल करीत नाही.अगदी निपचीत पडलं आहे.मी घाबराघुबरा होऊन सुद्धा माऊकडे पहात आहे.मोठी माणसं जो भयंकर शब्द वापरतात “मृत्यु” तो तीला आला होता.

काही तासानंतर पाऊस पडायला लागला. आजी आणि मी त्या पावसाचे थेंब आणि पडणार्‍या पावळ्या पहात आहो.
“आजी! मरण म्हणजे गं काय?”
मी आजीला विचारलं.
आजी मान हलवीत सांगते
“बाळा मला खरंच काय ते माहित नाही रे! मी आयुष्यभर ते काय आहे ते समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे.अजून काहीही समजू शकले नाही.एव्हडंच मला माहित आहे जसं जगणं आहे तसंच मृत्यु हा एक जीवनाचाच भाग आहे.जे जीवीत आहे त्या सगळ्याला ते लागू आहे.
तुझ्या मनीमाऊने ज्याचा पाठलाग केला होता ते पान पण मृत्यु पावलं आणि तुझी मनी पण गेली.त्या पिवळ्या रानफूलाकडे बघ,गेल्यावर्षी ती मरण पावली होती.आणि आता तुला दिसताहेत त्या फुलांचीपण तीच गत होणार आहे.
मनी पुढच्या श्रावणात परत येईल काय? कदाचीत.”
आजीने श्वास घेत सगळं सांगीतलं.
” “कदाचीत!”.मला नाही वाटत.काही ही म्हण.”
मी आजीला म्हणालो.”

हे अरूणकडून ऐकून घेतल्यावर मी त्याला म्हणालो,
“तुझ्या जीवनात तुझ्या आजीचा तुझ्यावर एव्हडा परिणाम झाला आहे की नेहमीच तू त्या चित्राकडे आणि आजीबरोबरच्या त्या संवादाकडे आकृष्ट झालेला दिसतोस.”

“सध्या तरी ह्याच माझ्या आयुष्यात जे मिळू शकेल ते मिळण्यासाठी मी व्यस्त आहे. माझ्या आयुष्यातल्या दिवसातून-कधी काळे कूट्ट दिवस तर कधी प्रखर दिवस- मी जसा मार्ग काढीत राहिलोय त्या मार्गकडूनच अशा विचारसरणीची आयोजना माझ्यात केली गेली आहे.आणि माझा त्यावर भरवंसा आहे.”
मला अरूणने लागलीच उत्तर दिलं.

मी म्हणालो,
“एखाद्याच्या आयुष्यभराच्या अवधित ह्या तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं कठीण झालं तर कदाचीत पुढच्या जन्मात ती उत्तर मिळावी अशी जीवनाची योजना असावी.कसं आणि कुठे हे सारं मिळू शकेल ते मला माहित नाही.”
मला अरूण म्हणाला,
“मला वाटतं जीवन सर्व मिळून,एकच प्रकारची,सतत वाढत जाणारी लयबद्द प्रक्रिया आहे.मला वाटतं जो तो स्वतःला अनुरूप करतो किंवा कुणाकडून केला जातो.तसंच जो तो स्वतःला विकसित करतो किंवा कुणाकडून केला जातो.
मी माझ्यात असलेल्या बुद्धिमत्तापूर्वक केलं की झालं,मग त्याचे परिणाम यशात किंवा अपयशात का होईनात.?”

“तुझ्याशी मी पूर्ण सहमत आहे.”
असं सांगून मी अरूणला म्हणालो,
“एखाद्या पोहणार्‍याचा जसा पाण्यावर विश्वास असतो तसाच तुझा तुझ्या जीवनावर विश्वास पाहिजे.मला वाटतं,निर्मिती ही सततची प्रक्रिया आहे.इथे आणि आत्ता असं मी म्हणतो.जे तू तुझ्या लहानपणी आजीकडून उत्तर मागू पहात होतास ते त्या चित्रातून तुला उघडपणे दिसत आलं आहे.ती पीवळी रानफुलं,ते सुकलेलं पान,ती तुझी मनीमाऊ.”
अरूणला माझं म्हणणं पटलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

असंभव स्वपनाचं सामर्थ्य.

“मोडकळून पडलेलं वाडवडीलांनी बांधलेलं ते जूनं घर पुन्हा बांधायची स्वप्नं तुझ्या मामाला पडत होती.”

कुसुम कर्णिक मला नेहमी म्हणायची,
“काका तुम्हाला मी एक दिवस आमच्या कोकणातल्या वाड्यात घेऊन जाणार आहे.माझे मामा आणि मामी त्या वाड्यात रहातात.त्या वाड्याला इतिहास आहे.माझ्या मामीच्याच तोंडून तो ऐकायला हवा.”
आज तो दिवस उजाडला.कुसुम बरोबर मी कोकणातल्या तीच्या गावाला गेलो होतो.वेंगुर्ल्याच्या जवळ तुळस नावाचं एक गांव आहे ते गांव पार करून पुढे गेल्यावर एक छोटसं खेडं आहे.त्या खेड्यात बर्‍याच वाड्या आहेत.तीथे मी कुसुम बरोबर गेलो होतो.

कुसुमच्या मामा-मामीने आमचं यथासांग स्वागत केलं.दोन दिवसाच्या मुक्कामात मजा आली.एका रात्री कुसुमची मामी आम्हाला आठवून आठवून सर्व हकीकत सांगत होती.
कुसुम मामीला म्हणाली,
“मामाने जीद्द करून हा सुंदर वाडा बांधला.अगदी पडक्या स्थितीत त्यावेळी असला तरी तो पडका वाडा आणि मामाचे वाडवडील ह्यांच्या बद्दल त्याला मनात भावना होत्या.”

मामी म्हणाली,
“त्याचं असं झालं,एक हरवलेला फोटो गवसला.एका जुन्या पुस्तकात तो मिळाला.जूनी पुस्तकं झाडून साफ करण्याच्या माझ्या नादात तो फोटो त्या पुस्तकातून खाली पडला.त्या फोटो मधे तुझा मामा एका कोसळून पडलेल्या जुन्या औदूंबराच्या झाडाच्या बुंध्यावर बसून त्या झाडाच्याच बाजूला पडलेल्या मोठ्या फांदीला टेकलेला अशा पोझ मधे होता.त्याच्या शर्टाच्या बाह्या दोन्ही खांद्यातून खाली उतरल्या होत्या आणि त्याची एक-टक नजर नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यानंतर हिरवं गार झालेलं आसमंत पहाण्यात गुंतली आहे असं दृष्य होतं.”

मी म्हणालो,
“हा इतका सुंदर फोटो कुणी काढला?”
मामी कुसुमला उद्देशून म्हणाली,
“मला आठवतं माझं नुकतच लग्न तुझ्या मामाबरोबर झालं होतं. माझ्या पूर्वी पासूनच्या आठवण ठेवण्यासारख्या दृश्यांचा फोटो घेण्याच्या उत्कंठेमुळे हा फोटो ही त्यातला एक होता. हार कधीही मानायची नाही ह्या वृत्तीच्या तुझ्या मामाच्या संवयीचा तो एक पुरावा म्हणून मी फोटो काढला होता.मला अजून आठवतं ज्यावेळी मी माझ्या कॅमेर्‍याची कळ दाबली त्यावेळी माझ्या मनात तुझा मामा आणि त्याची असंभव स्वप्नं मला आठव्ण करून देत होती. अनेपेक्षीतपणे आलेल्या वादळात हे दोनशे वर्षापूरवीचं औदुंबराचं झाड वार्‍यापावसाला टक्कर देत देत बिचारं कोसळून खाली पडलं होतं. जीवंत रहाण्याची त्या झाडाची खोल गेलेल्या मुळांवरची पकड ढिली झाली होती.”

कुसुमने मामीला विचारलं,
“तू असंभव स्वप्नं का म्हणतेस?”
“असंभव स्वप्नं मी एवढ्यासाठीच म्हणते कारण हे औदुबराचं झाड ज्या आवारात होतं तो सर्व परिसर आमच्या घराण्यातल्या जुन्या वाड्याचा एक भाग होता.मोडकळून पडलेलं वाडवडीलांनी बांधलेलं ते जूनं घर पुन्हा बांधायची स्वप्नं तुझ्या मामाला पडत होती.ह्या घराच्या चिरेबंदी भिंतींचा आधार घेऊन तात्पुरत्या बांधलेल्या घरात गेली कित्येक वर्षं आमचेच काही जवळचे वारसदार रहात होते.जूने कागद पत्र शोधत असताना तुझ्या मामाला आणि मला जूने फोटे पाहायला मिळाले.त्या फोटोत हे त्यावेळचं भक्कम घर आणि घराच्या मागे बांधलेला मांगर दिसत होता.”
मामीने आपला विचार सांगीतला.

ती पुढे म्हणाली,
“एका फोटोत तुझ्या मामाचे पुर्वज-बायका, पुरूष आणि मुलं-दिसत होती.मुलं मोठ्यांच्या पायाजवळ बसलेली होती.मोठी माणसं नक्षीदार लाकडी खुर्च्यांवर विराजमान झालेली दिसत होती.एका फोटोत नोकरांसाठी बांधलेला मांगर आणि त्या मांगराच्या बाजूला गाई म्हशींचा विस्तारलेला गोठा दिसत होता.
मोठ्या मंडळीत वयस्कर लोक फेटा किंवा पगडी डोक्यावर घेऊन अंगात लांब मोठ्या बटणांचा कोट आणि त्यावर उपरणं घेतलेली दिसत होती. साधारण तरूण मंडळी काळ्या टोप्या,कोट आणि पाटलोण नेसलेली दिसत होती.बायका नऊवारी साड्या, लांब हाताचे ब्लाऊझ नेसून,त्यांचे पाय अनवहाणी होते.खाली बसलेली मुलं अर्ध्या पाटलोणी वर तोटका कोट आणि डोक्यात जरीच्या टोप्या घातलेली दिसत होती.बोडकं डोकं कुणाचही नव्हतं.फोटोत बोडकं दिसणं अशूभ असावं.
हा फोटो घराच्या समोरच्या अंगणात बसून घेतलेला असावा.घराच्या भिंती चिरेबंदी असल्या तरी त्याला सफेद चून्याचा रंग दिला होता.
अगदी अलीकडच्या फोटोत एक माणूस कच्च्या सिमेंटचा गिलावा केलेल्या भिंती समोर उभा राहिलेला दिसत होता. आमचे शेजारी सांगतात की, हे सर्वांत शेवटचं कुटूंब इथे रहात होतं.”

मी म्हणालो,
“एकदा का घराच्या डागडूजीकडे दुर्लक्ष झालं की एवढ्या मोठ्या घराला कोसळून पडायला वेळ लागत नाही.”
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलला”
असं म्हणत मामी पुढे म्हणाली,
“त्या औदुंबराच्या झाडाप्रमाणे ह्या घरानेही धीर सोडलेला दिसत होता. घराच्या वरचं छप्पर कुठे कुठे कोसळून अर्धवट खाली सरकलं होतं. प्लास्टर दिलेल्या भिंतीना चांगल्याच भेगा आलेल्या दिसत होत्या. आणि शेवटी एकदा कधीतरी आग लागून जे काही आपल्या पायावर उभारून राहिलं होतं ते त्या आगीच्या भक्षस्थानी गेलं.आणि राहिलं ते फक्त लोखंडी कांबी आणि चिरेबंदी भिंती.”

कुसुम थोडी भावनावश होऊन मामीला म्हणाली,
“हे बघून मामा खरोखरच दुःखी झाला असेल ना?”
“तुझा मामा चेहर्‍यावर कधीच दुःख दाखवीत नाही.कारण सांगते”
मामी पुढे म्हणाली,
“हे सगळं बघून तुझा मामा मला त्यावेळी म्हणाल्याचं आठवतं,
“पाया मजबूत दिसतो.”
असं म्हणून, सिमेंटची थापी आणि घमेलं भरून सिमेंट घेऊन आणि त्याच्याबरोबर त्याची स्वप्नं घेऊन तो कामाला पण लागला होता. माझा तुझ्या मामावर विश्वास होता.त्याच्या स्वप्नावरही विश्वास होता.कारण अशी स्वप्नं करताना माझ्या वडीलाना मी जवळून पाहिलं आहे.”

“तुमचे वडील गणपतीच्या मुर्त्या बनवायचे असं मला कुसुम बरेच वेळां म्हणाल्याचं आठवतं “
मी मामीला म्हणालो.

“माझे वडील गणपतीच्या मुर्त्या बनवायचे.त्या मुर्त्या गणपतीच्या सणात शेकडोनी विकल्या जायच्या.मी लहान होते तेव्हा त्यांच्या गणपतीच्या कारखान्यात दिवसभर असायची.कधी कधी तिकडेच झोपी जायची.ती गणपती बनवायची गणपतीची चिकण माती,मुर्ती बनत असताना चिकण मातीला गणपतीचा आकार आणताना लागणारी आयुधं,ते निरनीराळ्या रंगाचे डबे,सोनेरी वर्ख आणण्यासाठी लागणारे ब्रश ही सर्व साधनं मी मोठी होईतो पहात आली होती.माझे वडील दरवर्षी गणपतीच्या मुर्त्या तयार करण्याच्या स्वपनात असायचे मग मला पण स्वप्न काय ते कळायला कठीण
गेलं नाही.”
मामीने आपल्या जून्या आठवणी उजळण्याचा प्रयत्न केला.
यावर कुसुम मामीला म्हणाली,
“मला तुझ्याकडून हे मामाबद्दल ऐकून त्याच्या बद्दल आदर वाटतो.”

“तुझ्या मामाच्या स्वपनांना पण कळायला मला कठीण गेलं नाही.
ती सहा वर्ष चिर्‍यावर चिरा ठेवण्याचा, विटेवर विट ठेवण्याचा धीर बाळगून शेवटी आम्ही हा वाडा आम्हाला रहाण्याजोगा केला.हा वाडा आणि तुझ्या मामाची तो पुन्हा बांधण्याची स्वप्नं माझ्यात असंभव स्वपनातलं सामर्थ्य दाखवयला कारणीभूत झाली आहेत.”
असं म्हणताना मामीचे डोळे पाण्याने भरले होते.पण त्यात अभिमानाची आणि तृप्तीची चमक दिसत होती.

शेवटी मी मामाली म्हणालो,
“कुसुम इकडे येण्यासाठी माझ्या मागे का लागली होती ते आता मला कळलं.कारण ह्या वाड्याचा इतिहास तुमच्याच तोंडून ऐकण्यात जी मला मजा आली ती एरव्ही आली नसती.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

भिडता नजर तुझ्याशी लाज वाटे मला

अनुवादीत. (ठंडी हवाएं……)

थंड थंड हवा आली लहरत लहरत
बोलावू कसे सजणां आला ऋतु बहरत

चंद्रमा अन तारे हंसवे दृश्य सारे
मिळूनी सगळे हृदयी जादू जागविणारे

सांगवे ना मला रहावे ना मला
भिडता नजर तुझ्याशी लाज वाटे मला

कथा अंतरातल्या जाणवे अंतराला
ओढ अंतराची सजणा सांगू कशी तुला

भिडता नजर तुझ्याशी लाज वाटे मला

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

माझी दाभोलीची भेट.

“ह्या मुक्या जनावरांकडून बरंच शिकण्यासारखं असतं.ह्या चरवीत दुध भरत असताना,आणि तुझी कपिला तीच्या समोर ठेवलेल्या वैरणीचं रवंथ करीत असताना,उपकारांची परत फेड लागलीच किती सहजगतीने करीत आहे हे माणसाने शिकण्या सारखं आहे.”

आज बरेच दिवसानी मी कोकणातल्या दाभोली गावाला गेलो होतो.माझ्या चुलत भावाची ह्या गावात बरीच शेतीवाडी आहे.भातशेती तो तर करतोच त्याशिवाय ऑफसिझनमधे भाजीची पण लागवड करतो.त्याशिवाय त्याच्या कडे गाईगुरं आहेत,शेळ्या-मेंढ्या आहेत,कोंबड्यांची खुराडं ही आहेत.
अलीकडे तो बराच थकला आहे असं मी ऐकलं होतं. शिवाय थोड्या दिवसापूर्वी त्याच्या पत्नीचं-म्हणजेच माझ्या वहिनीचं- एकाएकी निधन झालं होतं. म्हणूनच त्याची भेट घेण्यासाठी मी दाभोलीला आलो होतो.त्याचा मुलगा अलीकडे माझ्या भावाला कामाचा जास्त व्याप न देता स्वतःच सर्व कारभारात लक्ष घालीत होता.

मी घरात शिरताच माझी पहिली भेट झाली ती माझ्या भावाच्या नातवाशी.मुंबईला इन्जीनीअरींग कॉलेजमधे तो तिसर्‍या वर्षात शिकत होता.त्याला मला बघून आनंद झाला.त्याच्या मागोमाग माझा पुतण्या बाहेर आला.निपचीत पडलेल्या माझ्या भावाच्या खोलीत मला घेऊन गेला.तो शांत झोपलेला पाहून मी खूणेनेच पुतण्याला सुचवलं की आपण नंतर तो जागा झाल्यावर येऊंया.
माझा पुतण्या आणि त्याचा मुलगा आम्ही बाहेरच्या पडवीत गप्पा मारायला बसलो होतो.घरातलं दुःखी वातावरण पाहून,समजूत घालण्याच्या उद्देशाने विषय काढावा म्हणून मी त्यांना म्हणालो,
“जसं आपल्याला हवं तसंच आपलं जीवन असेलच असं होत नाही.”
आणि पूढे म्हणालो,
“असं म्हटलं जातं की,
“सुख शोधायचं असेल तर जे आपल्याला मिळतं तेच आपल्याला हवं असतं असा समज आपल्यात असायला हवा.”

माझा पुतण्या मला म्हणाला,
“अशी गुढावस्था प्राप्त करून घेणं सोपं नसतं. माझ्या आजुबाजूच्या लोकांचे चेहरे न्याहाळल्यावर,ही गुढावस्था प्रात्प न व्हायला मी काही एकटाच नाही असं मला दिसून येतं.”
आणि मला पुढे म्हणाला,
“आता पर्यंतच्या आयुष्यात अनेक धक्के खावे लागले.मी ज्यावेळी तरूण होतो तेव्हा मी माझ्या पडेल त्या कामात व्यग्र असायचो. शारिरीक आपत्यांना तोंड द्यावं लागायाचं.रात्री रात्री पर्यंत कामं करावी लागायची.दुसर्‍या कामाचा शोध घ्यावा लागायचा.विचार करायला वेळच गवसत नव्हता.”

आपल्या वडीलांची री ओढत त्याचा मुलगा म्हणाला,
“अलीकडे माझ्या आयुष्यात मला भासलं त्याप्रमाणे माझ्या आजीच्या निधनाने उलटापूलटी आली आहे.वयाने ती एव्हडी वृद्ध झाली नव्हती. तरी एकाएकी ती निघून गेली.आजीचं माझ्यावर खूप प्रेम होतं.ती एकाएकी निघून गेल्याने मला अपरिमित दुःख झालं आहे. दुःखी माणसाचा चेहरा मला मी प्रात्प करून घेतला आहे.
लहानपणाच्या संवयी प्रमाणे कुणी जरी विचारलं,
“कसं चालंय?”
तर ओघाने
“ठिक ठाक”
असं उत्तर यायचं.पण आता तसं होत नव्हतं.”

मी त्याला म्हणालो,
“आपण हंसलो तर जग आपल्या बरोबर हंसणार नाही काय?
आणि रडायला मात्र एकट्यालाच लागतं.
मात्र अतिउत्तेजीत क्रियाशीलतेत चटकन निसटून जाता येत नाही हे अगदी खरं आहे.”
माझा भाऊ उठल्यावर त्याची भेट घेऊन रात्री त्याच्या बरोबरच जेवण करून आम्ही सर्व झोपलो.
सकाळी उठल्यावर चहापाणी होण्यापूर्वी गाईंच्या गोठ्यात एक फेरी टाकावी म्हणून गेलो.तिकडे नातू गाईचं दूध काढताना दिसला. इन्जीनीयरींग शिकत असला तरी घरी आल्यावर शेतकर्‍याची कामं किती उत्साहाने करतो ते पाहून मला त्याचं कौतूक वाटलं.मी त्याच्या जवळ एक लहान स्टूल ओढून घेऊन बसलो.सूर सूर आवाज करीत गाईच्या आंचळातून येणार्‍या दुधाचा त्या पितळेच्या चरवीत पिचकार्‍यांचा आवाज ऐकून मला जरा मजाच वाटली.

मी नातवाला म्हणालो,
“ह्या मुक्या जनावरांकडून बरंच शिकण्यासारखं असतं.ह्या चरवीत दुध भरत असताना,आणि तुझी कपिला तीच्या समोर ठेवलेल्या वैरणीचं रवंथ करीत असताना,उपकारांची परत फेड लागलीच किती सहजगतीने करीत आहे हे माणसाने शिकण्या सारखं आहे.”
माझा हा विचार त्याला इतका आवडला की,भरलेल्या चरवीवरचा दुधाचा फेस फुंकून हाताने बाजूला करीत असताना मला म्हणाला,
“कालचीच गंमत मी तुम्हाला सांगतो.चला आपण त्या बाकावर जाऊन बसूया.”

दुधाची भरलेली चरवी नोकराकडे देत मला पुढे सांगू लागला.
“काल सकाळीच मी नेहमी प्रमाणे आमच्या कपिलेची आंचळं धूऊन असाच दोन पायात पितळेची चरवी धरून दूध काढीत बसलो होतो.ते सफेद अमृत मला सोन्याच्या मोलाचं वाटतं.माझ्या आजीचा मोत्या माझ्या मागे घुटमळत होता.कपिलेचं दूध काढीत असताना मोत्या नेहमीच गोठ्यात येऊन त्याला आवडणार्‍या कोपर्‍यात जाऊन बसतो. माझं लक्ष  मोत्याकडे गेलं. तो त्या कोपर्‍यात जाण्यापूर्वी एकदम थांबला.जरा चकीत झाल्या सारखा दिसला आणि तो कोपरा सोडून दुसर्‍या कोपर्‍यात जाऊन बसला.मी दुधाची चरवी भरल्यानंतर बाजूला ठेऊन त्याला तिथे काय दिसलं ते पहायला म्हणून त्या जागी गेलो.
सफेद-काळ्या केसांचा पुंजका तिकडे पडला होता.काल मी आमच्या तानुलीच्या-शेळीच्या- शेपटीवरचे केस भादरले होते.ती आता दोन महिन्याचं पोट घेऊन फिरत असते.लवकरच तीला छबकडं होईल. केसाचा तीला उपद्रव होऊं नये म्हणून मी तीची नीगा ठेवीत होतो.तो केसांचा पुंजका उचलून मोत्या जवळ गेलो आणि त्याच्या नाका जवळ नेऊन पाहिलं.त्याने तात्पूरतं हुंगल्यासारखं करून शेपटी हलवली.जणू त्याला सांगायचं होतं की,
“मला ठाउक आहे.”

हे ऐकून त्याला मधेच थांबवीत मी हंसत हंसत त्याला म्हणालो,
“एखादी केवळ गोष्ट,एखादा केसाचा पुंजका,एखादी जमिनीला आलेली खांच,एखादा कागदाचा तुकडा सुद्धा आकस्मिक भय ह्या प्राण्यांत आणू शकतो.
कारण त्या क्षणाला त्यांना तेव्हडंच दिसतं.हे प्राणी ती एकच एक दिसलेली गोष्ट आजुबाजूला असलेल्या गोष्टींच्या संदर्भात पाहू शकत नाहीत.”
“अगदी बरोबर आहे तुमचं.कसं ते सांगतो.माझ्या पण मनात तसाच विचार आला.”
आणि मला तो पुढे म्हणाला,
“त्या मोत्याला भासलेल्या भितीतून माझ्या लक्षात आलं की मी पण असाच माझ्या आजीच्या निधनाकडे बघीतलं तर?.त्या केसाच्या पुंजक्यासारखी मला ती घट्ना वाटून घेतली तर?.”
असं म्हणून माझ्याकडे तो उत्तराची अपेक्षा करतो आहे असं वाटलं.

हे ऐकून मला त्याचं कौतूक वाटलं.इन्जिनीयरींगच्या तीसर्‍या वर्षात शिकत असल्याने किती पोक्तपणा त्याला आला आहे हे पाहून मी मनात म्हटलं ह्याला आताच विचारावं की होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल खंत करीत बसणं किती संयुक्तीत राहील?.
मी म्हणालो,
“तुला हवं तसं हे जीवन नसेलही.पण कसंतरी करून जर एखाद्याच वेळेला त्या कपिलेच्या पांढर्‍या अमृताकडे तू सोन्याच्या मोलाने पाहू शकतोस,सुखद स्मृतिना आठवू शकतो्स,तर कदाचीत असंच एखादं कारण धुंडाळून तू जीवनाचा मार्ग काटू शकशील.”
म्हणे पर्यंत नोकर,
“चहा तयार आहे सर्व वाट बघतायत.”
असा निरोप घेऊन आल्यामुळी आम्ही तो विषय तीथेच सोडून आत चहाला गेलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

आशावादी अनिल.

“मला त्या माझ्या अपघाताबद्दल काहीच आठवत नसल्याने,मी त्याचा विचार करायचाच सोडून दिला आहे.इतक्या वर्षांनंतर मला हळू हळू जो स्वास्थ्यलाभ होत आहे त्याच्यावरच मी माझी भिस्त ठेवली आहे.”

अनिल-अरूण हे भाऊ भाऊ मागे पुढे जरी जन्माला आले तरी जणू जूळेच भाऊ कसे वाटतात.दोघांत दोनएक वर्षाचं अंतर असावं.आता त्यांची लग्न वगैरे झाली आहेत आणि एकाच बिल्डिंगमधे जवळ जवळ फ्लॅट घेऊन रहातात.आज का कुणास ठाऊक बरेच वर्षानी त्यांची आठवण आली म्हणून सहजच अनिलच्या घरी गेलो होतो.अनिल मला पूर्वी एकदा भेटला होता आणि तो म्हणाल्याचं आठवतं,
“मला त्या अपघाताचं काही आठवत नाही.लोकं सांगतात त्यामुळे मला माहित होतं.मेंदूवर इतका गंभीर आघात होता का?”

अलीकडेच मी माझ्या एका मित्राबरोबर एका चर्चा सत्राला गेलो होतो.त्याचा विषय होता,
“How memory functions”
त्यातलीच लक्षात असलेली माहिती अनिलला ऐकून उपयोगी होईल ह्याच उद्देशाने मी त्याला भेटायला गेलो होतो.
रविवारचा दिवस असल्याने अनिल घरी भेटेल याची खात्री होती.मला पाहून त्याला आनंद झाला.
माझा पुतण्या आणि अनिल-अरूण एकाच शाळेत जायचे.त्यांची शाळा चालत जायला लांब होती पण रिक्षेने जायला सोयस्कीर असल्याने,हे तीघेही बरेच वेळा एकाच रिक्षेने शाळेला जात येत असत.

नशिबाचा भाग आहे,का कुणास ठाऊक त्यांच्या रिक्षेला एकदा अपघात झाला त्यादिवशी माझा पुतण्या त्या रिक्षेत नव्हता.त्याला बरं नव्हतं म्हणून त्यांच्याबरोबर शाळेत गेला नव्हता.मला वाटतं त्यावेळी ही मुलं जवळ जवळ पंधराएक वर्षाची होती.मी अनिलला त्या अपघाताची आठवण काढून म्हणालो,
“तो दिवस आठवला की अंगावर कांटा येतो.त्यातून तुम्ही दोघे भाऊ बचावला हाच त्यातला सर्वांत आनंदाचा क्षण आहे.”
अनिल त्या दिवसांची आठवण काढून म्हणाला,
“आमच्या लहानपणी झालेल्या त्या गंभीर अपघातातून आम्ही सहीसलामत बचावलो हे आमचं नशीब समजलं पाहिजे. मला वाटतं मी पंधराएक वर्षाचा असेन.बरा होऊन मी माझ्या अंथरूणातून जो उठलो तो त्या क्षणापासून त्या पूर्वीची सर्व स्मृति मी विसरूनच गेलो होतो.खरं सांगायचं तर मी बरा झालो हे कुणी मला सांगीतलं,त्यातून उठलो हे पण माझ्या स्मृतित नव्हतं.”

मी अनिलला म्हणालो,
“स्मरणशक्ति ही एक संभ्रमात टाकणारी गोष्ट आहे.माहिती आणि विचार जसे एखाद्दया एन्सायक्लोपिडीयामधे असतात त्याच्यापेक्षाही लाखोपटीने जास्त माहिती ह्या तिन पौंडाच्या गोळ्यामधे भरलेली असते.
स्वतःची डिसीझन घेणं,विचार करणं,आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी करणं, हालचाल करणं ही सर्व कामं मेंदु करतो.”
अनिल म्हणाला,
“मी आणि माझा भाऊ अरूण आम्ही दोघे शाळेत जाण्यासाठी रिक्षा केली होती.तुमचा नितीन त्याच दिवशी आमच्या बरोबर नव्हता. रिक्षावाल्याने समोर येणार्‍या ट्र्कशी टक्कर  टाळण्यासाठी एकदम डाव्या बाजूला रिक्षा फिरवली आणि आम्ही दोघे भाऊ रिक्षेच्या बाहेर फेकले गेलो.मी ताबडतोब बेशुद्ध झालो.जवळ जवळ चार दिवस मी कोमात होतो.हे पण सर्व मला आठवत नाही लोक म्हणतात ते मी तुम्हाला सांगीतलं.”

मी अनिलला म्हणालो,
“हीच तर आपल्या मेंदूतली गंमत आहे.तुला मी त्यातली मेंदूची प्रकिया सांगतो त्यामुळे तू म्हणतोस की तुला सर्व काही आठवत नाही त्याचं कारण समजेल.
त्याचं काय आहे,शॉर्टटर्म,लॉन्गटर्म,आणि ऍनसेसटरल असे मेमरीचे तिन प्रकार आहेत.माहिती लिहून ठेवणं, राखून ठेवणं(store करणं) आणि काढून त्याचा उपयोग करणं ही एक मेमरीची प्रोसेस आहे. काही वेळेला ही माहिती कायमची राखून ठेवणं आणि नंतर कधी तरी उपयोगात आणण्यासाठी काढून घेणं हे त्या त्या जरुरी प्रमाणे ठरवलं जातं.ही माहिती किती वेळ राखून ठेवणं हे पण प्रोसेस ठरवते.”

“मला हॉस्पिटलमधे भेटायला येणारा प्रत्येक जण मी लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करीत असे असं मला लोकांनी सांगीतलं.ह्या प्रार्थनेमुळे जरी मला बरं होता आलं तरी कूठल्याही शारिरीक क्षतिनंतर स्वास्थ्यलाभ व्हायला म्हणजेच recovery व्हायला बराच वेळ लागतो.माझंही तसंच झालं.कधी कधी मला वाटतं मी अजून बरा व्हायचा आहे.”
माझं मेमरीबद्दलचं स्पष्टीकरण ऐकून अनिल आपली recovery कशी होत गेली ते आठवून आठवून सांगण्याचा प्रयत्न करीत होता.

मी अनिलला मेमरीची आणखी माहिती देत म्हणालो,
“रिकॉल,रिकलेक्शन,रिकगनिशन,आणि रिलर्नींग’असे चार प्रकार मेमरी प्रोसेसचे आहेत.
रिकॉल म्हणजे भूतकाळातली माहिती आठवणं.
रिकलेक्शन म्हणजे माहितीची ’रिकन्स्ट्रकशन करून मग आठवण करणं.
रिकगनिशन म्हणजे पुर्वीची झालेली घटना आठवणीत ठेवून नंतर तिची उजळणी करून लक्षात आणणं.
रिलर्नींग म्हणजे घटना परत परत आठवणं.म्हणजेच त्याच, त्याच घटनेची पुनावृत्ती करणं.”

“मला त्या माझ्या अपघाताबद्दल काहीच आठवत नसल्याने,मी त्याचा विचार करायचाच सोडून दिला आहे.इतक्या वर्षांनंतर मला हळू हळू जो स्वास्थ्यलाभ होत आहे त्याच्यावरच मी माझी भिस्त ठेवली आहे.
मला वाटतं स्वास्थ्यलाभ ही एक निरंतर प्रकिया आहे.म्हणजेच ती प्रक्रिया कधीही अंत पावणारी नाही.ह्या बाबतीत मला सकारात्मक म्हणजेच आशावादी रहावंसं वाटतं.कारण निराशावादी रहाणं म्हणजेच स्वास्थ्यलाभण्यापासून वंचीत असणं.”
अनिलचं ही आशावादी प्रवृत्ती मला आवडली.

मेमरी विषयी अनिलला अधीक सांगण्याचं सोडून देऊन मी त्याला म्हणालो,
“आशावादी असण्याचा अर्थच असा आहे की,
“जे काही घडत आहे ते नेहमी चांगल्यासाठीच घडत असतं असं भर देऊन सांगीतलेलं मत.”
पण त्याचा संबंध श्रद्धा,अपेक्षा,पूर्वानुमान, विश्वास,प्रत्याशा, आत्मविश्वास,आकांक्षा ह्या शब्दांशी पण जोडला जातो. आणि ह्या सर्व शब्दांवर आशावादी व्यक्ति भरवंसा ठेवते. कारण त्या सर्व शब्दात त्यांच्या अर्थाचं मूर्तरूप सामावलेलं असतं.”

“एखादा डॉक्टर म्हणो वा नाम्हणो की,
“तुम्ही अपेक्षेपेक्षा सुधारलात किंवा कुदारलात”
तरी डॉक्टरचं ते म्हणणं ऐकूनही मला तुम्ही आशावादी म्हणा किंवा त्याचा संबंध असलेले इतर शब्दाप्रमाणे म्हणा त्या सर्व शब्दातलं बळ मी स्विकारतो.”
अनिल माझ्याशी जणू सहमत होऊनच म्हणाला.

त्यावर मी त्याला म्हणालो,
“बिकट झालेल्या परिस्थितीतून स्वास्थ्यलाभ झाला तर त्याकडे नुसत्या शारिरीक दृष्टीकोनातून झालेली प्रगती असं समजून चालणार नाही.किंवा ही प्रगति एखाद्या आलेखावर नोंदण्यासारखी नसते.
मला विचारशील तर मी म्हणेन स्वास्थ्यलाभ होत रहाणं हा एक प्रवास आहे.आणि ह्या प्रक्रियेच्या जरूरीचा तीव्रतेने बोध झाल्यावर त्यानंतरचा आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा प्रवास आपल्यात सामिल करून घेतो.”
आणखी पुढे जाऊन मी त्याला सांगीतलं,
“मला वाटतं,स्वास्थ्यलाभ हा सहजासहजी आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही.किंवा तो त्या प्रक्रियेतला काही रिवाज होऊ शकत नाही.
उलट स्वास्थ्यलाभ हा आपल्याकडून होणार्‍या प्रकटनाचा प्रकार आहे. ते तुमचं मनोबळ आणि व्यक्तित्व त्यातून विकसीत करतं.आणि ह्या प्रक्रियेपासून तुम्ही दूर राहून काहीही साध्य केलंत तरी ह्या गोष्टी इतकं ते अर्थपूर्ण होणार नाही.श्रद्धा,अपेक्षा,पूर्वानुमान वगैरे महत्वपूर्ण शब्द ह्या प्रक्रियेत अंतर्भूत असतात.”

“काका,बरेच दिवसानी आपण भेटलो हे बरं झालं.मला राहून राहून वाटायचं की मी आशावादी रहाण्यात जरा अतीच करतोय.पण तुमच्याचकडून आशावादी असण्याचा अर्थ कळला.ते बरं झालं. कारण सर्व तर्‍हेच्या नाडी/नस वगैरेच्या मोजमापानुसार माझी स्वास्थ्यलाभाची प्रक्रिया पूर्णत्वाला आल्याचं मला सांगीतलं गेलं. आणि मी आता इतरांप्रमाणे पूर्ण सामान्य झालो आहे.
पण खरं पाहिलं तर मी जो पूर्वी होतो तसा आता नाही.माझा स्वास्थ्यलाभ पूर्णत्वाला येणं शक्य नाही हे मला नक्कीच माहित आहे.”

शेवटी हंसत हंसत मी अनिलला म्हणालो,
मला वाटतं तुला आशावादी रहाण्यापासून थांबवलं जाणं हे ही शक्य नाही.हे मात्र मला नक्कीच माहित आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmai.com

तांब्याचं कडं.

“प्रत्येकाकडे त्यांचीच स्वतःची कहाणी असते. हे कडं वापरून ज्याला त्याला त्याचा प्रत्यय येतो.”

मागे एकदा मी मामा काण्य़ांच्या हॉटेलमधे चहा आणि बटाटावडा खाण्याच्या उद्देशाने गेलो होतो.मला वाटेत कर्णीकांची शोभा भेटली, तीला पण मी माझ्या बरोबर कंपनी म्हणून बोलावलं.आम्ही एका टेबलावर जाऊन बसलो आणि दोन कप चहा आणि दोन प्लेट वडे आणि त्याच्या बरोबर मामा काण्यांची खास चवदार लाल रंगाची सुकी चटणी मागावली. कांद्याच्या भजांच्या भांड्यात उरलेला चूरा मिरचीच्या तिखटाबरोबर मिक्स करून नंतर तीचा भूगा करून ती चटणी ते बनवतात म्हणून मी ऐकलं होतं.भज्याच्या चूर्‍याचा अश्यातर्‍हेने चांगलाच उपयोग होतो.

मला कुणीतरी सांगीतलं होतं की मिसळ -पाव मामा काण्यांकडे फ़ार पूर्वी पासुन मिळायची.मामा काण्यांच्या हॉटेलला ह्या २०१० च्या फेब्रुवारीला शंभर वर्ष पूर्ण होणार.बापूसाहेब काणे स्वतःच मला त्यादिवशी फोनवर म्हणाले. उसळ गरम करून त्यात कच्चा बारीक कांदा,बारीक शेव आणि थोडाच उसळीचा रस्सा घालून ती पावाबरोबर मिसळ-पाव प्लेट म्हणून विकली जायची.शंभर वर्षापूर्वी ती डीश फारच लोकप्रीय होती.
बापूसाहेब काणे हे मामासाहेबांचे थोरले चिरंजीव.म्हणजे मामासाहेबांची दुसरी पिढी.

माझी आणि बापूसाहेबांची ओळख tifrमधली. मला आठवतं त्याप्रमाणे बापूसाहेब काही वर्ष स्विडनला कंप्युटर सॉफ्ट्वेअर शिकायला गेले होते. tifr मधल्या CDC 3600 नावाच्या कंप्युटरवर इतरांबरोबर आम्ही दोघे काम करायचो. हा कंप्युटर डॉ.भाभा यानी अमेरिकेतल्या CDC corporation ह्या कंपनीतून मिनियापोलीसमधून आयात केला होता.बापूसाहेब सिनियर प्रोग्रामवर होते आणि मी हार्ड्वेअर इंजिनीयर होतो.फोरट्रॉन,कोबोल,पास्कल वगैरे कंप्युटरच्या भाषा-languages-मधे बापूसाहेबांचा हातखंडा.त्यातल्या त्यात फोरट्रॉनवर बापूसाहेब काण्यानी
पुस्तकंही लिहिली होती.

tifr मधे काम करून ड्युटी संपल्यावर म्हणजे संध्याकाळचे पाच वाजल्यानंतर बापूसाहेब तडक हॉटेलात काम करायला यायचे.
कधी गल्ल्यावर बसलेले दिसायचे तर कधी भटारखान्यांत स्वयंपाक्याना सल्ला द्यायला जायचे.अजूनही ते बरेच वेळा हॉटेलात फेरफटका मारतात.
त्यावेळी मिसळपाव म्हणून मामाकाण्यांची डीश प्रसिद्ध होती आता मिसळपाव म्हणून तात्या अभ्यंकरांचं संकेतस्थळ प्रसिद्ध आहे.
आणि काही वर्षानी भारताने पाठवलेल्या चंद्रावरच्या रॉकेटचं नाव सुद्धा मिसळपाव असलं तर मला नवल वाटणार नाही.

तर त्याचं असं झालं, मी आणि शोभा बसलेल्या टेबलावर बाजूला एक बाई येऊन बसली.
शोभाच्या उजव्या हातातल्या तांब्याच्या कड्याकडे ती निरखून पहात असताना मी पाहिलं होतं.ती बाई शोभाला असा गहन प्रश्न विचारील हे माझ्या मनातही नव्हतं.अगदी तीच्या मर्मावर घाव घातल्या सारखं मला वाटलं.
तीने शोभाला विचारलं,
“तुम्ही तुमच्या उजव्या मनगटावर तांब्याचं कडं का वापारता?”
शोभाने जरा त्या बाईकडे निरखून पाहून तीची खात्री केली की खरंच ही बाई गंभीर होऊन प्रश्न विचारतेय ना.
मध्यंतरी हे फॅड आलं होतं आणि आता निघूनही गेलं.
“तुम्ही फॅशन म्हणून नक्कीच वापरत नसाल.वापरण्याच्या मागे काहीतरी कारण असणार”
तीने दुसरं वक्तव्यं थोडं हसंत हसंत केलं.आणि ती कारण विचारू लागली.

शोभा तीला म्हणाली,
“माझे आजोबा अलीकडेच गेले.त्या दिवशी मी एकदा हे कडं मनगटावरून काढलं होतं.तसंच जेव्हा माझी आजी गेली होती तेव्हा तीच्या सन्मानासाठी मी असंच ते मनगटावेगळं केलं होतं.”
क्षणभर थांबून आवंढा गिळून शोभा पुढे म्हणाली,
“हे कडं भरवश्याचं आणि त्यागाचं चिन्ह आहे असं मला वाटतं.माझी आजी कॅन्सरने गेली.हा रोग आजार्‍याला आणि सुदृढ असलेल्याला सुद्धा जेरीला आणतो.हा रोग कुणाचं तरी जीवन घेऊन जातोच पण बरोबरीने कुणाचे आजी,आजोबा वडील,आई,बायको/नवरा,भावंड,मुलही घेऊन जातो.
मला वाटतं हे कडं कुटूंब,मित्रमंडळी,जीवित असणं किंवा मृत्युपावणं ह्याचं प्रतिनिधित्व करीत असतं असं मी मानते.मी ते माझ्या मनगटावर ऐक्य दाखवण्यासाठी वापरते.जे अजून जीवंत आहेत,जे असल्या दुर्धर रोगाचा सामना करीत आहेत त्यांच्यासाठी वापरते.”

मी म्हणालो,
“ह्या रोगा बाबतीत आपण किती सुशिक्षीत व्हायला हवं हे आपल्यावर अवलंबून आहे.अगदी सुरवात दिसताच ह्यावर उपाय योजना व्ह्ययला हवी.आणि सरकारने आणि सामाजिक संस्थांनी ह्या रोगावर हिरीरीने संशोधन करायला हवं.”

माझ्याशी सहमत होत शोभा म्हणाली,
“हे कडं मी धैर्य़ाने आणि मी स्वतः कदाचीत ब्रेस्ट कॅन्सरची मोठी जोखीम असलेली असं समजून मनगटावर वापरते. माझी मुलगी सुद्धा ह्या रोगाला बळी पडण्याचा संभव आहे अशा विचाराने वापरते.आणि कधी कधी मी माझ्या नवर्‍याची आठवण काढून मनात म्हणते माझ्या जाण्याने तो आपली पत्नी घालवून बसणार आहे.”

मी म्हणालो,
“सर्व तर्‍हेच्या कॅन्सर रोगावर नक्कीच एक दिवस उपाय निघेल.जे बिचारे त्या रोगाला बळी पडले त्यांच्या लढतीच्या समर्थनासाठी मी प्रार्थना करतो. त्यांच्या ह्या लढाईमधून इतरांचं जीवीत सुरक्षीत व्ह्यायला मदत होईल.”
माझ्या आणि शोभाच्या विचारामुळे त्या बाईच्या एका प्रश्नाला आमच्या अनेक उत्तराने तीला कंटाळा आणला असावा.पण तीच्याकडून मोठं गमतीदार स्पष्टीकरण मिळालं.
ती म्हणाली,
“माझी आई ब्रेस्ट कॅन्सरने गेल्या नंतर मला असंच कुणी तरी कडं दिलं होतं.मी वापरत नसले तरी जे वापरताना दिसतात त्यांना मी निक्षून त्यांच्या वापरण्याचं कारण मात्र विचारते.
प्रत्येकाकडे त्यांचीच स्वतःची कहाणी असते. हे कडं वापरून ज्याला त्याला त्याचा प्रत्यय येतो.”

उठता उठता शोभा म्हणाली,
“मला आशा आहे की ह्या कड्यातर्फे ह्या रोगाच्या लागणीची इतरांना आठवण दिली जाईल.आणि एक दिवस ह्या रोगातून वाचलेले लोक इतराना, त्यांच्या कुटूंबियाकडून त्यांच्याबद्दल कहाणी ऐकवण्या ऐवजी त्यांचाकडून त्यांची कहाणी ऐकवतील.”
चहाचा शेवटचा घोट घेत मी ही उठलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

गोरेगांवचे सामंतगुरुजी गेले.

” मधुदादा, अखेर तुम्ही आम्हाला सोडून गेला.”

त्या दिवसात अण्णा आई वेंगुर्ल्याला होते.अर्थात अण्णा अंथरूणात आजारी असल्याने ती दोघं येऊ शकली नाहीत. सुधाकर पण त्यांच्या बरोबर होता.
मी अक्काच्या लग्नाच्या वेळेची आठवण येऊन म्हणतोय.

मला वाट्तं ते १९५१ साल होतं.सुधाकर १५ वर्षाचा होता.मी १८ वर्षाचा होतो.मी कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात शिकत होतो. अंधेरीच्या आराम नगर मधे मी एकटाच रहात होतो.पण माझ्या बरोबर माझा मावस भाऊ रमाकांत-आता तो नाही- रहायचा. अंधेरीच्या भवन्स कॉलेज मधे मी जात होतो.

रमाकांत तुमचा मित्र होता.तुमचं अक्काशी लग्न करून द्यायचा त्याचा विचार झाला.अक्का चांगले मार्क्स घेऊन मॅट्रिक पास झाली होती.त्यावेळी ती खूपच सुंदर दिसायची.प्रसिद्ध मराठी नट चंद्रकात याने तीला शारदा नाटकात शारदेची भुमीका दिली होती.चंद्रकांतने नाटकाचं डायरेक्षन केलं होतं.

“मुर्तिमंत भिती उभी मज समोर राहिली”

ह्या शारदा नाटकातल्या गाण्याला तीला बरेचवेळा “वन्स मोअर” मिळायचे. एक दोन वर्ष तीने वेंगुर्ल्याला नोकरी केली.रॅशनींग ऑफीस मधे.

अक्काच्या लग्नाला अण्णा आईने संमत्ती दिली आणि तीने तुम्हाला होकार दिला.
मी,माझा मोठा भाऊ भाई/माई, त्याची मुलं-मंगला ६ वर्षाची,सतीश ४ वर्षाचा आणि निमा(निर्मला) नुकतीच झाली होती.  आणि रमाकांत एव्हडीच मंडळी मुलीच्या बाजूची होती.
तुमचे दोन भाऊ-वसंत,प्रभाकर आणि तुमच्या दोन बहिणी आणि तुमचे आई वडील होते.

लग्न गिरगावांत हॉल घेऊन केलं.खूप नातेवाईक मंडळी आली होती.
म्हणजे १९५१ पासून माझी आणि तुमची ओळख.आज २०१० म्हणजे जवळ जवळ गेल्या ५८/५९ वर्षांचा माझा तुमचा परिचय होता.कार्यबाहुल्यामुळे मला जरी दूर रहावं लागलं तरी आठवणी येतच रहायच्या.दोन वर्षापूर्वी अक्काचं निधन झालं.तीच्या जाण्याने तुम्हाला धक्का बसला होता.पण संगीतात वेळ खर्ची करून तुम्ही तुमचा एकटेपणा निभावून नेत होता.

तुमच्या घरात संगीताची सर्वानाच गोडी होती.तुमचे मोठे भाऊ वसंत हे व्ही.शांताराम यांच्या राजकमल कला मंदिरात त्यावेळी म्युझीशियन होते.ते प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई याचे असिस्टंट होते.प्रभाकर पण संगीतात स्वारस्य घ्यायचे.आणि तुम्ही तर उभी हयात संगीताची सेवा करण्यात खर्ची केली. अख्या गोरेगावात सामंत गुरुजी म्हणजेच आमचे मधुदादा.तुमचा आवाजही गोड होता.ऑल इंडिया रेडीओवर तुमचे त्यावेळी संगीताचे कार्यक्रम व्हायचे.तुम्ही गाण्याना चाली पण द्यायचा.मी तुमची गाणी ऐकली आहेत.
किर्तनात तुम्ही पेटी वाजवायचा.मेढेकरबाईंच्या गिरगावातल्या क्लासात तुम्ही संगीताचे गुरूजी होता.तुमचा संगीताचा वारसा विरेनने घेतला.आणि विरेन नक्कीच तुमचा वारसा चालवील.
गेल्या ३०/४० वर्षात तुम्ही गोरेगावांत तुमचा शिष्यगण एव्हडा निर्माण केलेला आहे की बरेचसे तुमचे शिष्य आजोबा होऊन त्यांची नातवंडं पण तुमच्या कडून शिकून गेली असतील. दरवर्षी गुरूपोर्णिमेला तुमचे गोरेगांवात संगीताचे कार्यक्रम व्हायचे.तुमचे शिष्य/शिष्या त्यात भाग घ्यायचे.

तुम्ही गोव्याचे असल्याने तुम्हाला पोर्तुगीझ आणि गोव्याची भाषा यायची.तुम्ही स्वभावाने अतीशय प्रेमळ आणि विनोदी वृत्तीचे होता.तुमचा खास मित्र वसंत सबनीस.तुमच्या विनोदावर सबनीसांच हंसणं हा आमचा खूप पास टाईम व्हायचा.
आज तुम्ही आम्हाला सोडून गेल्याचं ऐकून खुपच दुःख झालं.पण एकच मनाची समाधानी करून घ्यावीशी वाट्ते की वर गेल्यावर तुम्ही अक्काला तरी भेटाल.

विरेन आणि वर्षाच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत.
परमेश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो.
(मधूकर सामंत म्हणजेच सामंतगुरूजी ३ जानेवारी २०१० या दिवशी कालवश झाले.ते ८६ वर्षाचे होते.आमचे मधुदादा, माझे मेव्हणे होते.माझ्या मोठ्या बहिणीचे यजमान.त्यांच्या मागे त्यांचा मुलगा विरेन आणि त्याची मुलगी स्नेहा आणि त्यांची मुलगी वर्षा आणि तीचा मुलगा मयुरेश अशी दोन नातवंडं आहेत.)

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

नका एव्हडे सतावू.

अनुवाद (भूली हुई यादों…..)

विस्मरलेल्या स्मृतिनो
नका एव्हडे सतावू
घेऊ का मी जरा विश्राम
कसे दूर तुम्हा मी ठेवू

ओंजळीत माझ्या मी जमविले तारे
सहारा घेऊनी स्वपनांचा कसे मी जगावे
विक्षिप्त मी असे मुळचा
नका विक्षिप्त आणखी करू
विस्मरलेल्या स्मृतिनो
नका एव्हडे सतावू

नका लटू मला घालूनी कसला वाद
दाखवण्या नवा मार्ग नका घालू साद
सांभाळले मला मी पडता पडता
नका आणखी पाडवू
घेऊ का मी जरा विश्राम
कसे दूर तुम्हा मी ठेवू

विस्मरलेल्या स्मृतिनो
नका एव्हडे सतावू

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com